फेडरल बँकेच्या अध्यक्षपदी अब्राहम कोशी
खासगी क्षेत्रातील फेडरल बँकेच्या अध्यक्षपदी प्रा. अब्राहम कोशी यांची नियुक्ती झाली आहे. बँकेच्या संचालक मंडळावर ते सदस्य म्हणून मे २००७ मध्ये रुजू झाले होते. व्यवसाय व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या कोशी यांनी अहमदाबादच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेतून विपणन विषयातील शिक्षण घेतले आहे. राष्ट्रीयीकृत युनियन बँक ऑफ इंडियात त्यांनी १९७६ मध्ये बँकिंग क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. दक्षिणेतील अनेक शिक्षणसंस्थांशी त्यांचा संबंध राहिला आहे.
अनुराग जैन एक्झिम बँकेच्या अध्यक्षपदी
भारतीय निर्यात-आयात बँकेचे नवे अध्यक्ष म्हणून अनुराग जैन यांची नियुक्ती झाली आहे. टी. सी. ए. रंगनाथन हे निवृत्त झाल्याने जैन यांच्याकडे अध्यक्षपदासह बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचीही सूत्रे आली आहेत. रंगनाथन हे एप्रिल २०१० पासून बँकेत मुख्य कार्यकारी होते. नोव्हेंबरअखेर ते निवृत्त झाले. भारतीय प्रशासन सेवेच्या १९८९ तुकडीतील जैन हे केंद्रीय अर्थ विभागात विविध पदांवर कार्यरत राहिले आहेत. अर्थ खात्यातील वित्तीय सेवा विभागाचे सहसचिव म्हणून त्यांनी काम केले आहे. आयआयटी-खरगपूरमधून विद्युत अभियांत्रिकीतील पदवी व प्रशासकीय व्यवस्थापनातील पदव्युत्तर शिक्षण जैन यांनी घेतले आहे. पंजाब नॅशनल बँक, आयएफसीआयच्या संचालक मंडळावर ते राहिले आहेत.
व्ही. पी. कामत      ‘नोव्हा’चे नवे सीओओ
आरोग्य निदान क्षेत्रातील ‘नोव्हा’ समूहाचे मुख्य परिचलन अधिकारी म्हणून व्ही. पी. कामत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्जिकल केंद्र व फर्टिलिटी क्लिनिकची साखळी या समूहामार्फत चालविली जाते. कामत यांना व्यवस्थापन, संचालन, विक्री व विपणन क्षेत्रातील २५ वर्षांचा अनुभव असून वोखार्ड, अपोलो रुग्णालय तसेच निकोलस पिरामल, जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनसारख्या आरोग्य संगोपन कंपन्यांशी ते निगडित राहिले आहेत. मुंबई विद्यापाठातून त्यांनी सूक्ष्मजैव विषयातील स्नातकोत्तर शिक्षण घेतले आहे.
‘जीएसएफसी’ने पटकावले चार ‘फाय’ पुरस्कार
खतनिर्मिती क्षेत्रातील गुजरात स्टेट फर्टिलायझर्स अ‍ॅण्ड केमिकल्स लि. (जीएसएफसी)ने अलीकडेच खत निर्मात्यांची राष्ट्रीय संघटना ‘फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडिया (फाय)’द्वारे आयोजित सोहळ्यात चार मानाचे पुरस्कार पटकावले. जैवखतांच्या निर्मिती, प्रोत्साहन व विपणनासाठी, कंपनीच्या फॉस्फोरिक अ‍ॅसिड प्रकल्पाच्या उत्पादन कामगिरीतील प्रावीण्याबद्दल दोन पुरस्कारांबरोबरीनेच, पर्यावरण संरक्षणासंदर्भात कामगिरीबद्दलही कंपनीला गौरविण्यात आले, तर नायट्रोजन प्रकल्पाच्या २०१२-१३ मधील उत्पादन कामगिरीबद्दल दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार कंपनीला बहाल करण्यात आला. केंद्रीय कृषी व सहकारमंत्री शरद पवार तसेच केंद्रीय रसायने व खते राज्यमंत्री श्रीकांत जैना यांच्या हस्ते जीएसएफसीचे डी. आर. दवे यांनी हे पुरस्कार स्वीकारले.
‘आयआयएफ’च्या अध्यक्षपदी रिना भगवती
‘दि इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियन फाऊन्ड्रीमेन’च्या (आयआयएफ) अध्यक्षपदी रिना भगवती यांची नियुक्ती जाहीर झाली आहे. खनिकर्म क्षेत्रातील देशातील पाच हजारांहून अधिक उद्योगांचे नेतृत्व ही संघटना करते. संस्थेच्या उपाध्यक्षपदी फोरास पॉलिमर्सचे व्यवस्थापकीय संचालक विकास गर्ग हे नियुक्त झाले आहेत. रिना भगवती या गुजरातमधील अनेक उद्योग संघटनाशी संबंधित आहेत. भगवती व गर्ग यांची नियुक्ती पुढील एक वर्षांसाठी असेल. त्यांच्याबरोबर संस्थेचे मानद सरचिटणीस म्हणून अमिश पांचाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकारची नोडल एजन्सी म्हणून कार्य करणाऱ्या या संस्थेच्या अध्यक्षा बनलेल्या रिना या भगवती ऑटोकास्टच्या सहव्यवस्थापकीय संचालिकादेखील आहेत.
रिलायन्सच्या संचालक मंडळावर अदिल झैनुलभाई
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळावर अदिल झैनुलभाई यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे कंपनीच्या संचालक मंडळावरील एकूण सदस्यांची संख्या आता १४ झाली आहे. यात ८ सदस्य हे स्वतंत्र संचालक आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय तसेच देशी कंपन्यांच्या संचालक मंडळावर असलेल्या झैनुलभाई यांच्या गाठीशी या क्षेत्रातील ३४ वर्षांचा अनुभव असून नुकतेच त्यांनी मॅकेन्झी इंडियाचे अध्यक्षपदही भूषविले आहे.  
फिक्कीकडून ‘जेटकिंग’चा सन्मान
प्रशिक्षित आणि अर्धप्रशिक्षित मनुष्यबळाची कंपन्यांना असलेली गरज लक्षात घेऊन तरुणांमध्ये आवश्यक कौशल्य विकासात भरीव योगदान दिल्याबद्दल ‘फिक्की’द्वारे प्रतिष्ठेचा मानला जाणारा लीपव्हॉल्ट चॅम्पियन ऑफ इंडिया हा पुरस्कार देऊन जेटकिंग इन्फ्रोट्रेन लि. गौरविण्यात आले. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. पल्लम राजू यांच्या हस्ते हा पुरस्कार जेटकिंगचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश भरवानी यांनी अलीकडेच आयोजित ग्लोबल स्कील समिट या आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान स्वीकारला. फिक्कीच्या अध्यक्षा आणि एचएसबीसी इंडियाच्या प्रमुख नैना लाल किडवई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
झायडसच्या उत्पादनांचे शेफ संजीव कपूर सदिच्छादूत
ग्राहकोपयोगी आरोग्य क्षेत्रातील आघाडीच्या झायडस वेलनेस लिमिटेडच्या शुगर फ्री आणि न्युट्रालाइट या उत्पादनांसाठी सदिच्छादूत म्हणून घोषित करण्यात आले आहे. शुगर फ्रीबरोबर आधीपासून जोडले गेलेले कपूर यांनी न्युट्रालाइट या उत्पादनाशीही जोडले गेल्याबद्दल आनंद व्यक्त केला.