जागतिक स्तरावरील स्मार्टफोन बाजारपेठेत आघाडीवर असलेल्यी शिओमीच्या माध्यमातून पहिल्या चीनी मोबाईल कंपनीची भारतातून निर्मिती होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. कंपनी तैवानच्या फॉक्सकॉनच्या सहकार्याने दक्षिण भारतातून आपल्या स्मार्टफोनचे उत्पादन सुरू करत आहे.
आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममधील श्री सिटीमध्ये शिओमीचा भारतातील प्रकल्प असेल. येथे कंपनीच्या रेडमी २ प्राईम या स्मार्टफोनची जुळवणी होईल. सोमवाही याबाबतच्या करारावर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू व शिओमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनू जैन यांनी स्वाक्षरी केली. ६,९९९ रुपये किंमतीचा हा पहिला फोन सोमवारपासूनच विक्रीकरिता फ्लिपकार्ट, स्नॅपडिल, अॅमेझॉन व्यासपीठावरही उपलब्ध झाला.
शिओमीचा एमआययूआय७ हा चर्चेतील स्मार्टफोनही येत्या १९ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत सादर केली जाण्याची अटकळ आहे. भारताच्या माध्यमातून चीनचा हा नवा फोन आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रथमच उपलब्ध होत आहे. तत्पूर्वी मायभूमीत १३ ऑगस्टला तो केवळ सादर केला जाईल.
शिओमीचे रेडमी नोट २, मि५ हे ५ इंचीपेक्षा अधिक मोठे असलेले स्मार्टफोनही येत्या काही महिन्यांमध्ये बाजारात येतील.
शिओमीने गेल्याच वर्षी भारतातून व्यवसायास प्रारंभ केला. शिओमी या चीनी कंपनीचे भारता व्यतिरिक्त चीन वगळता ब्राझीलमध्येही उत्पादन केंद्र आहे. ब्राझीलमध्येही शिओमीने फॉक्सकॉनचे सहकार्य घेतले आहे. शिओमीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला पाठबळ मिळत असल्याचे मुख्यमंत्री नायडू यांनी सांगितले.
शिओमीचे भारतात ३० लाखांहून अधिक मोबाईल विकले गेले आहेत. तिचे रेडमी १एस, रेडमी २, रेडमी नोट, मि३, मि४ व मिपॅड आदी स्मार्टफोन आहेत.
पदार्पणातील पहिल्या पाच महिन्यातच कंपनीने भारतात १० लाख मोबाईल विकल्याचा दावा केला होता. कंपनीचे फोन सॅमसंग, अॅपलबरोबर स्पर्धा करणारे आहेत. भारतात सध्या सॅमसंग, मायक्रोमॅक्स, स्पाईससारख्या स्मार्टफोनची जुळवणी होते. भारतात मोबाईल निर्मितीसाठी एचटीसी, आसुस, मोटोरोला, जिओनी आदी कंपन्याही उत्सुक आहेत.