कोण सहारा? ते आफ्रिकेतील वाळवंट ना! अशा शब्दात स्पेनच्या ‘बीबीव्हीए’ने सुब्रता रॉय यांच्या सहारा समूहाची अनभिज्ञ म्हणून संभावना करताना, कोणतेही वित्तसहाय्य करण्याबाबत हात वर केले आहेत. यामुळे गेल्या वर्षभरापासून तुरुंगात असलेले सहाराश्री पुन्हा एकदा तोंडघशी पडले असून, या प्रकरणाला आणखी एक वळण प्राप्त झाले आहे.
रॉय यांच्या जामिनावर सुटकेसाठी स्पेनमधील कंपनीच्या अर्थसहाय्याचा दाखला सर्वोच्च न्यायालयाला देणाऱ्या सहाराला महिन्याभरात दुसऱ्यांदा अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे. ‘बीबीव्हीए’ या कंपनीने आपण सहारा समूहाला कोणतेही वित्तसहाय्य करीत नसल्याचे बुधवारी नि:संदिग्ध स्पष्ट केले. उलट यामध्ये आपले नाव आल्याबद्दल कंपनीच्या प्रवक्त्याने आश्चर्यही व्यक्त केले आहे.
रॉय यांच्या जामिनासाठी विदेशातील तीन मालमत्तांसह लोणावळ्यानजीकच्या अ‍ॅम्बी व्हॅलीच्या विक्रीसाठी स्पेनच्या या कंपनीद्वारे निधी उभारणी सुरू असल्याचे सहाराच्या वतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते. सहाराचा हा प्रस्ताव ठोस वाटत असल्याचे नमूद करत विक्री प्रक्रिया तीन महिन्यांत राबविण्याची परवानगी न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी दिली होती.
वित्तसहाय्याबाबत सहाराने केलेल्या दाव्याबाबत शंका उपस्थित करताना ‘बीबीव्हीए’च्या प्रवक्त्याने समूहाशी संबंधित कोणत्याही कंपनीला आम्ही सध्या अर्थसहाय्य करत नाही, असे स्पष्ट केले आहे. न्यायालयात आपल्या कंपनीचे नाव घेतले गेल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करताना कंपनीच्या अन्य एका वरिष्ठ अधिकाऱ्याने समूहाबरोबर कर्जासाठी कोणतीही चर्चा यापूर्वी झाली नसल्याचे स्पष्ट केले.
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी सहारा समूहाच्या वकिलांनी ‘बीबीव्हीए’चे कार्याधिकारी विझमॅनोस यांची स्वाक्षरी असलेले ९० कोटी युरोचे वित्तसहाय्याचे पत्रही सादर केले होते. तेव्हा या पत्राच्या सत्यतेबाबतच शंका उपस्थित झाली आहे. समूहाने यापूर्वी अमेरिकेतील मिराच कॅपिटलचे नावही पुढे केले होते. पुढे मिराचनेही अकस्मात अंग काढून घेतलेच, उलट सहारा समूहाविरुद्ध फसवणुकीचा खटला सुरू करण्याची तयारी केली आहे.

कोण सहारा? मला फक्त आफ्रिकेतील वाळवंट म्हणून ते माहिती आहे. भारतातील कोणत्याही कंपनीबरोबर मी कधीही काम केलेले नाही. तेव्हा सहाराला कर्ज देण्याचा प्रश्नच नाही. भारताच्या न्यायालयात आमचे नाव आल्याबद्दल मलाच कमालीचे आश्चर्य वाटले.
जोस रॅमन विझमॅनोस, कार्यकारी अधिकारी, बीबीव्हीए