लोकसत्ताअर्थब्रह्मच्या मंचावर तज्ज्ञांचा सल्ला

‘लोकसत्ता’तर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘अर्थब्रह्म’च्या यंदाच्या तिसऱ्या वार्षिक अंकाचे प्रकाशन गुरुवार, २८ एप्रिल रोजी माटुंगा (पश्चिम) येथील यशवंत नाटय़ मंदिरमध्ये झाले. वर्ष २०१६-१७ साठीच्या या गुंतवणूकविषयक मार्गदर्शनपर अंकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने यावेळी विविध तज्ज्ञांकडून दिशादर्शन मिळविण्याची संधीही वाचकांना उपलब्ध करून देण्यात आली. उत्सुक वाचकांनी त्यांच्या गुंतवणुकांविषयी तज्ज्ञांना नेमके प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. हीच संधी येत्या मंगळवारी कल्याण-डोंबिवलीकरांनाही मिळणार आहे.

loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : शेवटी आर्थिक फटका शेतकऱ्यांनाच!
Loksatta anvyarth Muslim students beaten up in Savitribai Phule University Pune
अन्वयार्थ: विद्यापीठांतला राजकीय हेका
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप
controversy over bjp candidate from north mumbai piyush goyal statement on rehabilitation of slum on salt pan lands
झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनावरून वादंग; गरीब हटाव हेच भाजपचे धोरण -विरोधकांची टीका, त्याच ठिकाणी घर देण्यासाठी कटिबद्ध -गोयल यांचे प्रत्युत्तर

नुकसान पदरी येणे अपमानास्पद मानू नका!

अजय वाळिंबे
अजय वाळिंबे

केवळ बचतीतून संपत्ती निर्माण होते असे नव्हे. बचतीचे मूल्य हे कालांतराने कमी होत जाणारे असते. विशेषत: सातत्याने वाढणाऱ्या महागाईमुळे आजची बचत भविष्यातील गरजांची पूर्तता करणे कठीणच. भविष्य निर्वाह निधी, अल्पबचत योजना, मुदत ठेवींवरील व्याजदरही कमी कमी होत जाणार. अशा वेळी भांडवली बाजारासारखा गुंतवणुकीचा मार्ग हा मला खरे तर अधिक आकर्षक वाटतो.

पूर्वीच्या तुलनेत सध्या भांडवली बाजारासारख्या व्यवहारात गुंतवणुकीचे व्यवहार करणे खूपच सुलभ झाले आहे. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे ते जलद आणि सुरक्षितही झाले आहे. खऱ्या अर्थाने संपत्ती निर्मिती करावयाची असेल तर भांडवली बाजारात व्यवहार करणे सद्यकाळात खूपच संयुक्तिक ठरेल. तथापि वार्षिक २५ टक्के परतावा राखण्याचे ध्येय बाळगूनच या क्षेत्रात उतरायला हवे.

भांडवली बाजारात कंपन्यांच्या समभागांचे मूल्य जसे कमी होते तसे ते वाढतेही. कंपन्या, त्यांचे उत्पादन यामध्ये जशी विविधता असते, तसेच समभाग मूल्यातही वैविध्य आपल्याला दिसेल. हे कसे जाणणे खूपच महत्त्वाचे आणि त्यासाठी आपण स्वत: अभ्यास करायला हवा. संबंधित क्षेत्रातील माहिती जोपासायला हवी. या मार्गानेच उमद्या पोर्टफोलिओची बांधणी करायला हवी.

व्यवहार करताना होणारे संभाव्य नुकसानही ध्यानात ठेवावे. कोणत्या पातळीपर्यंत नुकसान सोसावे याविषयीचे काही आडाखे ठरलेले असावे. बाजारात होणाऱ्या व्यवहारातून प्रसंगी नुकसान सहन करावे लागणे अपमानास्पद वाटून घेता कामा नये.

बाजारात व्यवहार करताना तांत्रिक ज्ञानही मिळवावे. तुम्हाला बाजारातले काही कळत नसेल तर म्युच्युअल फंडासारखा बाजारात घेण्याचा मार्गही आहेच. बाजारात अप्रत्यक्ष व्यवहार करून तेवढाच लाभ पदरात पाडून घ्यायचा तर म्युच्युअल फंडांचा अभ्यासही आवश्यकच आहे. म्युच्युअल फंडांचाही पोर्टफोलिओ तयार करणे जरुरीचे आहे. संपत्ती निर्माणाकरिता आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे ठरते. योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तरच ती अधिक परतावा देणारी ठरू शकते. समभागांचे व्यवहार करताना स्वस्त आहे म्हणून खरेदी करायचे किंवा कुणी दिलेल्या टिप्सद्वारे निर्णय घेण्याचे धोरण सोडले पाहिजे. नुकसान झाले तरी गुंतवणुकीत सातत्य राखणे सोडू नका.

