ई-कॉमर्सच्या माध्यमातून भारतीय फॅशन व्यवसायाची उलाढाल येत्या २०२० पर्यंत ३५ अब्ज डॉलपर्यंत जाण्याची अपेक्षा ‘गुगल’च्या ई-कॉमर्स आणि ऑनलाइनचे संचालक नितीन बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. 

देशातील सर्व व्यवसायातील ई-कॉमर्सच्या माध्यमातून होणारी एकूण उलाढाल ही येत्या २०२० पर्यंत १०० अब्ज डॉलपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. यातील फॅशन व्यवसायाचा वाटा हा ३५ अब्ज डॉलर इतका असेल. येत्या वर्षभरात ही वाढ चारपटींनी झालेली असेल, असे बावनकुळे म्हणाले. ‘इंडिया फॅशन फोरम’च्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. गुगलने केलेल्या संशोधनानुसार, ऑनलाइन खरेदीसाठी केलेला प्रत्येक तिसरा शोध हा फॅशनसंबंधित असतो आणि दर वर्षी फॅशनसंदर्भातील चौकशीत ६६ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. २०१६ पर्यंत ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांची संख्या दहा कोटींपर्यंत पोहोचतील, तर २०१८ पर्यंत ही संख्या २५ कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सध्या ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांची संख्या ४ कोटी इतकी आहे. २०१८ पर्यंत भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ५० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर २८ कोटी स्मार्टफोनद्वारे ई-कॉमर्स व्यवसायाला अधिक बळकटी मिळेल, अशीही माहिती त्यांनी दिली.
ऑनलाइन खरेदीचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. यात खासकरून कपडे, चपला, लहानमुलांचे साहित्य आणि सौंदर्यप्रसाधनांचा अधिक समावेश आहे, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.