उपलब्धी बाजार अर्थात Derivative Market संबंधीच्या या अभ्यास वर्गाचा जवळपास निम्मा पाठ पूर्णत्वास आला आहे. यातून या बाजारासंबंधी अनभिज्ञता अथवा नाहक भीतीपोटी दूर राहिलेल्या अनेकांच्या समज व धारणा दूर झाल्याचे त्यांनी कळविले आहे. तर अन्य अनेकांकडून आलेल्या सूचना पाहता, होऊन गेलेल्या अभ्यासवर्गाची पुन्हा एकवार उजळणीही आवश्यक असल्याचे ध्यानात आले. त्याच मंडळींची सोय म्हणून या बाजारात वापरात येणाऱ्या मुख्य संज्ञा व संकल्पना पुन्हा एकदा..

विशेषत: १९९० नंतर फ्यूचर्स आणि ऑप्शन्सच्या लोकप्रियतेची मुख्य कारणे –
१फ्यूचर्स बाजाराचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे जवळ शेअर्स नसताना किंवा कमी पसे असतानासुद्धा केवळ १० ते १५ टक्के मार्जिन भरून १००% किमतीवर नियंत्रण ठेवता येत असल्याने या बाजारामध्ये खरेदी किंवा विक्रीच्या ‘पोझिशन्स’ अथवा पवित्रा घेता येतो. खरेदीच्या पवित्र्याला ‘लाँग पोझिशन’ म्हणतात आणि विक्रीच्या पवित्र्याला ‘शॉर्ट सेिलग’ असे म्हणतात.
२सदर व्यवहारावर लागणाऱ्या
शुल्कात आणि उलाढालीवरील करामध्ये फार मोठी कपात होऊन अत्यंत कमी खर्चामध्ये हे व्यवहार होऊ लागले.

फ्यूचर्स आणि ऑप्शन्समध्ये स्वतंत्र शेअर्स उदा. एसबीआय, रिलायन्स तसेच निर्देशांक जसे निफ्टीमध्ये व्यवहार करता येतो. अतिशय जास्त बाजारमूल्य (मार्केट कॅप) असणाऱ्या कंपन्या व ज्यांच्या शेअर्समध्ये निरंतर खरेदी-विक्री (हाय बीटा) होते व ज्यांनी निर्माण केलेल्या सेवा-उत्पादनांमुळे देशाची आíथक स्थिती मोजता येऊ शकते अशा ५० शेअर्सचा गुच्छ म्हणजे ‘निफ्टी’ निर्देशांक आणि ३० शेअर्सचाच गुच्छ म्हणजे ‘सेन्सेक्स’ निर्देशांक होय.

कोणत्याही देशाची आर्थिक प्रगती त्या देशामध्ये असलेल्या उद्योगधंद्यांच्या प्रगतीवर अवलंबून आहे व उद्योगधंद्यांची प्रगती ही त्या क्षेत्रात ओतल्या जाणाऱ्या भांडवलावर अवलंबून आहे. जगाच्या पाठीवर सर्व देशांची प्रगती औद्योगिक परिवर्तनाच्या मार्गाने झाली आहे. अशा औद्योगिक परिवर्तनासाठी मोठय़ा भांडवलाची गरज असते, जे भागभांडवलाच्या रूपाने लोकांकडून म्हणजे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांकडून भागवले जाते. त्यामुळे शेअर बाजार हे अत्यंत आवश्यक असे गुंतवणूक क्षेत्र निश्चितच आहे. शेअर बाजारामधील व्यवहार जोखमीचे आहेत; परंतु जर योग्य प्रशिक्षण घेतले व योग्य अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन घेतले, तर त्यात प्रचंड पसाही आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
शेअर बाजारामध्ये अनेक नवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यापकी फ्यूचर्स आणि ऑप्शन्स म्हणजेच उपलब्धी बाजाराबद्दल (Derivative Market)) सविस्तर माहिती घेऊ या –
रोख बाजार (Cash Market): कमी किमतीमध्ये शेअर्स विकत घेऊन भाव वाढल्यानंतर विकावे किवा जोपर्यंत भाव वाढत नाही तोपर्यंत स्वत:जवळ ठेवून नंतर विकावे असा शेअर बाजारातील गुंतवणुकीचा पारंपरिक प्रकार आहे. या व्यवहाराला रोखीचा व्यवहार म्हणतात आणि अशा बाजाराला रोख बाजार म्हणतात. अशा व्यवहारामध्ये शेअर्सच्या खरेदीची संपूर्ण रक्कम गुंतवावी लागते.
