देशातील पहिले आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र उभारण्यासाठी सेबी लवकरच नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणार आहे. त्याचबरोबर भांडवली बाजारपेठेला वाव देण्यासाठी खुल्या बाजारातून निधी उभारण्याबाबतही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जाणार आहेत. दरम्यान सर्व सूचिबद्ध कंपन्यांच्या संचालक मंडळावर किमान एक महिला संचालक नियुक्त न करणाऱ्या कंपन्यांवर सेबीने ताशेरे ओढले आहेत. संचालक मंडळांवर किमान एक महिला संचालन नियुक्त न करणे ही सूचिबद्ध कंपन्यांसाठी शरमेची बाब आहे, असे सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी म्हटले आहे. १ एप्रिलपूर्वी सर्व सूचिबद्ध कंपन्यांच्या संचालक मंडळावर किमान एक महिला सदस्य नियुक्त करणे गरजेचे आहे, असे गेल्या वर्षी जाहीर केलेल्या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले होते. या कंपन्यांनी नव्या नियमांचे पालन न केल्यास त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील, असेही सिन्हा म्हणाले.