वजन व आकाराला भारदस्त, त्याचबरोबर किमतीतही आघाडी घेणाऱ्या यामाहाने कमी किमतीतील मोटरसायकल बनविण्याचे निश्चित केले आहे. ‘स्पोर्ट्स बाईक’साठी ओळखल्या जाणाऱ्या मूळच्या जपानी कंपनीने भारतीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी ३० हजार रुपयांपर्यंतच्या दुचाकी निर्मितीचे ध्येय राखले आहे. १०० ते १२५ सीसी इंजिन क्षमतेची ही वाहने असतील.
कंपनीने सोमवारी नवी दिल्लीत एफझेड श्रेणीतील दोन नव्या मोटरसायकली सादर केल्या. यावेळी यामाहा इंडियाच्या संशोधन व विकास विभागाचे व्यवस्थापकीय संचालक तोशिकाझु कोबायाशी यांनी कंपनी ५०० डॉलर किमतीच्या दुचांकीवर काम करत असल्याचे सांगितले. गाडीचे नाव व इंजिनक्षमता याबाबत त्यांनी यावेळी काहीही स्पष्ट केले नाही.
ही दुचाकी भारतात केव्हा येणार याबाबत काहीही सांगण्यास नकार देणाऱ्या कंपनीच्या विक्री विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असानो मसाकी यांनी अशा प्रकारची स्वस्तातील जपानी कंपनीची दुचाकी ही भारतातच प्रथम आणली जाईल, असे स्पष्ट केले. उत्तर भारतात प्रकल्प असणाऱ्या कंपनीने आपला दुसरा वाहननिर्मिती प्रकल्प चेन्नईतही सुरू केला आहे.
भारतात १०० ते १२५ सीसी इंजिन क्षमतेच्या मोटरसायकलना प्रचंड मागणी आहे. तर यामाहा ही कंपनी येथे १५० सीसी व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या इंजिनावरील दुचाकींची निर्मिती करते. गीअरलेस स्कूटर क्षेत्रात काहीशा उशिरा शिरणाऱ्या यामाहाने आता १०० ते १२५ सीसी इंजिनाची वाहने बनविण्याचे मनावर घेतले असून त्याचीच किंमत ३० हजार रुपयांपर्यंत असेल, असे सांगितले जाते.