उपलब्धी बाजार (Derivative Market) : रोखीच्या भावावरून त्या शेअर्सचे भविष्यामध्ये काय भाव असतील किवा पुढील एक-दोन अथवा तीन महिन्यांमध्ये भाव कोणत्या स्तरावर जाईल, याचा अंदाज घेऊन जेथे व्यवहार करता येतात त्या बाजाराला ‘उपलब्धी (डेरिव्हेटिव्ह) बाजार’  म्हणतात. या बाजाराला सट्टा बाजार किवा वायदा बाजार असेही संबोधले जाते. या बाजारातील सर्वात लोकप्रिय प्रकार खालीलप्रमाणे आहेत.

भविष्यकालीन बाजार (Futures Market): फ्यूचर्स बाजाराचा इतिहास फार जुना असून जवळपास ३०० वर्षांपूर्वी हा बाजार जगामध्ये पहिल्यांदा अमेरिकेमध्ये वस्तू विनिमय बाजारात (Commodity Market) जन्माला आला. गहू उत्पादन करणारे शेतकरी व कणकेपासून ब्रेड बनवणारे कारखानदार या दोघांनाही बाजारामध्ये किमतीची अनिश्चितता व संभ्रमता सतावत होती. १८४०च्या दरम्यान अमेरिकेचे शिकागो हे शहर व्यावसायिक केंद्र म्हणून उदयास आले. अनेक प्रांतांतले शेतकरी जास्त पसे मिळतील या आशेने शिकागो येथे गहू आणत; परंतु व्यापारी योग्य भाव देत नसत. पुढे शेतकऱ्याजवळ गहू नसताना, परंतु काही महिन्यांनी गव्हाचे उत्पादन होणार असल्याने तो भविष्यकालीन व्यवहार करून स्वत:च्या मालाला योग्य किमत देणारे कारखानदार निश्चित करायचा. त्याचप्रमाणे गव्हाच्या उत्पादनाबद्दल व गव्हाच्या किमती वाढण्याबद्दल भीती असल्याने कारखानदारही योग्य भावात गहू देणारा शेतकरी निश्चित करायचे. थोडक्यात, शेतकरी व कारखानदार दोहोंनाही सोयीचे व्हावे या हेतूने रीतसर ‘फ्यूचर्स मार्केट’चा जन्म झाला. त्यात भविष्यामध्ये विशिष्ट कालावधीमध्ये व विशिष्ट भावामध्ये गहू आणि त्या बदल्यात पसे यांची देवाणघेवाण होऊ लागली. त्यामुळे शेतकऱ्याला भविष्यामध्ये किती पसे मिळतील हे समजायचे व कारखानदाराला किती खर्च येईल, याचा निश्चित पूर्वअंदाज येऊ लागला. हे करार लिखित व्हायचे. पुढे हे करारपत्र सर्वमान्य होऊन ज्यांच्याजवळ हे करारपत्र आहेत ते दुसऱ्याला व दुसरा तिसऱ्याला याप्रमाणे या करारपत्राची खरेदी-विक्री होऊ लागली. जो गहू उत्पादक शेतकरी नाही व जो कारखानदार नाही, असेही अनेक लोक या व्यवसायामध्ये उतरले व करारपत्रांची खरेदी-विक्री करून सट्टा सुरूझाला.
उपलब्धी बाजारामध्ये मुख्यत्वे दोन प्रकारच्या व्यक्ती सहभागी असतात –
१. हेजर्स (Hedgers) : ही मंडळी जवळ असलेल्या शेअर्सना न विकता नजीकच्या काळात भाव खाली येण्याची भीती वाटत असल्याने १० ते १५% मार्जिन भरून फ्यूचर्स मार्केटमध्ये त्या शेअर्सची विक्री करतात किंवा कमी किमतीचे पुट ऑप्शन खरेदी करतात. भाव उतरले की शेअर्समध्ये होणारा तोटा फ्यूचर्स किवा ऑप्शन्समध्ये होणाऱ्या फायद्याने भरून निघतो.
२. सट्टा करणारे (Speculators) : बाजारावर सतत लक्ष ठेवून शेअर्सवर जाणार असतील असे वाटत असल्यास फ्यूचर्स खरेदी करणार आणि कालांतराने नफा मिळून विकणार किवा खाली जाणार असे त्यांना वाटत असल्यास ते फ्यूचर्स विकणार व कालांतराने नफा मिळाल्यास मार्केटमधून विकत घेणार.
हे व्यवहार सेबी मान्यताप्राप्त ‘बीएसई’ आणि ‘एनएसई’ या दोन्ही शेअर बाजारांमार्फत होतात. खरेदीदार आणि विक्रेते यांच्यामधील व्यवहारांच्या सचोटीने पूर्ततेची संपूर्ण जबाबदारी बाजार घेत असतात.
