ऊर्जा क्षेत्राला अर्थसहाय्य देणारी सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न कंपनी ‘रूरल इलेक्ट्रिफिकेश कॉर्पोरेशन (आरईसी)’ने भांडवल बाजारातून ४५०० कोटी रुपये उभारण्याचे ठरविले आहे. करमुक्त, सुरक्षित, विमोचनयोग्य आणि अपरिवर्तनीय अशा कर्जरोख्यांची (बॉण्ड्स) विक्री करून कंपनी हा निधी उभारणार आहे. करवजावटीचा लाभ देणारे चालू वर्षांतील ही पहिलीच रोखेविक्री असल्याने तिला गुंतवणूकदारांकडून अपेक्षित प्रतिसाद लाभेल, असा विश्वास आरईसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव शर्मा यांनी सांगितले. येत्या सोमवारी ३ डिसेंबर ते १० डिसेंबर या दरम्यान ही रोखे विक्री होईल. प्रत्येकी १००० रुपये किमतीच्या असलेले हे रोखे दोन मालिकांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत. यांचा परिपक्वता कालावधी अनुक्रमे १० वर्षे आणि १५ वर्षे असा असेल, तर गुंतवणूकदारांना व्याजरूपी परतावा वार्षिक अनुक्रमे ७.२२ टक्के आणि ७.३८ या दराने दिला जाईल. क्रिसिल, केअर, इक्रा या प्रमुख पतमानांकन संस्थांनी या रोख्यांना गुंतवणुकीच्या दृष्टीने उच्च सुरक्षेची हमी देणारे सर्वोच्च मानांकन बहाल केले आहे. विक्रीपश्चात या रोख्यांना एनएसई आणि बीएसई अशा दोन्ही शेअर बाजारांमध्ये सूचिबद्ध केले जाईल आणि त्यात नियमित व्यवहार सुरू होतील.