अवैध ठेवी गोळा करणाऱ्या धेंडाविरूद्धची कारवाईच्या क्रमात, ‘सेबी’ या भांडवली बाजार नियंत्रक संस्थेने पीएसीएल लिमिटेड या कंपनीला गुंतवणूकदारांकडून गोळा केलेली रक्कम तीन महिन्यांच्या आत परत करण्याचे आदेश शुक्रवारी दिले. या कंपनीने गोळा केलेल्या बेकायदेशीर ठेवींचे प्रमाण ५० हजार कोटींच्या घरात जाणारे आहे.
घोटाळ्याशी संलग्न रक्कम व सहभागी असलेली गुंतवणूकदारांची संख्या अशा दोन्ही दृष्टीने ‘सेबी’ची कारवाई झालेली हा सर्वात मोठा घोटाळा आहे. उल्लेखनीय म्हणजे फेब्रुवारी १९९८ मध्ये तक्रारीद्वारे कळविल्या गेलेल्या या घोटाळ्यासंबंधाने कारवाईसाठी ‘सेबी’ कायद्याद्वारे विशेष अधिकार प्राप्त झाल्यानंतरच, म्हणजे तब्बल १६ वर्षांनंतर बळ प्राप्त होऊ शकले आहे.
‘सेबी’ने जारी केलेल्या ९२ पानांच्या आदेशात, कंपनीने गोळा केलेली व स्वत: कबुली दिलेली रक्कम ४९,१०० कोटी रुपये इतकी आहे. ही रक्कम केवळ १ एप्रिल २०१२ ते २५ फेब्रुवारी २०१३ या दरम्यान गोळा केली गेली असून, प्रत्यक्षात ठेव रकमेचा आकडा यापेक्षा मोठा असू शकेल, असा सेबीचा कयास आहे. ठेवीच्या बदल्यात जमीन देण्याच्या या योजनेतील गुंतवणूकदारांची संख्याच ५.८५ कोटी इतकी आहे. ‘पीएसीएल’ महाघोटाळ्याचा प्रवर्तक निर्मल सिंग भांगू याची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही चौकशी सुरू आहे.