सेन्सेक्स २८ हजाराच्याही खाली

ऊर्जित पटेल यांच्या नियुक्तीमार्फत रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपात लांबणीवर टाकली जाण्याची धास्ती सप्ताहारंभीच भांडवली बाजारात उमटली. जोरदार समभाग विक्री करत गुंतवणूकदारांनी सोमवारी सेन्सेक्सला २८ हजाराच्याही खाली आणले. ९१.४६ अंश घसरणीसह सेन्सेक्स २७,९८५.५४ वर तर ३७.७५ अंश घसरणीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,६५० च्याही खाली, ८,६२९.१५ पर्यंत घसरला.

केंद्र सरकारने शनिवारी सायंकाळी उशिरा रिझव्‍‌र्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून विद्यमान डेप्युटी गव्हर्नर ऊर्जित पटेल यांचे नाव जाहीर केले. रिझव्‍‌र्ह बँक तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत राजन यांचे सहकारी राहिलेले पटेल हेदेखील राजन यांच्याप्रमाणेच वाढती महागाई लक्षात घेता व्याजदर कपात करणार नाहीत, ही भीती अन्य अर्थतज्ज्ञांबरोबरच गुंतवणूकदारांनाही भासू लागली. परिणामी त्यांनी नव्या सप्ताहारंभाचे व्यवहार करताना प्रमुख निर्देशांकांना त्यांच्या अनोख्या टप्प्यापासून दूर लोटले.

नव्या आठवडय़ाच्या सुरुवातीचे व्यवहार बाजारात सुरू होण्यापूर्वी आशियाई तसेच दुपारच्या सत्रात युरोपातील बाजारांचे व्यवहार नरमाईचे होते. मात्र मुंबई निर्देशांक सकाळच्या व्यवहारात २८,१४३.२८ या वरच्या टप्प्यावर होता. तो सत्रात २७,९१८.०५ पर्यंत घसरला. डॉलरच्या तुलनेत गेल्या तीन सप्ताहातील तळात पोहोचलेल्या रुपयाचे सावटही बाजारावर उमटले.

२८ हजाराचा स्तर सोडणाऱ्या सेन्सेक्सचा दिवसअखेरचा बंदस्तर हा ११ ऑगस्टनंतर किमान राहिला. गेल्या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी, शुक्रवारी सेन्सेक्सने ४६.४४ अंश घसरण नोंदविली होती. सत्रात ८,६८४.८५ ते ८,६१४ चा प्रवास करणाऱ्या निफ्टीवरही सोमवारी दबाव निर्माण झाला.