टाटा पॉवर या सर्वात मोठय़ा वीज एकात्मिक कंपनीने मुंबईतील विक्रोळी येथील टाटा पॉवरच्या रिसिव्हिंग स्टेशनवर पहिले इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारले आहे.

२०३० पर्यंत अधिकाधिक वाहने इलेक्ट्रिकवरच चालविण्याच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचे ध्येय गाठण्यासाठी टाटा पॉवरने स्मार्ट चार्जिंग सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

याविषयी टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल सरदाना यांनी सांगितले की, या चार्जिंग स्टेशन्सवर इलेक्ट्रिक कार वापरकर्त्यांंना कार (बॅटरी इलेक्ट्रिकवर चालणारी वाहने, जशी महिंद्रा ई—२०, निसान लीफ इत्यादी) चार्ज करता येतील. ग्राहकांना त्यांच्या सोयीप्रमाणे आणि कोणत्याही क्षणी सुरक्षितपणे आपली वाहने चार्ज करता येतील. ही चार्जिंग स्टेशन्स कारच्या बॅटरीचे चार्जिंगची सद्य्स्थिती तसेच कार चार्जिंग करताना किती यूनिट वीजेचा वापर करते, याबाबतही देखरेख ठेवणार आहे.

टाटा पॉवरने नजीकच्या भविष्यात मुंबई परिसरात विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची योजना आखली असून त्याबाबत विविध समभागधारकांशी बोलणी सुरू केली आहे, असेही टाटा पॉवरतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.