(वक्ते हे ‘अर्थ वृत्तान्त’चे स्तंभलेखक व शेअर बाजार विश्लेषक)

गुंतवणुकीचे उद्दिष्ट पक्के करा, तरच सुयोग्य मार्ग सापडेल !

 भक्ती रसाळ
भक्ती रसाळ

आर्थिक नियोजन करणे अगदी प्रशासकीय सेवेत असणाऱ्या अभ्यासू अधिकाऱ्यांनाही कठीण गेल्याचे आणि प्रसंगी आर्थिक नुकसान झाल्याची अनेक उदाहरणे सांगता येतील. विचार न करता केलेल्या गुंतवणुकीमुळे भल्याभल्यांची आर्थिक गणिते चुकतात.

विमा काढणे अथवा निवृत्तीनंतर गुंतवणूक करणे हे अनेकांना आर्थिक नियोजन केल्यासारखे वाटते. पण भविष्यातील गरजा वर्तमानातच लक्षात घेतल्या गेल्या तर कठीण वाटणारे आर्थिक उद्दिष्टही नियोजनांद्वारे सोपे बनते. पण लवकर श्रीमंत होण्यासाठी मग चिटफंडसारख्या धोकादायक मार्गाचा अवलंब केला जातो.

सध्या प्रत्येकाचीच जीवनशैली बदलली आहे. आणि महागाईची तऱ्हा देखील. अशा वेळी महागाईचा सामना करणारी आपली गुंतवणूक पद्धती असावी. महागाईसारख्या शत्रुवर मात करायची असेल तर तुमची गुंतवणूक सुरक्षित असायला हवी. त्यासाठी आर्थिक नियोजन आवश्यक आहे.

संपत्ती निर्मिती म्हणजे आपल्या लेखी बचतीची बेरीज असते मात्र तिच्या गुणाकाराकडे आपण लक्ष देत नाही. खऱ्या अर्थाने गुंतवणूक ही परताव्याचा गुणाकार करणारी असायला हवी.

आर्थिक नियोजनाबाबत आपल्यावर अधिकतर नकारात्मक प्रवृत्तींचाच पडदा अधिक असतो. नकारात्मक गोष्टींचा प्रसारही एकाकडून दुसऱ्याकडे तेवढय़ाच वेगाने होतो. सतत कोसळणारा भांडवली बाजार, दलाल स्ट्रीट शेअर बाजार इमारतीकडे डोळे वर करून पाहणारा चिंताग्रस्त गुंतवणूकदार हे चित्र गुंतवणुकीबाबत आपले पाय मागे खेचायला कारणीभूत ठरतात. मात्र ‘चित्ती असू द्यावे समाधान’ ही वृत्ती आता सोडावी लागेल. अशा वृत्तीशी आपण चिकटून राहिलो तर आपणही या नकारात्मक वातावरणात वाहून जाऊ. काळानुरूप बदलणे आवश्यक आहे. आपण बदललो नाही तर भविष्यात आपल्याला तडजोडीशिवाय पर्याय राहणार नाही.

आर्थिक नियोजनाबाबतचे दुर्लक्ष हे अगदी विकसित देशांमध्येही आहे. पण आर्थिक नियोजन ही शास्त्रीय पद्धतीने सिद्ध झालेली बाब आहे. भारतात आता कुठे याबाबत अधिक प्रसार होताना दिसतो आहे.

गुंतवणुकीच्या वेळी नेमके उद्दिष्ट नसणे हेही काही प्रसंगी धोकादायक ठरते. ते असेल तर अगदी बाका प्रसंग येईपर्यंत अशी गुंतवणूक मोडली जात नाही. जोखीम प्रत्येक गुंतवणुकीत असते. पण जोखीमेचा बंदोबस्तही आपल्या हाती असतो. अशी व्यवस्था जेथे नाही, त्या मार्गाला जाऊच नये.

आर्थिक वर्ष संपत असताना आपण घाईघाईने कर वाचविणाऱ्या गुंतवणूक योजना, पर्यायांकडे बघतो. गुंतवणुकीचे उद्दिष्ट केवळ कर वजावटच असेल, तर अशा मंडळींचे आर्थिक स्वास्थ्य अवघडच! विविध गुंतवणूक पर्याय तपासूनच नियोजनाची घडी बसविली पाहिजे. महागाईचा सामना करू शकणारी गुंतवणूक आपण केली नाही तर ते आपल्या आर्थिक स्वास्थ्यासाठी धोकादायक ठरेल.

(वक्त्या या मुंबईस्थित प्रमाणित अर्थनियोजनकार आहेत)

कर वजावट साधन असावे, साध्य नव्हे..

