कबुली- खंत- स्पष्टीकरण यांसह निव्र्याजपणे सांगितलेल्या या आठवणींतून भारतरत्न सी.एन.आर. राव यांचा प्रवास कळतो आणि मतेही समजतात..

भारतरत्न किताबाने गौरवले गेलेले चिंतामणी नागेश्वर राव यांची विज्ञानातील वाटचाल थक्क करणारी आहे. रसायन शास्त्रज्ञाचा पेशा त्यांनी स्वीकारला. त्याचा त्यांना आजही पश्चात्ताप तर नाहीच, पण ‘पुन्हा जीवन सुरुवातीपासून जगायला मिळाले, तरी रसायनशास्त्रात संशोधन करायला आवडेल’ इतकी त्यांची या विषयातील गोडी व आवड आहे. ‘विज्ञान हा माझ्या जीवनाचा आवश्यक भाग आहे व माझ्या आयुष्याचे यापेक्षा दुसऱ्या कुठल्याही मार्गाने मी नियोजन करू शकलो नसतो, भविष्यात काहीही घडो; मी संशोधनच करीत राहणार,’ असे ते ‘अ लाइफ इन सायन्स’ या पुस्तकात म्हणतात. या पुस्तकात त्यांनी एका वैज्ञानिकाचे जीवन खूप मोठय़ा कालखंडात कसे असू शकते, याचा आढावा घेतला आहे.

Maharashtra Solapur Swati Mohan Rathod Daughter Of A Vegetable Vendor achieved UPSC CSE after five attempts
बाबांनी विकली भाजी, आईनं ठेवलं सोनं गहाण; UPSC परीक्षेत यश मिळवलेल्या स्वातीची प्रेरणादायी गोष्ट पाहा
Broadcaster Science Inculcation of scientific approach in India Prof R v Sowani
विज्ञान प्रसारकाची जन्मशताब्दी..
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?

