खादीच्या कापडाची नवी श्रेणी; तयार कपडय़ांचा अनोखा नजराणा

रेमंड या भारतातील अग्रेसर नाममुद्रेने प्रथमच खादी वस्त्रोद्योग प्रवेश करत असल्याचे जाहीर केले असून त्यांनी ‘खादी बाय रेमंड’ हे नावाने उत्पादन सादर केले आहे.

यासाठी मुंबईत नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री (एमएसएमई – सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग) गिरीराज सिंग आणि विशेष अतिथी म्हणून महात्मा गांधी यांची नात सुमित्रा कुलकर्णी – गांधी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, गुजरातचे शिक्षण मंत्री भुपेंद्रसिंह चुडासमा आणि केव्हीआयसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शु सिन्हा केव्हीआयसीच्या उषा सुरेश आदी उपस्थित होते.

भारतीय टिव्ही व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी आणि भारतीय चित्रपट अभिनेत्री तनिष्ठा चटर्जी या दोघांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ‘खादी’ चळवळीचे महत्व व त्याचा स्वावलंबन तत्वाशी असलेला संबंध यावेळी विषद केला.

‘खादी बाय रेमंड’ अंतर्गत येणाऱ्या उत्पादनामध्ये भारतीय संस्कृतीशी मिळत्याजुळत्या, पारंपरिक खादी कपड्यांसह रेमंडच्या शाही परंपरेला व आधुनिक पिढीच्या निवडीला साजेसे रेडीमेड कपडे तसेच, शिलाईसाठीचे खादीचे नुसते कापडही उपलब्ध होणार आहे.

याप्रसंगी रेमंडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम हरी सिंघानिया म्हणाले, कंपनी उत्पादनांच्या श्रेणीत राष्ट्रीय वस्त्र असलेल्या खादीचा समावेश करत आहे. या नव्या रेमंड खादी श्रेणीत आधुनिक डिझाईन्सचे नवे उत्पादन अंतर्भूत करण्यात आले असून खादीला ग्राहकांच्या पसंतीचे वस्त्र म्हणून नव्याने ओळख निर्माण करून देण्याचा हा प्रयत्न आहे.

‘मेक इन इंडिया’ अभियानाला पािठबा देण्याच्या हेतूने व फॅशनेबल वस्त्र म्हणून खादीला पुढे आणण्यासाठी हे कलेक्शन तयार करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

हा उपक्रम केव्हीआयसी अंतर्गत येणाऱ्या कायद्यान्वये मान्य करण्यात आला असून खादीची विक्री व विपणनासाठी रेमंड या ब्रॅण्डला परवानगी देण्यात आली आहे. तसेच, ग्रामीण भागातील हस्तकला व ग्राम वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देणे तसेच या उद्योगांना विपणन एजन्सींतर्फे चांगली बाजारपेठ मिळवून देणे हेही या उपक्रमाचे ध्येय आहे. या उपक्रमांतर्गत, पुढील पाच वर्षांसाठी खादीच्या कपड्यांच्या व अन्य वस्तूंच्या किमान उत्पादनासाठी मलमल, सुती कापड, लोकर आदी प्रकारांच्या खरेदीची परवानगी रेमंडला देण्यात आली आहे.

या उपक्रमाचाच एक भाग म्हणून रेमंडतर्फे भारतीय खादीचे सर्व प्रकार उत्पादित करण्यात येणार असून हाताळण्यासाठी अधिक सोयीचे व उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन तयार होण्यासाठी विविध उत्पादन केंद्रांवर हा माल पाठवला जाणार आहे.

देशभरातील विविध खादी उत्पादक केंद्रांवर रेमंडतर्फे आधुनिक तंत्रज्ञानयुक्त नवीन डिझाईन्स तयार करण्यासाठी तज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. खादी उत्पादनात एकूणच मूल्यिात्मक भर घालण्यासाठी रेमंडतर्फे प्रयत्न केले जाणार आहेत.

रेमंडची खादी उत्पादने केव्हीआयसी दालने, रेमंड दुकाने तसेच, ई-कॉमर्स पोर्टल्सवर भारतभर उपलब्ध असणार आहेत.