फ्यूचर्स बाजारामधील काही संकल्पना:
करारामध्ये शेअर्सची संख्या : प्रत्येक व्यवहार हा करारानुसार (Contract) असून करारामध्ये शेअर्सची संख्या निश्चित केलेली असते. जसे एसबीआयच्या एका लॉटची संख्या १२५ व निफ्टीची ५० असते. त्यामुळे कमीत कमी एक लॉट म्हणजे निफ्टीचे ५० शेअर्स किवा एसबीआयचे १२५ शेअर्स व्यवहार करावे लागतात.
कॅश भाव : कॅश मार्केटमध्ये असलेला भाव हा शेअर्सचा खरा भाव असतो व त्या भावाला स्पॉट/कॅश भाव असे म्हटले जाते.
उपलब्धी भाव : उपलब्धी भाव म्हणजेच डेरिव्हेटिव्ह मार्केटचा भाव व स्पॉट भाव यामध्ये थोडा फरक असतो.
करार सायकल : सदर करार एक-दोन व तीन महिन्यांसाठीचे असतात व एकाच वेळी सर्व करारांमध्ये व्यवहार सुरू असतो. या विविध करारांना करार सायकल म्हणतात.
एक्सपायरी तारीख : ज्या तारखेला हे करार नष्ट होतात त्या तारखांना एक्सपायरी तारीख म्हणतात व एक्सपायरी तारखेला खरेदीदार व विक्रेते यांचे व्यवहार त्यांच्या खात्यामध्ये जमा-वजा करण्यात येऊन व्यवहार पूर्ण करण्यात येतात.
विकल्प (Options) : हा बाजारामधील सर्वात जुना प्रकार आहे. अगदी इसवी सनपूर्व ३३२ मध्ये या प्रकारचा उल्लेख सापडतो. ग्रीस प्रांतातील थेल्स हा हंगामापूर्वी ऑलिव्ह (olive) खरेदी करण्याचे अधिकार विकत घ्यायचा व त्यात त्याने प्रचंड पसा कमावला.
ऑप्शन्स म्हणजे विकल्प किवा पर्याय हा प्रकार फ्यूचर्स व कॅश मार्केटपेक्षा अगदी वेगळा आहे. ऑप्शन्स या प्रकारामध्ये प्रत्यक्ष वस्तूची खरेदी-विक्री न करता भविष्यामध्ये विशिष्ट भावामध्ये खरेदी किंवा विक्री करण्याचे अधिकार खरेदी करणे किंवा विकणे होय. त्याकरिता अधिकार विकत घेणाऱ्याला काही अत्यल्प रक्कम अधिकार विकणाऱ्याला द्यावी लागत असे. यालाच आपण प्रीमिअम म्हणतो. प्रीमिअम भरून ऑप्शन्स खरेदीदार शेअर्स खरेदीचा किंवा विक्रीचा अधिकार विकत घेतो; परंतु कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेत नाही.
१६३६ च्या दरम्यान टय़ुलिप नावाच्या व्यवहारामध्ये युरोप येथे ऑप्शन्सचा फार मोठय़ा प्रमाणात वापर झाला. खरेदी करण्याचा अधिकार एकदा घेतला, की तो ते अधिकार दुसऱ्याला विकायचा आणि दुसऱ्याने तिसऱ्याला तसेच विक्री करण्याचा अधिकार एकाने दुसऱ्याला व दुसऱ्याने तिसऱ्याला विकण्याचा प्रकार होऊन त्यात खूप मोठा सट्टा होत असे.
खरेदीदार खालीलप्रमाणे दोन प्रकारचे अधिकार विकत घेऊ शकतो. अधिकार विकत घेण्यासाठी त्याला प्रीमिअम द्यावे लागते व हे प्रीमिअम विक्रेत्याच्या खात्यामध्ये जमा होते.
१. कॉल ऑप्शन्स : शेअर्स किवा निर्देशांक विकत घेण्याच्या अधिकारास कॉल ऑप्शन्स म्हणतात. म्हणजे एखाद्यास जर असे वाटत असेल की, मार्केट/शेअर्सचे भाव वाढतील, तर तो खरेदीचा अधिकार म्हणजे कॉल खरेदी करेल, कारण जसा बाजार वाढेल तसा कॉलचा भाव वाढेल व कमी किमतीला घेतलेला कॉल जास्त किमतीमध्ये विकून नफा कमवेल.
२. पुट ऑप्शन्स : शेअर्स किंवा निर्देशांक विकण्याच्या अधिकारास पुट ऑप्शन्स म्हणतात. जर एखाद्याला असे वाटत असेल की, निर्देशांक किवा शेअर्सचे भाव कमी होतील, तर तो विकण्याचा अधिकार म्हणजे पुट विकत घेईल व जसजसे भाव खाली उतरतील तसा पुटचा भाव वाढेल व कमी किमतीत घेतलेले पुट जास्त किमतीला विकून नफा कमावेल.
