ई-विमा ही संकल्पना एक कालसुसंगत अपरिहार्यता असून, लवकरच ती वास्तवात उतरणार आहे. असे झाले तर विमा पॉलिसीचे दस्तावेजदेखील शेअर्ससारखे डिजिटल व कागदविरहीत होतील आणि पॉलिसीधारकांची आपल्या विमा पॉलिसीचे कागदपत्र  जपून ठेवण्याच्या कटकटीपासून सुटका होईल.
विमा  नियमन व विकास प्राधिकरण (इर्डा)कडून ई-विमा अनिवार्य करण्याच्या दृष्टीने लवकरच घोषणा होण्याची चिन्हे आहेत. याअंतर्गत विमा कंपन्यांना आपल्या ग्राहकांना पॉलिसी विकताना इलेक्ट्रॉनिक स्वरूपातच विकणे बंधनकारक असेल. सुरूवातीला ज्या पॉलिसींचा वार्षकि तत्त्वावरील प्रीमियम २५ हजार रूपयांहून जास्त आहे किंवा प्रीमियम अदा करण्याचा कालावधी १० वर्षांहून जास्त आहे, त्या पॉलिसी सर्वप्रथम इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देऊ करण्यात येतील. ही तरतूद आयुर्विमा आणि सर्वसाधारण अशा दोन्ही प्रकारच्या विमा पॉलिसींना लागू आहे. पुढे जाऊन सूक्ष्म-विमा पॉलिसीदेखील इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येतील.
हा बदल ध्यानात घेता विमा रिपॉझिटरी म्हणजे काय असते, ई-विमा खाते कसे उघडावे, तुमच्या कागदी पॉलिसीचे रूपांतर ई-पॉलिसीमध्ये कसे करून घ्यावे आणि या सर्वाचे फायदे काय असतात हे समजून घेणे महत्त्वपूर्ण ठरते.


डिमॅट स्वरूपातील शेअर्ससाठी असणाऱ्या डिपॉझिटरीच्या धर्तीवर ई-पॉलिसींसाठी विमा रिपॉझिटरी ही कंपनी कायदा १९५६ अन्वये स्थापन केली गेलेली असेल आणि या कायद्याअंतर्गत नोंदणीकृत असलेली कंपनी असेल. तिला विमाधारकांच्या वतीने विमा  पॉलिसींचा डेटा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवून ठेवण्याकरिता ‘इर्डा’द्वारे नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
ई विमा खाते (ई आयए) :
पॉलिसी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवण्याकरिता आणि विकत घेण्याकरिता पॉलिसीधारकाने विमा  रिपॉझिटरीमध्ये एक ई विमा खाते उघडणे गरजेचे असेल. पॉलिसीधारक कोणत्याही विमा  रिपॉझिटरीसोबत एक आणि एकच खाते उघडू शकतो. ईआयए तयार झाले की खातेधारक वेगवेगळ्या विमा पुरवठादारांकडून विकत घेतलेल्या आपल्या सर्व विमा पॉलिसी एकाच खात्यामधून- मग ती आयुर्विमा, निवृत्ती, आरोग्य किंवा सर्वसाधारण अशा कोणत्याही प्रकारची पॉलिसी असू देत- इलेक्ट्रॉनिक स्वरूपात विकत घेऊ शकतो किंवा जतन करून ठेऊ शकतो.
ई-विमा खाते उघताना जे फॉम्र्स सुपूर्द कराल त्यासोबत तुमच्या कागदोपत्री असलेल्या पॉलिसींचे रूपांतर ई-पॉलिसींमध्ये करण्याची विनंतीही जोडली जाऊ शकते. ई विमा खाते उघडल्यावर पॉलिसीधारक नव्या पॉलिसी विकत घेताना फक्त ईआयए क्रमांक देऊ करायचा आहे. पॉलिसीधारक कागदोपत्री असलेल्या पॉलिसींचे रूपांतर ई-पॉलिसींमध्ये करण्याकरिता विमा रिपॉझिटरी किंवा विमा कंपनी किंवा एजंटकडे त्यासंबंधीचे रूपांतरण फॉम्र्स सुपूर्द करू शकतात.
विमा पॉलिसी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवण्याचे मुख्य फायदे खालीलप्रमाणे –
सुरक्षा : कागदोपत्री असलेल्या पॉलिसी गहाळ होण्याची किंवा तिला हानी पोहोचण्याची शक्यता असते, जी शक्यता इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पॉलिसींच्या बाबतीत शक्य नाही. इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पॉलिसी गरज असेल तेव्हा, कधीही आणि कुठूनही उपलब्ध होऊ शकते. आपले ई विमा खाते उघडून पॉलिसीची एक प्रत डाऊनलोडही करून घेता येऊ शकते.
