भांडवली बाजारातून निधी उभारण्यासाठी कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या समभाग विक्रीसाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी करणाऱ्या एकूण प्रक्रियेत ‘गतिमान’ फेरबदलाचा निर्णय ‘सेबी’ने मंगळवारी घेतला. यातून भागविक्रीपश्चात समभागांची बाजारातील सूचिबद्धता आजच्या तुलनेत निम्म्या म्हणजे सहा दिवसांच्या कालावधीत होईल. गुंतवणूकदारांचा भागविक्रीसाठी अर्ज करताना गुंतलेला निधी हा जर इच्छित समभाग वितरीत न झाल्यास तुलनेने लवकर खुला होईल. हा फेरबदल आगामी वर्षांरंभापासून म्हणजे १ जानेवारी २०१६ पासून अंमलात येईल, असे सेबीचे अध्यक्ष यू के सिन्हा यांनी नवी दिल्लीत झालेल्या सेबी संचालकांच्या बैठक आटोपल्यानंतर पत्रकारांना सांगितले. तथापि संपूर्ण स्वरूपातील ‘ई-आयपीओ’ प्रक्रियेच्या अंमलबजावणीविषयी तूर्त सबुरीने व परिस्थितीनुरूप निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.