चंद्रशेखर वझे
चंद्रशेखर वझे

अत्यंत किचकट आणि खिशातून भरावा लागत असल्याने कटकटीचा, अशी करांबाबत सर्वसाधारण भावना आहे. पण सरळमार्गाने कर भरणे हेच खऱ्या अर्थाने मन:शांती प्रदान करू शकते. देशातील कर रचना ही सरकारसाठी महसुलाचे स्रोत असली तरी त्यातून संपत्ती निर्मितीचे योगदान हे शेवटी समाजासाठीच उपयोगी ठरणारे असते. कर भरा नाही तर वजावटीसाठी गुंतवणुका करा, दोन्हीतून हेच साध्य होते. कर चुकविणे हे सर्वार्थाने घातक आहे आणि करचुकवेगिरी उत्तरोत्तर अवघडही बनत चालली आहे. कर प्रशासनाची नजर आता अधिक तीक्ष्ण आहे. संपत्तीचे सर्व व्यवहार या नजरेतून हेरले, टिपले जात असतात. कायदेही कठोर झाले आहेत. तर कर प्रक्रिया अधिकाधिक सुलभ आणि पर्यायाने व्यापक सहभाग मिळविण्यास पूरक ठरत जाईल, या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. सरकारची सध्याची यंत्रणाच कराचे प्रत्येक व्यवहार हेरणारी आहे.

ज्याप्रमाणे सरकारचे कर नियोजन हे आपल्यासाठी असते तसेच आपणही व्यक्तिगत कर नियोजन करायला हवे. गुंतवणुकीच्या विविध टप्प्यावर कर सवलत आपल्याला मिळत असते. दंड, व्याज न लागता कर भरणे आणि तो वैध मार्गाने वाचविणे हेच खऱ्या अर्थाने करनियोजनाचे महत्त्व आहे.

कर वाचविणारे अनेक पारंपरिक उपाय आहेत. पण नव्या योजना, सूट सवलतींच्या माध्यमातून येणारे नवे मार्गही जोपासायला हरकत नाही. तरी कर वजावटीचे अवाजवी उपाय खड्डय़ात घालणारेही ठरू शकतात.

तुमची गुंतवणूक कर वाचविण्यासाठी की ती भांडवली वृद्धी साधणारी असायला हवी. या मानसिकतेतून आता बाहेर पडावे लागेल. कर ही आवश्यक बाब, आपली जबाबदारी आहे याचे भान ठेवून करविषयक नियोजनही अत्यावश्यक ठरते. गुंतवणुकीप्रमाणेच कर नियोजनही तज्ज्ञ सल्ल्याने करणे आवश्यक ठरते. करदायित्वाद्वारे संपत्तीचे संरक्षण केले जाऊ शकते. कर नियोजनाची वेळही अनेकदा महत्त्वाची ठरते.

(वक्ते सनदी लेखाकार आणि अनुभवी बँकर आहेत.)

अर्थब्रह्म गुंतवणूकदार सल्ल्याचे पुढचे सत्र मंगळवारी डोंबिवलीत!
loksatta-arthbhramha
मुंबई : सर्वसामान्यांना पडणाऱ्या गुंतवणूकविषयक प्रश्नांची उकल करणारी गुरुकिल्ली म्हणून लोकप्रिय ठरलेल्या ‘अर्थब्रह्म’चा २०१६-१७ सालचा तिसऱ्या वार्षिकांकचे प्रकाशन आणि गुंतवणूकदार सल्ला कार्यक्रमाच्या मालिकेतील दुसरा कार्यक्रम मंगळवारी, ३ मे रोजी डोंबिवलीत योजण्यात आला आहे.  ‘रिजन्सी ग्रुप’ प्रस्तुत या गुंतवणूकदार मार्गदर्शन कार्यक्रमासाठी ‘बीएनपी पारिबा म्युच्युअल फंड’ यांचे सहप्रायोजकत्व लाभले आहे. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘केसरी’ आणि ‘नातू परांजपे’ यांनीही हा कार्यक्रम पुरस्कृत केला आहे. बदलत्या गुंतवणूक वातावरणात साजेशा पर्यायांचे गुंतवणूक विश्लेषक अजय वाळिंबे, आर्थिक नियोजनकार भक्ती रसाळ आणि कर सल्लागार व सनदी लेखाकार चंद्रशेखर वझे या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन आणि थेट प्रश्न विचारून, शंका निरसनाची संधी या निमित्ताने मिळेल.

केव्हा, कुठे?

मंगळवार, ३ मे २०१६

वेळ : सायं. ६ वाजता

स्थळ : आगरी समाज मंदिर सभागृह, प्रगती कॉलेज, डी. एन. सी. रोड, आयरे, डोंबिवली (पूर्व)

प्रवेश : विनामूल्य, आसनक्षमतेपुरता

शब्दांकन : वीरेंद्र तळेगावकर