लिमिटेड तोटा व अनलिमिटेड नफा : ऑप्शन्स विकत घेणाऱ्यासाठी लिमिटेड तोटा व अनलिमिटेड नफा असतो. त्याचप्रमाणे ऑप्शन्स विकणाऱ्याला लिमिटेड नफा व अनलिमिटेड तोटा असतो. ऑप्शन्स विकत घेणारा प्रीमिअम देऊन अधिकार घेतो; पण जबाबदारी नाही. तर ऑपशन्स विकणारा प्रीमिअम घेतो व जबाबदारीही घेतो.
ऑप्शन्ससंबंधी काही संकल्पना समजून घेऊ :
स्ट्राइक भाव (strike price): ऑप्शन्स करार हे वेगवेगळ्या भावांचे असतात, त्या भावांना स्ट्राइक भाव असे म्हणतात उदा. एसबीआयचा स्पॉट भाव रु. २,५८१ आहे; परंतु ऑप्शन्स करार रुपये २५००, २५२०, २५४०, २५६०, २५८०, २६००, २६२०, २६४०, २६६० इत्यादी.
मनीनेस: जे कॉल ऑप्शन्स स्पॉट भावापेक्षा कमी भावाचे असतात त्यांना इन द मनी (In The money- ITM) व जे कॉल ऑप्शन्स स्पॉट भावापेक्षा जास्त भावाचे असतात त्यांना आऊट ऑफ द मनी (Out of the Money- OTM) असे म्हणतात.
तसेच जे पुट ऑप्शन्स स्पॉट भावापेक्षा जास्त भावाचे असतात त्यांना इन द मनी (In The money) व जे पुट ऑप्शन्स स्पॉट भावापेक्षा कमी भावाचे असतात त्यांना आऊट ऑफ द मनी (Out of the Money) असे म्हणतात.
स्पॉट भावाच्या जवळपास असणाऱ्या कॉल वा पुटच्या स्ट्राइक भावांना अ‍ॅट द मनी (At the money- ATM) असे म्हणतात.
प्रीमिअम (अधिमूल्य) : ऑपशन्सच्या प्रीमिअममध्ये दोन गोष्टी अंतर्भूत असतात-
१. इन्ट्रेन्सिक व्हॅल्यू : स्ट्राइक भाव व स्पॉट भावमधला फरक.
२. टाइम व्हॅल्यू : प्रिमिअम वजा इन्ट्रेन्सिक व्हॅल्यू.
उदा. एसबीआयचा स्पॉट भाव २,५८१ रुपये आहे; परंतु ऑप्शन्स करार २,५२० रुपयांवर. याचा अर्थ १९० रुपये प्रीमिअम (अधिमूल्य) आहे. म्हणजे इन्ट्रेन्सिक व्हॅल्यू ५९ (२५८१-२५२०) व टाइम व्हॅल्यू १३१ आहे (१९०- ५९).
प्रशिक्षणाच्या दरम्यान माझ्या संपर्कात आलेल्या अनेक ट्रेडर्सशी बोलताना असे जाणवले की, त्यांना ऑप्शन्सवर परिणाम करणाऱ्या गोष्टी, टाइम व्हॅल्यू, ऑप्शन्स सेन्सिटिव्हिटीस म्हणजे डेल्टा, थिटा, ग्यॅमा इत्यादी स्ट्राइक कसे निवडावे? कोणत्या स्ट्राइकची खरेदी-विक्री करावी? तसेच कोणत्या परिस्थितीमध्ये ऑप्शन्स खरेदी करावे? कोणत्या परिस्थितीमध्ये विकावे याची माहिती नाही. ही माहिती नसल्याने पसे कमवण्याचा अतिशय सुंदर प्रकार असूनसुद्धा ट्रेडर्सचे नुकसान होते. त्यामुळे योग्य प्रशिक्षकाकडून ज्ञान घेऊनच ट्रेड करावे, असा या ठिकाणी सल्ला द्यावासा वाटतो.
ऑप्शन्समध्ये असणारे वरीलप्रमाणे अनेक गोष्टी, खरेदी करण्याचे अधिकार व विक्री करणाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, अमर्याद नफा व अमर्याद तोटा, अनेक एक्स्पायरी सायकल्स इत्यादीमुळे व्यवस्थित अभ्यास केल्यास बाजाराच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये धनलाभ करता येईल, असे अनेक डावपेच (strategy) उपलब्ध आहेत. त्यांची नावे अतिशय मनोरंजक आहेत, जसे Naked Call, Naked Put, Bull Spreads, Bear Spreads, Strangles, Straddles, Butterfly, Ratio Spread, Condor, Calendar Spread
(क्रमश:)
info@primetechnicals.com