डाईसी डी, ज्युलिएट, रेड रोज जॉकी या नाममुद्रा बाजारात प्रबळ आहेत. स्त्री व पुरुषांच्या अंतर्वस्त्रांची देशी बाजारपेठ १०,००० कोटींची आहे. केवळ स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांची बाजारपेठ ६,००० कोटींची आहे. शिवाय ही बाजारपेठ दरवर्षी १४% दराने वाढत आहे.

राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ पुन्हा एकदा जागा होऊन विक्रमादित्यास प्रश्न विचारू लागला. ‘‘बाजाराची काय खबर’’? वेताळाने विचारले.

‘‘बाबा रे! येत्या फेब्रुवारी महिन्यात येत असलेल्या ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने बाजारात ‘लवेबल लाँजरी’ची चर्चा आहे. फ्रेंच भाषेत ‘लाँजरी’ याचा अर्थ लिनन. १९२२ मध्ये सर्वप्रथम स्त्रियांच्या अंतर्वस्त्रासाठी हा शब्द वापरला गेला. एकोणिसाव्या शतकाच्या अंतापर्यंत स्त्रिया बोजड अंतर्वस्त्रे वापरत असत. विसाव्या शतकाच्या आरंभी अमेरिकेच्या मेरी फेल्स जेकॉब यांनी स्त्रियांच्या अंतर्वस्त्राचे ‘ब्रेसियर’ हे पेटंट घेतले व ही आधुनिक कंचुकी व्यवसायाची सुरुवात ठरली.’’ राजाने वेताळाची उत्सुकता चाळवीत सांगितले.

‘‘भारतात स्त्री व पुरुषांच्या अंतर्वस्त्रांची बाजारपेठ १०,००० कोटींची असून केवळ स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांची बाजारपेठ ६,००० कोटींची आहे. ही बाजारपेठ दरवर्षी १४% दराने वाढत आहे. स्त्रियांची अंतर्वस्त्रांची बाजारपेठ इकॉनॉमी, मिड सेगमेंट, प्रीमियम व सुपर प्रीमियम या गटांत विभागली आहे. हे चार गट प्राधान्याने अंतर्वस्त्राची किंमत, वापरलेला कच्चा माल व ब्रँड यावर ठरत असतात. यापकी मागील पाच वर्षांत इकॉनॉमी व मिड सेगमेंट हे सरासरी १४% दराने वाढले तर ते प्रीमियम व सुपर प्रीमियम या गटातील विक्री २२ टक्क्यांनी वाढली. मिड सेगमेंट हा संख्येने सर्वाधिक ५५% हिस्सा असलेला असून त्या खालोखाल इकॉनॉमी, प्रीमियम व सुपर प्रीमियम असा क्रम लागतो. इकॉनॉमी व मिड सेगमेंट या गटात अनब्रँडेड व काही स्थानिक ब्रँड प्रबळ आहेत. प्रीमियम व सुपर प्रीमियम गटात मोठी स्पर्धा असून स्टाइल कट, फॅशन यावर या अंतर्वस्त्रांची किंमत ठरते,’’ राजाने एका दमात माहिती दिली.

‘‘इकॉनॉमी गटात डाईसी डी, ज्युलिएट व रेड रोज हे ब्रँड प्रबळ आहेत. मिड सेगमेंट गटात जॉकी, ज्युलिएट, फ्लोट या ब्रँडचे वर्चस्व आहे. प्रीमियम व सुपर प्रीमियम गटात, लवेबल, जॉकी, एनमोर, व्हॅनिटी फेअर, व्हिक्टोरियाज सिक्रेट या ब्रँडचे वर्चस्व आहे. सुपर प्रीमियम गटात लवेबल, ट्विन्स, प्रेटी सिक्रेट, नायके, फ्लोरेट, व्हॅनिटी फेअर व्हिक्टोरियाज सिक्रेट हे प्रमुख स्पर्धक आहेत,’’ राजाने माहिती पुरवली.

