फंडाविषयक विवरण
फंडाचा गुंतवणूक प्रकार    :    समभाग गुंतवणूक
जोखीम प्रकार     :    समभाग गुंतवणूक असल्याने धोका अधिक (मुद्दलाची शाश्वती नाही)
गुंतवणूक    :    हा फंड लार्जकॅप प्रकारच्या समभागात गुंतवणूक करतो राष्ट्रीय शेंअर बाजाराचा ‘निफ्टी’ हा निर्देशांक या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. गुंतवणूक केल्यापासून एका वर्षांच्या आत गुंतवणूक काढून घेतल्यास एक टक्का निर्गमन भार येतो. एका वर्षांनंतर गुंतवणूक काढून घेतल्यास निर्गमन भार नाही.
फंड गंगाजळी    :    ३१ मार्च २०१५ रोजी या फंडाची मालमत्ता १,३०७.१६ कोटी     रुपये होती
निधी व्यवस्थापक     :    आर. श्रीनिवासन हे या फंड घराण्याच्या समभाग गुंतवणुकीचे प्रमुख असून ते यात फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. हा फंड मिळून ते एकूण १६,००० कोटींच्या मालमत्तेचे व्यवस्थापन पाहतात. ते २००९ मध्ये एसबीआय म्युच्युअल फंडात दाखल झाले. देशातील सर्व निधी व्यवस्थापकांतून २०१२ सालचे सर्वोत्कृष्ट निधी व्यवस्थापक म्हणून एका अर्थविषयक नियतकालिकाकडून त्यांना गौरविण्यात आले.
गुंतवणूक पर्याय    :    वृद्धी (ग्रोथ) व लाभांश (डिव्हिडंड : पे आउट व रिइंव्हेंस्ट)
फंड खरेदीची पद्धत    :    1800 270 0060 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिला असता  कंपनीचा गुंतवणूकदार सेवा प्रतिनिधी संपर्क करेल. अथवा http://www.sbimf.com संकेतस्थळावरून थेट खरेदी करता येईल.
av-07

गुंतवणूक नक्की लार्जकॅप की मिडकॅपमध्ये असावी, हा नवगुंतवणूकदारांना नेहमीच कोडय़ात टाकणारा प्रश्न असतो. लार्जकॅप गुंतवणुकीला स्थर्य देतात तर मिडकॅप, स्मॉलकॅप व मायक्रो कॅप वृद्धी प्रदान करतात. आजचा एसबीआय मॅग्नम इक्विटी फंड हा लार्जकॅप प्रकारात मोडणारा आहे. या फंडाने आपली पहिली एनएव्ही १ जानेवारी १९९१ रोजी जाहीर केली. या फंडाचे २५ वे वर्ष सध्या सुरु आहे. हा फंड सूचिबद्ध कंपन्यांपकी बाजारमूल्यानुसार पहिल्या शंभर कंपन्याच्या समभागात गुंतवणूक करतो. सध्याच्या बाजारमूल्यांच्या क्रमवारीनुसार किमान २१,००० कोटी व त्याहून अधिक बाजारमूल्य असलेल्या कंपन्या या फंडाच्या गुंतवणूक परिघात आहेत. साहजिकच हा फंड इंडेक्स फंड नसला तरी निधी व्यवस्थापकास किमान ५० टक्के निधी ‘निफ्टी’तील प्रभावानुसार गुंतवावा लागतो. तसेच एखाद्या समभागाचा ‘निफ्टी’तील जितका प्रभाव आहे त्यापेक्षा अधिक उणे चार टक्के या मर्यादेत गुंतवणूक करता येते. आज काही मंडळीना एकावेळी पाच हजार गुंतविणे शक्य असेलच असे नाही. या फंडाला २५ वर्षांची परंपरा असल्याने या फंडात एका वेळी एक हजार रुपये किंवा पाचशे रुपयांच्या ‘एसआयपी’ने सुरवात करता येईल. ज्या काळात आजच्या ‘आयपीओ’ला ‘पब्लिक इश्यू’ म्हटले जात होते व एक हजार रुपये भरून एखाद्या ‘पब्लिक इश्यू’ला अर्ज करणे शक्य होते. त्या काळातील हा फंड असल्याचा हा परिणाम आहे. म्युच्युअल फंडांच्या पोर्टफोलिओत आपल्या गुंतवणुकीची पायाभरणी करणारा एखादा म्युच्युअल फंड असावा. जो म्युच्युअल फंड आपल्या गुंतवणुकीला स्थर्य देईल. आजची योजना मोठी वृद्धी देणारी नसली तरी मोठा नफा किंवा मोठे नुकसान न करणारी आहे. एखाद्या वित्तीय लक्ष्याचा पाठपुरावा करणारी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी (उदाहरणार्थ सेवानिवृत्तीची पूंजी जमा करणे) हा व ज्यांना महागाईच्या दराहून चार ते पाच टक्के अधिक परतावा मिळावा, अशी अपेक्षा आहे त्यांच्यासाठी हा  फंड आदर्श ठरावा. हा फंड आपल्या ‘कोअर पोर्टफोलिओ’चा भाग असावा. या फंडाच्या गुंतवणुकीत वर उल्लेख केलेल्या दिग्गज समभागांचा समावेश असल्याने अर्थव्यवस्थेने सरकारच्या अपेक्षेप्रमाणे पुढील दोन वर्षांत आठ ते नऊ टक्क्यांदरम्यान वृद्धीदर गाठला तर हा फंड १२ ते १४ टक्के दराने परतावा देईल. पण अर्थव्यवस्थेला अपेक्षित वृद्धीदर गाठण्यास अपयश आले तर या फंडातील गुंतवणुकीवरील परताव्याचा दर आठ ते दहा टक्के असेल.
mutualfund.arthvruttant@gmail.com