परदेशातून परत आल्यानंतर त्यांना भारतात विज्ञान संशोधनात आलेल्या अडचणी त्यांनी यात मांडल्या आहेत, पण तरीही भारतातील विज्ञान संशोधनावर त्यांचे प्रेमच आहे. त्यांचे मित्र त्यांना ‘सीएनआर = केमिस्ट नॉन रिटायरिंग’ असे गमतीने म्हणतात. त्यांनी पहिला शोधनिबंध वयाच्या १९ व्या वर्षी लिहिला. आज ते ८३ वर्षांचे आहेत. त्यांच्या नावावर आता १५०० हून अधिक शोधनिबंध आहेत. एकंदर ४५ पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. सध्या ते बंगळुरूच्या जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च या संस्थेत कार्यरत आहेत. ही संस्था त्यांनीच १९८९ मध्ये स्थापन केली. विद्यार्थिदशेत त्यांनी विज्ञान शिक्षकांना क्लोरीन तयार करण्यास मदत केली होती; तेव्हापासून त्यांना रसायनशास्त्राची गोडी लागली. त्यानंतर भारतरत्न सी. व्ही.  रमण त्यांच्या शाळेत आले होते, तेव्हा त्यांनी काही विद्यार्थ्यांना इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये भेटीचे निमंत्रण दिले, त्यात राव होते. त्या वेळी रमण यांनी त्यांच्यासह काही विद्यार्थ्यांना संस्था दाखवली. त्याचाही परिणाम त्यांच्या कारकीर्दीवर झाला. राव यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून मास्टर्स पदवी घेतली. त्या वेळचे तिथले वातावरण, बनारसचे इतर शहरांपेक्षा वेगळे स्थान याचे वर्णन त्यांनी खुमासदारपणे केले आहे. तेथे त्यांनी पंडित ओंकारनाथ ठाकूर, विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या मैफली ऐकल्या होत्या. ‘तेथील अनुभव एक आध्यात्मिक डूब असलेला होता,’ असे ते याविषयी सांगतात; त्याच वेळी बंगळुरू त्या वेळी किती शांत होते, किरकोळ वाहने होती, असे चित्र रेखाटतात. यावरून विज्ञानप्रेमी वाचकांना दुसरे ज्येष्ठ वैज्ञानिक जयंत नारळीकर यांनी काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या पुस्तकातील वर्णनांची आठवण होईल! बनारस, परदेश ते बंगळुरू हा प्रवास सांगणाऱ्या राव यांचे ‘अ लाइफ इन सायन्स’ हे पुस्तक म्हणजे त्यांच्याच २०१० मधील ‘क्लायम्बिंग द लिमिटलेस लॅडर’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचा पुढचा भाग आहे; पण ते पूर्णत आत्मपर नाही. महान वैज्ञानिक होण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात हे त्यांच्या या पुस्तकातून जाणवते. बनारस हिंदू विद्यापीठ, पर्डय़ू विद्यापीठ, कॅलिफोर्निया विद्यापीठ (बर्कले), इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (कानपूर) हे त्यांच्या प्रवासातील टप्पे या पुस्तकात रेखाटले गेले आहेत. अमेरिकेत अनेक संधी असताना राव यांनी ‘मातापित्यांच्या आग्रहास्तव’ भारतात परतण्याचे ठरवले, त्या वेळी त्यांना इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स येथे ७२० रुपये महिना वेतन होते. तेथे ना धड प्रयोगशाळा होती ना कार्यालय. त्या अवस्थेत त्यांना काम करावे लागले. तरीही अडचणींवर मात करून त्यांनी स्पेक्ट्रोस्कोपी ऑफ ऑर्गॅनिक मॉलेक्यूल्स हे पुस्तक लिहिले. त्यांना स्पेक्ट्रोस्कोप मिळवण्यासाठी फार अडचणींना तोंड द्यावे लागत असे. काही प्रयोगांसाठी पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत यावे लागत असे. प्रयोगांसाठी वीजपुरवठा अखंडित नव्हता त्यामुळे त्यांना त्यासाठी व्यक्तिगत पातळीवर व्यवस्था करावी लागली होती. १९६३ मध्ये ते आयआयटी कानपूर या संस्थेत आले. १९७६ मध्ये सतीश धवन यांच्या आग्रहास्तव ते पुन्हा इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्थेत परतले. आताच्या काळात तरी विज्ञान संशोधन सुविधा बऱ्या आहेत,  परंतु  तेव्हाच्या प्रतिकूल काळातही राव यांनी हिंमत न सोडता संशोधन केले.  या संशोधन काळात आलेल्या अडचणी  त्यांनी या पुस्तकात मांडल्या आहेत. ‘खऱ्या वैज्ञानिकासाठी सर्व दिवस हे कामाचेच असतात. त्याला सुटी नसते. पगार व प्रतिष्ठा यांना महत्त्व नसते, जो वैज्ञानिक नवीन वैज्ञानिकांना घडवतो तो खरा वैज्ञानिक,’ असे ते सांगतात.

संशोधन आणि संस्थात्मक काम

पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागात त्यांनी ‘व्हाय बी ए सायंटिस्ट’ या भागात पॉल क्रुटझन, व्हिटाली गिन्झबर्ग, वॉल्टर कोहेन, जीन मारी लेन, अब्दुस सलाम, मरियम सारशिक यांच्या संशोधन व कार्याची प्रेरणात्मक माहिती दिली आहे. १९५४ मध्ये इंडियन सायन्स काँग्रेसला लिनस पॉलिंग हे वैज्ञानिक येणार होते; त्यांना भेटण्याची राव यांना इच्छा होती, पण पॉलिंग यांना अमेरिकेने व्हिसा नाकारला त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यानंतर राव अमेरिकेला शिक्षणासाठी गेले, त्यामुळे मोठय़ा वैज्ञानिकांशी त्यांच्या भेटीगाठी झाल्या. ऑक्सफर्डमधील वास्तव्यात त्यांची भेट ते ज्यांना गुरुस्थानी मानत त्या- प्राध्यापक नेव्हिल मॉट यांच्याशी झाली होती.

पुढे राव यांनी अनेक वैज्ञानिक घडवले. ‘आजच्या काळात प्रशासकीय पदांना महत्त्व दिले जाते, त्याच्या मागे लोक लागतात; पण त्यामुळे तरुणांच्या मनात विष कालवले जाते,’ असे ते सांगतात. त्यांच्या सगळ्या विवेचनातही त्यांचे संशोधनावरचे प्रेम जास्त दिसते. त्यांना संस्थात्मक पदे भूषवण्यात फार रस नव्हता, तरी त्यांनी धवन यांच्या आग्रहास्तव इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये मोठे काम करून दाखवले. त्यात संस्थात्मक काम अधिक होते.