‘‘पूर्वी एखाद्या जिन्याखालच्या चिंचोळ्या दुकानात अंतर्वस्त्रांची चोरी-छुपके खरेदी होत असे. वर उल्लेख केलेल्या ब्रँडनी मॉलमध्ये एक्सक्लुसिव्ह शोरूम उघडून काचेआड आपली उत्पादने डिस्प्ले केली. ज्याला ‘इम्पल्स बाइंग’ असे म्हणतात त्या खरेदीस उद्युक्त करणारी ही दालने आहेत. या वस्त्रांचे प्रदर्शन इतके आकर्षक असते की गरज नसताना खरेदीचा मोह ललनांना होतोच. अंतर्वस्त्रांची लखलखीत दालने आली. या दालनांच्या ट्रायल रूममध्ये एखादी नवयौवना ‘‘सांग दर्पणा कशी ही दिसते’’ असे न विचारता बरोबर आलेल्या बॉयफ्रेंडचे ‘तिच्या’बद्दलचे मत अजमावताना दृष्टीस पडते, इतका मोकळेपणा या खरेदीत आला आहे. वय वष्रे २५ ते ५० या वयोगटातील स्त्रियांच्या वस्त्रांचे फॅशनच्या नावाखाली जाळीचे ब्लाउज, खोल गळे असणारे टॉप, बॅकलेस, ऑफ शोल्डर, स्पॅगेटी, हॉटर नेक या फॅशन प्रकारामुळे स्ट्रॅप लेस, ट्रान्सपरंट स्ट्रॅप असणाऱ्या अंतर्वस्त्राची आवश्यकता भासू लागली. प्रत्येक ड्रेससोबत एक साजेसे अंतर्वस्त्र असणे अपरिहार्य बनले. जितका ड्रेस बोल्ड तितकी अंतर्वस्त्रे महाग हे समीकरण बनले. जी अंतर्वस्त्रे बाह्य़ वस्त्रांच्या खाली झाकले जात त्याला प्रदर्शनाचे रूप मिळाल्यावर त्यांच्यात सौंदर्य व नजाकत असणे अपरिहार्य झाले. पूर्वी स्त्रिया नोकरी करीत नसल्याने आíथक परावलंबित्व होते. स्त्रिया मोठय़ा संख्येने कमावत्या झाल्याने त्यांचे आíथक निर्णय त्या स्वत: घेऊ लागल्या. आपण कमविलेला पसा कुठे खर्च करावा याचा निर्णय घेण्याचा अधिकार आल्याचा फायदा प्रीमियम व सुपर प्रीमियम गटातील विक्रीतील वाढ सर्वाधिक आहे. स्त्रिया विवाह व विशेषत: हनिमून किंवा एखाद्या विशेष प्रसंगी वापरावयास एखादी २५०० ते ३००० दरम्यान किंमत असलेले प्रसंगी १०,०००चे अंतर्वस्त्र सहज खरेदी करतात. कमावत्या स्त्रियांना हे उत्पादक टाग्रेट आहेत.

‘लवेबल लाँजरी’ची या कंपनीने पहिल्या सहा महिन्यांत ११३.५७ कोटींच्या विक्रीवर १६.६१ कोटी नफा मिळविला आहे. स्वस्त कापसामुळे कच्चा माल स्वस्त झाला. परिणामी कंपनीची नफाक्षमता वाढली आहे. तसेच रुपयाच्या तुलनेत डॉलर महाग झाल्याने आयात करणाऱ्या स्पर्धक कंपन्यांची उत्पादने महाग झाल्याचा फायदा स्थानिक उत्पादक म्हणून ‘लवेबल’ला होत आहे. सहा महिन्यांत ३०० रुपयांचा भाव गाठण्याच्या उद्देशाने या शेअरची जाणकार खरेदी करीत आहेत. या कंपनीच्या समभागाचा अंतर्भाव रिलायन्स म्युच्युअल फंडाने आपल्या मिड अँड स्मॉल कॅप फंडाच्या गुंतवणुकीत केला असून अन्य मिडकॅप फंडाच्या गुंतवणुकांतही याचा अंतर्भाव सुरू आहे. कायम चच्रेत असलेल्या सनी लिओनीचे चोरीला गेलेले अंतर्वस्त्र हा मागे चच्रेचा विषय होता. या अंतर्वस्त्राची किंमत म्हणे ५०,००० होती. सनीचे अंतर्वस्त्र म्हटल्यावर इतकी किंमत असायचीच. ही कंचुकी लवेबलची होती हे विशेष,’’ राजा म्हणाला.

‘‘ठीक, तर राजा,’’ वेताळ म्हणाला व विक्रमादित्याचे मौन भंग होताच वेताळ प्रेतासहित दूर झाला व पुन्हा स्मशानातील झाडाला लटकू लागला.

gajrachipungi @gmail.com