जुलैमध्ये घाऊक तसेच किरकोळ महागाई दरात वाढ

महागाई दराने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. जुलैमधील घाऊक तसेत किरकोळ महागाई दरात वाढ नोंदली गेली आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर १.८८ टक्के तर किरकोळ महागाई दर २.६६ टक्क्य़ांपर्यंत वाढला आहे. आधीच्या महिन्यात हे दोन्ही दर अनुक्रमे ०.९० व १.४६ टक्के असे होते.

घाऊक महागाई दर गेल्या पाच महिन्यात प्रथमच वाढला आहे. हा दर आधीच्या, जूनमध्ये ०.९० टक्के होता. तर वर्षभरापूर्वी, जुलै २०१६ मध्ये ०.६३ टक्के होता. यंदा हा दर दुपटीहून अधिक नोंदला गेला आहे. हा महागाई दर मार्चपासून सातत्याने खाली येत होता. यंदा मात्र तो पुन्हा उंचावला आहे.

घाऊक महागाई दरात अन्नधान्याचे दर गेल्या दोन महिन्यांमध्ये सावरलेले होते. यंदा मात्र ते २.१५ टक्क्य़ांपर्यंत गेले आहेत. यामध्ये भाज्यांचे दर सर्वाधिक, २१.१६ टक्कयाने वाढले आहेत. तर निर्मिती क्षेत्रातील उत्पादनांच्या किंमती घसरल्या आहेत. ऊर्जा व इंधन दर घसरत ४.३७ टक्क्य़ांवर आले आहेत. भाज्यांमध्ये बटाटय़ाच्या किंमती ४२.४५ टक्क्य़ांपर्यंत घसरल्या आहेत.

जुलैमध्ये किरकोळ महागाईवर आधारित निर्देशांकही उंचावताना २.३६ टक्क्य़ांवर गेला आहे. या दरम्यान अन्नधान्याच्या वस्तू तसेच पान, तंबाखू आदींच्या किंमतीही वाढल्याने महागाई दरात भर पडली आहे. जूनमध्ये किरकोळ महागाई दर १.४६ टक्के होता. किरकोळ महागाई दरांमध्ये साखर, घरांच्या किंमती, इंधन व ऊर्जा तसेच कपडे व पादत्राणे आदींच्या किंमतीत गेल्या महिन्यात भर पडली आहे.

वस्तू व सेवा करप्रणाली लागू झालेल्या पहिल्याच महिन्यात दोन्ही प्रमुख महागाई दर वाढल्याने ही घटना विशेष मानली जात आहे. अन्नधान्याचे दर वाढल्याने यंदा महागाई दरात लक्षणीय भर पडली आहे. परिणामी उद्योग क्षेत्रातून दरकपातीसाठी पुन्हा एकदा आग्रह धरला जाऊ लागला आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या चौथ्या द्विमासिक पतधोरण आढाव्यात पाव क्के दर कपात केली होती. मध्यवर्ती बँकेचे मार्च २०१८ अखेरचे महागाई दराचे लक्ष्य ४ टक्क्य़ांखालील आहे. आर्थिक सर्वेक्षणातही हाच अंदाज दिला आहे.

आणखी दरकपातीसाठी वाढता दबाव

ताज्या महागाई दरांच्या आकडेवारीवर प्रतिक्रिया देताना फिक्की या उद्योग संघटनेचे अध्यक्ष पंकज पटेल यांनी खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढीसाठी रिझव्‍‌र्ह बँकेला अजूनही दर कपात पुरेसा वाव असल्याचे म्हटले आहे. वस्तू व सेवा करप्रणालीचा विपरित परिणाम येत्या काही तिमाहीत जाणवेल, असे निरिक्षण इक्राच्या प्रधान अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी म्हटले आहे. जूनमधील घसरते औद्योगिक उत्पादन चार वर्षांच्या तळात पोहोचल्याची आकडेवारी गेल्याच आठवडय़ात जाहीर झाली होती.