एकदा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना भेटण्यासाठी बोलावले तेव्हा ते सकाळीच त्यांच्या निवासस्थानी गेले. गरम कॉफीने त्यांचे आगतस्वागत झाले. नंतर इंदिरा गांधी कक्षात आल्या व त्यांनी सांगितले की, ‘देशातील वैज्ञानिक संस्थांसाठी मी तरुण लोकांच्या शोधात आहे. त्यामुळे तुम्ही सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे सचिवपद स्वीकारावे, असे मला वाटते.’ मिनिटभर विचार करून राव म्हणाले, ‘मला संशोधन करायचे आहे व ते सोडून मी हे पद स्वीकारू इच्छित नाही.’ त्यावर इंदिराजी म्हणाल्या, ‘राव, खरोखर तुम्हाला तुमच्या निर्णयाची खात्री आहे. तुम्ही हे पद नाकारणारे पहिलेच आहात.’ नंतर इंदिराजी राव यांच्याशी हस्तांदोलन करून निघून गेल्या. कानपूरला असताना राव यांच्या मनात पुन्हा परदेशात जाण्याचे विचार होते, पण सतीश धवन यांनी त्यांना पुन्हा बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये आणले.

‘पद्मविभूषण’ ते ‘भारतरत्न’

१९८५ मध्ये त्यांना पद्मविभूषण किताब जाहीर झाला त्या वेळी त्यांचा विश्वास बसला नाही; पण इंदिरा गांधी यांनीच हा किताब राव यांना देण्याचा आग्रह १९८४ च्या ऑक्टोबरपूर्वी मांडला असावा, असे ते म्हणतात. अतिवाहकतेवरही राव यांनी काम केले. त्यात त्यांनी द्रव नायट्रोजनवर आधारित पहिला अतिवाहक बनवला. ते संशोधन ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले होते. राजीव गांधी पंतप्रधान असताना ते विज्ञान सल्लागार मंडळात होते. त्याबाबत ते सांगतात, ‘राजीव गांधी हे विज्ञान क्षेत्राबाबत उत्साही होते. ते त्यासाठी वेळ देत असत. विज्ञान तंत्रज्ञानावरील खर्च एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या २ टक्के करण्याचे त्यांचे प्रयत्न होते.’ पुढे ते लिहितात, ‘राजीव गांधी उर्मट होते असा अनेकांचा समज असला, तरी ते प्रत्यक्षात अगदी विनम्र होते. फक्त एकदाच राजीव चिडले होते, त्याचे कारणही तसेच होते. ते म्हणजे सरकारी सचिवाला त्यानेच लिहिलेला मजकूर वाचता येत नव्हता! अन्यथा ते लोकांना चुका माफ करत असत.’ राजीव गांधी यांची हत्या झाल्याचे वृत्त समजले, तेव्हा आपण कधी नव्हे इतके रडलो होतो, हेही ते सांगून जातात.

पुढे २०१३ मध्ये ते व त्यांची पत्नी त्रिवेंद्रमला गेले असताना विमानतळावर त्यांना पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा फोन आला. सिंग यांनी  राव यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार  देत असल्याचे सांगितले, पण त्यावर राव यांचा विश्वासच बसला नाही. नंतर २०१४ मध्ये पुरस्कार प्रदान कार्यक्रमात त्यांची राष्ट्रपती प्रणब मुखर्जी व पंतप्रधान सिंग यांच्याशी भेट झाली.

असे का घडले

इतक्या दीर्घ संशोधन कारकिर्दीत त्यांच्यावर एकदा वाङ्मयचौर्याचा आरोप झाला होता. त्याविषयीचे स्पष्टीकरणही या पुस्तकात आहे. प्रारणशोधनासाठी ग्राफेनच्या वापराबद्दलचा त्यांचा शोधनिबंध ‘अ‍ॅडव्हान्स्ड मटेरियल’ या नियतकालिकाने स्वीकारला होता. त्यात दुसऱ्या एका शोधनिबंधातील काही वाक्ये सहसंशोधक विद्यार्थ्यांने घेतली होती. या शोधनिबंधाचे निष्कर्ष राव यांनी पाहिले होते व बाकी तपशील सहमार्गदर्शकाने बघितल्याचे गृहीत धरले होते. तरी हे लक्षात आल्यानंतर राव यांनी संपादकांना शोधनिबंध मागे ठेवण्यास सांगितले होते, पण दुर्दैवाने नियतकालिकानेच तो शोधनिबंध चांगला असल्याने मागे ठेवण्यास नकार दिला. त्यावर दिलगिरीची टिप्पणी प्रसिद्ध करावी असा आग्रह राव यांनी धरला होता; पण तीही प्रसिद्ध झाली नाही. त्यातून लोकांचे गैरसमज झाले. परदेशातील अनेक संशोधक मित्रांनीही राव यांच्यावरील या आरोपांबाबत आश्चर्यच व्यक्त केले होते.

