किंगफिशर एअरलाइन्सचे मालक विजय मल्या यांना स्टेट बँक या तिसऱ्या सरकारी बँकेनेही कर्जबुडवे (विलफुल डिफॉल्टर) म्हणून जाहीर करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी बँकेने मल्या यांना नोटीस बजाविली असून येत्या १५ दिवसांत त्यांना त्याला उत्तर द्यावे लागणार आहे.
स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी या वृत्ताची पुष्टी केली असून कंपनीला उत्तर देण्यासाठी काही दिवसांचा अवधी दिल्याची माहितीही दिली. मल्या यांची किंगफिशर एअरलाइन्स तसेच कंपनीच्या अन्य तीन संचालकांना कर्जबुडवे म्हणून जाहीर का करू नये, असा सवाल या नोटिशीत विचारण्यात आला आहे. बँकेने किंगफिशर एअरलाइन्सला १,६०० कोटी रुपयांचे कर्ज दिले असून स्टेट बँकेसह एकूण १७ बँकांनी कंपनीला कर्ज म्हणून दिलेली रक्कम ७,६०० कोटी रुपयांहून अधिक आहे. यापूर्वी यूबीआय व आयडीबीआय बँकेने मल्या यांच्यांवर कर्जबुडवे म्हणून शिक्का मारला आहे.