देशातील सर्वात जुने फंड घराणेही भांडवली बाजारात उतरू पाहत आहे. यूटीआय म्युच्युअल फंडाच्या प्राथमिक खुल्या भागविक्रीबाबत केंद्रीय अर्थखात्याशी चर्चा झाली असून येत्या सहा महिन्यात कंपनी बाजारात धडक देईल.
यूटीआय म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक लिओ पुरी यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. याबाबतच्या कंपनीच्या प्रस्तावावर महिन्याभरात चर्चा होऊन पुढील सहा महिन्यात प्रत्यक्ष भागविक्री होईल, असेही ते म्हणाले.
कंपनी सध्या स्थापनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. १९६४ ची स्थापना असलेल्या यूटीआयमार्फत सप्टेंबर २०१४ अखेर होणारे वित्तीय व्यवस्थापन ८३,२५० कोटी रुपयांचे आहे.
यूटीआयच्या विविध १२८ हून अधिक योजनांचे ९५.८० लाख गुंतवणूकदार आहेत. स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, भारतीय आयुर्विमा महामंडळ या सार्वजनिक बँक व विमा कंपनी सध्या यूटीआयमध्ये भागीदार आहेत, तर उर्वरित २६ टक्के हिस्सा हा अमेरिकेच्या टी रोवे प्राईस या वित्तसंस्थेचा आहे. यूटीआय म्युच्युअल फंडाने २००८ मध्येही भागविक्रीसाठी प्रयत्न केला होता. त्यासाठी ४.८ कोटी समभाग उपलब्ध करून देण्याची तयारी तत्कालीन विपरित बाजार स्थितीमुळे माघारी घेण्यात आली. यानंतर प्रमुख चार बँकांनी आपला हिस्सा काहीसा कमी करत अमेरिकन गुंतवणूक कंपनीला विस्तार करण्यास मुभा दिली.
अर्धशतकी वाटचालीचे विशेष टपाल तिकीट
पहिली निधी व्यवस्थापन क्षेत्रातील कंपनी असलेल्या यूटीआय म्युच्युअल फंडाच्या ५० वर्षांच्या वाटचालीबद्दल टपाल विभागामार्फत बुधवारी टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आले. यावेळी केंद्रीय दळणवळण व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद व टपाल सेवा मंडळाच्या सदस्या अंजली देवाशर व यूटीआयचे व्यवस्थापकीय संचालक लिओ पुरी उपस्थित होते.