सर्वाधिक ई-कचरा निर्माण करणाऱ्या भारतातच या समस्येवर उपाययोजना प्रस्तुत करणाऱ्या अग्रणी जागतिक कंपनीचाही उदय होऊ घातला आहे. सेरेब्रा इंटिग्रेटेड टेक्नॉलॉजीज लि. या जगभरात वेगाने विस्तारत असलेल्या ई-कचरा बाजारपेठेतील अग्रेसर भारतीय कंपनीने सिंगापूरस्थित सिमेलिया रिसोर्स रिकव्हरी पीटीई लि. या कंपनीचे रु. ११० कोटींच्या मोबदल्यात अधिग्रहण करून मुसंडी मारली आहे.
सिमेलिया ही एन्व्हिरो-हब होल्डिंग्ज लिमिटेड या जागतिक कंपनीचाच एक घटक आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल उपकरणांची विस्तारणारी बाजारपेठ असलेल्या भारतात ई-कचऱ्याची तब्बल ११० अब्ज रुपयांची बाजारपेठ (जगाचा १० वा हिस्सा) असून, दरसाल ती २५ टक्के अशा उमद्या दराने विस्तारत आहे. सेरेब्राचा बंगळुरूमध्ये ई-कचऱ्याची विल्हेवाट व पुनर्नवीकरणासाठी तब्बल १० एकरांवर फैलावलेला प्रकल्प सध्या कार्यरत आहे. आता सेरेब्राला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळण्याबरोबरच, सिमेलियाच्या सिंगापूरमधील विस्तीर्ण ई-वेस्ट सुविधाही वापरता येणार आहे, अशी माहिती सेरेब्रा इंटिग्रेटेडचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. रंगनाथन यांनी दिली. भारतात दरसाल लक्षावधी टनांचा ई-कचरा निर्माण होत असतो, परंतु बहुतांश (९५ टक्के) किरकोळ भंगारवाल्यांमार्फत गोळा होतो आणि त्याची अशास्त्रीय विल्हेवाट लावली गेल्याने पर्यावरणीय व आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, असे रंगनाथन यांनी सांगितले. सेरेब्रा ई-कचरा गोळा करणाऱ्या मोजक्या परवानाप्राप्त कंपन्यांपैकी एक असून, फैलावलेले ४५० आयटी सामग्री विक्रेत्यांचे जाळे विशिष्ट मोबदला देऊन ई-कचरा गोळा करणारी केंद्रे म्हणून कंपनीकडून वापरात आणली जातील. सिंगापूरस्थित सिमेलियाचा ई-कचरा व्यवस्थापनातील नऊ वर्षांचा अनुभव, जागतिक तज्ज्ञता व तंत्रज्ञानही सेरेब्रासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास रंगनाथन यांनी व्यक्त केला.