सिंगल व्ह्य़ू : आयुर्विमा, निवृत्ती, आरोग्य किंवा सर्वसाधारण अशा कोणत्याही प्रकारच्या पॉलिसी असू देत, त्या सर्व एकाच ई- विमा  खातेअंतर्गत ठेवता येतात. याचाच अर्थ असा की सर्व पॉलिसींचे तपशील हे एकाच खात्यामध्ये एका नजरेत दिसू शकतात आणि त्यांचे सोयीस्कर पद्धतीने व्यवस्थापन करता येऊ शकते.
एकाच ठिकाणी मिळणाऱ्या सेवा :
ई विमा खात्याशी संबधित कोणताही विनंती अर्ज किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पॉलिसी कोणत्याही विमा रिपॉझिटरीच्या सíव्हस पॉईंट्सवर सुपूर्द करता येऊ शकतो. इर्डा त्यासंबंधात त्या त्या विमा कंपन्यांना सल्ले देईल आणि पॉलिसीधारकाचे विमा पुरवठादाराकडे जाण्याचे कष्ट वाचतील.
सामाईक केवायसी :  ई-विमा खातेधारकाला आता प्रत्येक वेळी नवी पॉलिसी घेताना ‘नो युअर कस्टमर- केवायसी’चे तपशील देण्याची गरज भासणार नाही. तसेच, घराच्या पत्त्यात बदल झाल्यास किंवा संपर्क क्रमांक बदललल्यास एकाच विनंती अर्जातून सर्व पॉलिसींवर इच्छित बदल करून घेता येऊ शकेल. त्यामुळे वेळ आणि ऊर्जा दोन्हीही वाचतील.
खाते विवरण :
विमा रिपॉझिटरी वर्षांतून एकदा ई-विमा  खातेधारकाला खाते विवरण देईल. त्यामध्ये त्या खात्यातील ई-पॉलिसींचे तपशील असतील.
पेमेण्टविषयक पर्याय :
सर्व पॉलिसींचे प्रीमियम ऑनलाईन भरता येतील आणि सेवाविषयक विनंत्याही या ई विमा  खात्यामधून ऑनलाइन करता येतील.
सíव्हस टच पॉईंट्सची वाढती संख्या :
काही कंपन्यांकडे सेवा केंद्रांचे अतिशय विस्तृत जाळे आहे. ही केंद्रे पॉलिसीधारकांकरिता टच पॉईंट्स- संपर्काचे काम करतील आणि त्यांच्या सेवाविषयक गरजांची पूर्तता करतील.
लाभांशाचे वितरण (पे-आऊट) :
लाभांशाचा पे-आऊट हा विमाधारकाच्या नोंदणीकृत बँक खात्यामध्ये इलेक्ट्रॉनिक सुविधेमार्फत थेट जमा केला जाईल. त्यामुळे सुरक्षित, जलद आणि खात्रीशीर व्यवहारांची हमी मिळेल.
पॉलिसीधारकांच्या बाबतीत काही दुर्दैवी प्रसंग घडल्यास त्याचे ई विमा खाते उपलब्ध होण्याकरिता तो एखाद्या व्यक्तीच्या नावाची वारस म्हणून नोंदणी करू शकतो. ही नोंदणीकृत व्यक्ती ई विमा खाते उघडून पॉलिसीधारकांच्या सर्व ई-पॉलिसी एका नजरेत पाहू शकते आणि त्यांनतरच्या कार्यवाहीकरिता रिपॉझिटरीशी संपर्क साधू शकते.
ई विमा खाते उघडल्याने आणि कागदोपत्री असलेल्या पॉलिसींचे रूपांतर ई-पॉलिसींमध्ये केल्याने मिळणारे हे सर्व लाभ पॉलिसीधारकाला अगदी मोफत देऊ करण्यात आले आहेत. पॉलिसीधारकाला कोणतेही शुल्क भरायला लागणार नाही या तरतूदीमध्ये कोणत्याही छुप्या अटी नाहीत कारण आयआर विमा  कंपन्यांद्वारा भरला जाणार आहे.
प्रत्येक विमा रिपॉझिटरीकडे पॉलिसीधारकाच्या रिपॉझिटरी सेवा आणि इलेक्ट्रॉनिक पॉलिसींशी संबधित प्रश्नांचे समाधान करण्याकरिता तक्रार-निवारण कक्ष (ग्रीव्हान्स सेल) असेल.
रिपॉझिटरी आणि ई पॉलिसीची संकल्पना हा इर्डाद्वारे घेतला गेलेला एक क्रांतिकारक पुढाकार आहे. त्यामुळे पॉलिसीधारक, विमा  कंपन्या, एजंट्स आणि इर्डा या सर्व भागधारकांना सारखाच लाभ होणार आहे.
(लेखक कॅम्स रिपॉझिटरी सव्र्हिसेसचे मुख्याधिकारी आहेत)