देशातील पहिल्या महिला बँकेने गेल्या सात महिन्यांत ठेवी व कर्जाचा अनुक्रमे ८० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. भारतीय महिला बँकेद्वारे वितरित करण्यात आलेल्या कर्जाची रक्कम ८७ कोटी रुपयांहून अधिक नोंदली गेली आहे. तर बँकेच्या ठेवींची रक्कम ८२ कोटी रुपये राहिली आहे. बँकेच्या १२ हजार खातेदारांपैकी ८५ टक्के या महिला खातेदार आहेत.
महिलांसाठी वित्तीय सेवा देणाऱ्या या बँकेची स्थापना कंपनी कायदा १९५६ अंतर्गत ऑगस्ट २०१३ मध्ये झाली. बँकेच्या संचालक मंडळावर अध्यक्षांसह सर्व महिला सदस्या असून मार्च २०१४ अखेर बँकेच्या शाखांची संख्या २० हून अधिक झाली आहे. जवळपास सर्व राज्यांच्या राजधानीत त्या आहेत. कंपनीच्या अध्यक्षा उषा अनंतसुब्रमण्यम यांनी चालू आर्थिक वर्षांत बँक आणखी ६० शाखा सुरू करेल, असा मनोदय व्यक्त केला आहे. याद्वारे बँकेचा शिरकाव निमशहरांमध्ये होईल.
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान अशा प्रकारच्या महिला वर्गासाठीच्या विशेष बँकेची घोषणा केली होती. यानंतर संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी व पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत या बँकेचा शुभारंभ मुंबईतून झाला. नवी दिल्लीत मुख्यालय असलेल्या या बँकेच्या सात शाखांद्वारे सुरुवात करण्यात आली.
महिला वर्गाला अर्थसहाय्य करण्याच्या दृष्टिने बँकेने गेल्या काही महिन्यांपासून आपल्या सेवा योजनांचा विस्तार केला आहे. याअंतर्गत बँक आता सौंदर्य निगा क्षेत्रातील दालने विस्तारासाठीही अर्थ पुरवठा करत आहे.