सार्वजनिक क्षेत्रातील खते उत्पादक राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर्स लिमिटेडने अलिबागनजीक थल येथील आपल्या उत्पादन प्रकल्पाचे रु. ४८९ कोटींच्या गुंतवणुकीतून नूतनीकरण पूर्ण केल्याची घोषणा केली आहे. यातून या प्रकल्पाची युरिया उत्पादनक्षमता सध्याच्या वार्षिक १७ लाख टनांवरून २० लाख टनांपर्यंत वाढणार आहे.
युरिया खताची भारतात मोठय़ा प्रमाणात आयात केली जाते. थल प्रकल्पातील विस्तारीत क्षमतेतून तयार होणाऱ्या युरिया उत्पादनासाठी विशिष्ट तंत्रावर बेतलेल्या आयात समकक्ष किमतीच्या निश्चितीतून आरसीएफला येत्या काळात मोठय़ा आर्थिक फायद्याची शक्यता निर्माण झाली आहे. या शिवाय थल प्रकल्पात अतिरिक्त अमोनिया आणि युरिया उत्पादनाचा प्रवाह विकसित करण्याचे आरसीएफचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. यावर नवीन गुंतवणूक धोरण-२०१२ अंतर्गत ४११२.५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून, युरिया उत्पादनक्षमतेत आणखी वार्षिक १२.७ लाख टनांची भर पडणार आहे. हा प्रस्तावित विस्तार राबविण्यासाठी आरसीएफने जागतिक निविदा प्रक्रियेतून कंत्राटदाराची निवडही केली असून, सदर प्रस्ताव पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या अंतिम शिक्कामोर्तबासाठी प्रलंबित आहे. या प्रकल्पावर मे २०१३ पासून प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होणे कंपनीला अपेक्षित आहे.
शिवाय ओडिशामधील थलचेर येथील बंद पडलेला आरसीएफचा उत्पादन प्रकल्प कोल इंडिया लि.शी भागीदारीतून पुनरूज्जिवीत केला जाणार आहे. या प्रस्तावित युरिया निर्मिती प्रकल्पात कोळसा कच्चामाल म्हणून वापरात येणार असल्याने, नैसर्गिक वायूवर आधारीत युरियापेक्षा येथे उत्पादित युरिया तुलनेने स्वस्त असेल. आफ्रिकेतील घाना येथे संयुक्त भागीदारीत आरसीएफचा युरिया निर्मिती प्रकल्प लवकरच कार्यान्वित होत असून, स्थानिक गरज भागविल्यानंतर तेथील उत्पादित युरिया भारतात पाठविला जाणार आहे.