सार्वजनिक क्षेत्रातील निवडक ‘रत्न’ कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक असलेल्या ‘सीपीएसई एक्स्चेंज ट्रेडेड फंड- ईटीएफ’ची पुनर्रचित सुधारित आवृत्ती येत्या ऑक्टोबरपासून म्हणजे दिवाळीच्या तोंडावर गुंतवणुकीसाठी खुली करण्याचा केंद्रीय अर्थमंत्रालयाचा मानस आहे. अलीकडेच भविष्य निर्वाह निधी संघटनेकडील (ईपीएफओ) निधी समभाग बाजारात गुंतविण्याला मंजुरी देणारा निर्णय झाला असून, त्याची सुरुवात या ईटीएफमधील गुंतवणुकीपासून होणे अपेक्षित आहे.
केंद्राने चालू आर्थिक वर्षांसाठी निश्चित केलेल्या ६९,५०० कोटी रुपयांच्या निर्गुतवणुकीच्या उद्दिष्टाच्या पूर्ततेच्या दृष्टीनेही सीपीएई ईटीएफच्या या दुसऱ्या आवृत्तीचे महत्त्वाचे योगदान राहील. सरकारने विविध सार्वजनिक उपक्रमातील सरकारच्या भागभांडवलाची विक्री करून ४१,००० कोटी रुपये उभारण्याचे ठरविले असून, आणखी २८,५०० कोटी रुपये सरकारच्या अन्य कंपन्यांतील भागभांडवलाची विक्री करून उभे केले जाणार आहेत.
या आधी मार्च २०१४ मध्ये सर्वप्रथम १० सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेल्या पहिल्या सीपीएसई ईटीएफ बाजारात दाखल झाला होता. या फंडात छोटय़ा व्यक्तिगत गुंतवणूकदारांना किमान ५,००० रुपयांची गुंतवणूक करून सहभागी होता आले होते. नव्या सुधारित रूपात छोटय़ा गुंतवणूकदारांना अधिक मोठा वाव देण्याचा विचार असल्याचे या प्रक्रियेशी संलग्न सूत्रांकडून सांगण्यात आले. गोल्डमन सॅक्सद्वारे व्यवस्थापित पहिल्या ईटीएफमधून ३,००० कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला आहे.
पहिल्या ईटीएफमध्ये सहभागी १० सार्वजनिक कंपन्यांतून एकंदर १ टक्के  सरकारचे भागभांडवल सौम्य केले गेले आहे, तर अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने अशा मार्गातून या १० कंपन्यांतील एकूण ३ टक्के  सरकारचा भांडवली हिस्सा हस्तांतरित करण्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे सुधारित ईटीएफचे आकारमान हे पहिल्या ईटीएफच्या तुलनेत दुपटीने मोठे असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अर्थात पीएफचा पैसा तसेच राष्ट्रीय पेन्शन योजनेचा (एनपीएस) निधीतून गुंतवणूक अपेक्षित असल्याने, सुधारित ईटीएफचा भरणाही निश्चित वाढेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे तब्बल ६.५ लाख कोटी रुपयांचा कोष तर एनपीएसकडे ८२,००० कोटी रुपयांचा गुंतवणूकयोग्य निधी आहे.

ईटीएफ काय?
एक्स्चेंज ट्रेडेड फंड अर्थात ईटीएफ हा म्युच्युअल फंडाच्या योजनेप्रमाणे लोकांकडून गुंतवणूक उभी करून, विहित संख्येतील समभागांमध्ये गुंतवणूक करीत असतो. परंतु समभाग व रोख्यांप्रमाणे ‘ईटीएफ’चे युनिट्स भांडवली बाजारात सूचिबद्ध केले जातात आणि त्यांचे नियमित खरेदी-विक्री व्यवहार बाजारात सारखे सुरू असतात. ‘सीपीएसई ईटीएफ’चा फायदा असा की, गुंतवणूकदारांना अल्प मुदलातून १० बडय़ा सरकारी कंपन्यांच्या समभागांची मालकी मिळविता येईल.

समाविष्ट १० समभाग
ओएनजीसी, गेल इंडिया, कोल इंडिया, इंडियन ऑइल, ऑइल इंडिया, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन, कंटेनर कॉर्पोरेशन, इंजिनीअर्स इंडिया आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स.