राव यांना एक खंत वाटत राहिली ती म्हणजे होमी भाभा व विक्रम साराभाई यांची भेट राहून गेल्याची. या दोघांची भेट ठरली असताना त्यापूर्वीच त्यांचे निधन व्हावे हा दुर्दैवी योग होता, असे ते सांगतात. राव यांनी ज्यांना आदर्श मानले, त्या जगदीशचंद्र बोस, सी. व्ही. रमण, रामानुजन, मायकेल फॅरेडे, जी. एन. लेवीस, लिनस पॉलिंग यांच्या कार्याची महती त्यांनी पुस्तकात सांगितली आहे.

देशातील विज्ञान संशोधनातील प्रगतीसाठी ते काही उपायही येथे सूचवतात. त्यात विज्ञान क्षेत्रात प्रगतीसाठी पायाभूत सुविधा वाढवल्या पाहिजेत; शिक्षणावरील खर्चाची तरतूद एकूण उत्पन्नाच्या २-३ टक्के आहे, ती सहा टक्के केली पाहिजे; आयआयटी व विद्यापीठांवरचा खर्च वाढवला पाहिजे; ग्रामीण भागातील प्रज्ञावंतांचा शोध घेतला पाहिजे; विज्ञान-तंत्रज्ञानावरचा खर्च एकूण उत्पन्नाच्या १ टक्क्यापेक्षा अधिक नव्हता, तो दीड ते दोन टक्के केला पाहिजे,यांचा आग्रह ते धरतात. भारतातील एकूण विज्ञान संशोधनातील १० टक्के संशोधन हे खासगी कंपन्यांच्या पाठिंब्यावर चालते, तर परदेशात हेच प्रमाण ४० ते ५० टक्के आहे. त्यामुळे आपल्याकडेही विज्ञान संशोधनात कंपन्यांचा सहभाग वाढला पाहिजे, असे त्यांचे मत आहे.

इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसची जी शेवटची बैठक सी. व्ही. रमण यांच्या उपस्थितीत झाली होती, त्या वेळी चहापानाच्या सुट्टीत राव यांच्याशी बोलताना रमण म्हणाले होते की, ‘राव, मी आता ८१ वर्षांचा आहे, भारत विज्ञान क्षेत्रात वरच्या स्थानावर जाईल की नाही याची मला काळजी वाटते.’ ती आठवण सांगतानाच राव पुढे लिहितात, ‘आता मी ८२ वर्षांचा आहे, पण रमण यांनी व्यक्त केलेली चिंता आज मलाही व्यक्त करावी लागते आहे.’

विज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी राव यांनी ‘लेटर टू यंग फ्रेंड्स’ हे पत्र या पुस्तकात लिहिले आहे. त्यात विज्ञान व कला क्षेत्रात आंतरशाखीय शिक्षणाची सोय परदेशांप्रमाणे भारतातही असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. हार्वर्ड विद्यापीठातून कला शाखेत एम.ए. झालेले हॅरॉल्ड वॉरमस यांना कर्करोगावरील संशोधनासाठी नोबेल मिळाले होते, त्याची कथा त्यांनी त्यासाठी मुद्दाम सांगितली आहे. जी मुले जीवनात हवे तसे घडले नाही म्हणून नाराज होतात, त्यांना नक्कीच आशेचा किरण दाखवणारे हे पत्र आहे. सर्व महाविद्यालये व शिक्षण संस्थांनी हे पत्र विद्यार्थ्यांना वाचता येईल, अशा पद्धतीने लावायला हरकत नाही.

 

 ‘अ लाइफ इन सायन्स’ 

लेखक :  सी. एन. आर. राव

प्रकाशक : पेंग्विन-व्हायकिंग

पृष्ठे : २१६, किंमत : ४९९ रुपये

 

राजेन्द्र येवलेकर

rajendra.yeolekar@expressindia.com