भारत व सिंगापूर या दोन देशात धोरणात्मक भागीदारीवर भर देण्यात आला असून सायबर सुरक्षा, जहाज बांधणी, नागरी हवाई वाहतूक या क्षेत्रात एकूण १० करारांवर मंगळवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरचे पंतप्रधान ली सियान लुंग यांची भेट घेतली. सिंगापूरचे अध्यक्ष टोनी टान केंग यांचीही त्यांनी येथील दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी भेट घेतली. अध्यक्षांचे कार्यालय व निवासस्थान असलेल्या इस्ताना येथे मोदी यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
दोन्ही देशांच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, भारत व सिंगापूर यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणखी सखोल व व्यापक केले जातील. राजकीय, संरक्षण, सुरक्षा व अर्थ या क्षेत्रात सहकार्य वाढवले जात असून लोकपातळीवर संपर्क वाढवला जाईल. या भागात स्थिरता नांदावी व आर्थिक वाढ व्हावी हा दोन्ही देशांचा उद्देश आहे.
यावेळी दोन्ही देशांमध्ये संरक्षण सहकार्य, संरक्षण मंत्र्यांमध्ये संवाद, संयुक्त लष्करी कवायती, संरक्षण उद्योगात सहकार्य याबाबत करार झाले. आसियान संस्कृती संग्रहालयाशी कलावस्तूंबाबत करार झाला. भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक, भारतीय माहिती व तंत्रज्ञान विभाग व सिंगापूर संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक व सिंगापूर सायबर सिक्युरिटी एजन्सी यांच्यात समझोता करार झाले त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सायबर सुरक्षा माहितीची देवाण-घेवाण केली जाईल, भारतीय विमानतळ प्राधिकरण व सिंगापूर को-ऑपरेशन एंटरप्राइज यांच्यात जयपूर व अहमदाबाद येथील विमानतळाबाबत करार झाला. भारताचा अमलीपदार्थ नियंत्रण विभाग व सिंगापूरचा अमलीपदार्थ नियंत्रण विभाग यांच्यात अमली पदार्थाची तस्करी रोखण्याचा करार झाला.

विदेशी गुंतवणुकीला आकर्षिण्यासाठी भारतात आणखी आर्थिक सुधारणा राबविण्याचे ग्वाही मी तुम्हाला देतो. येथील गुंतवणूकदारांनी थोडासा धीर धरावा. पुढील वर्षांपासून लागू होणाऱ्या वस्तू व सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीनंतर चित्र बदललेले दिसेल. नियमन आणि करविषयक सुलभतेसाठी विविध १४ महत्त्वाची पावले सरकारद्वारे उचलली गेली आहेत. गेल्या दीड वर्षांत अर्थव्यवस्था रुळावर आली आहे. पायाभूत सेवा क्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा विस्तारून आम्ही खुल्या अर्थव्यवस्थेचा प्रत्यय दिला आहे.

सिंगापूरस्थित स्टार्ट-अप कंपनीत रतन टाटा यांची गुंतवणूक
नवी दिल्ली : सिंगापूरस्थित डाटा कंपनी असलेल्या क्रेयॉन डाटामध्ये टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी आपली वैयक्तिक गुंतवणूक केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यावर असतानाच टाटा यांच्यामार्फत झालेली ही गुंतवणूक जाहीर करण्यात आली आहे. मात्र टाटा यांच्याकडून किती रक्कम कंपनीत जमा झाली, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. क्रेयॉन डाटाच्या जंगल व्हेंचर्सचे टाटा हे सध्या सल्लागार आहेत. क्रेयॉन डाटाने यापूर्वी एक कोटी सिंगापूर डॉलरची निधी उभारणी केली आहे. तर टाटा यांनी यापूर्वी स्नॅपडिल, कार्याह, अर्बन लॅडर, ब्ल्यूस्टोन, कारदेखो, शिओमी, ओलासारख्या अनेक ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. टाटा समूहातील निवृत्तीची तीन वर्षे पुढील महिन्यात होत असताना रतन टाटा हे सध्या कलारी कॅपिटल या अन्य एका स्टार्ट-अप कंपनीचे सल्लागार म्हणूनही काम पाहत आहेत.