आफ्रिकेतील नष्ट होत चाललेल्या माऊंटन गोरिलांच्या अभ्यासासाठी संशोधक साहाय्यक म्हणून तिथे गेलेली डियान फॉसी ही अमेरिकन युवती.. पुढे तब्बल अठरा वर्षे गोरिलांच्या सहवासात राहून तिने गोरिलांचा अभ्यास केला. इतकेच नव्हे, तर गोरिलांची घटती संख्या पाहून त्यांच्या संरक्षण-संवर्धनासाठीही तिने कणखर भूमिका घेतली. गोरिलांच्या सहवासातील या प्रेमाच्या, विरहाच्या, आनंदाच्या आणि अतीव दु:खाच्या क्षणांना स्वत: डियानने एका पुस्तकाद्वारे शब्दरूप दिले. त्या पुस्तकाविषयी..

सन १९६३. एक ऑक्युपेशन थेरपिस्ट असलेली अमेरिकन युवती आफ्रिकेतील जंगल फिरण्यासाठी आली होती. तिने जंगलातील माऊंटन गोरिलांना पाहिले. तिच्या कानावर डॉ. लुईस लिकींबद्दल आले होते. डॉ. लिकी माऊंटन गोरिलांचा आफ्रिकेत राहून अभ्यास करणाऱ्या एखाद्या समर्पित वृत्तीच्या संशोधकाच्या शोधात होते. ती त्यासाठी डॉ. लिकींना भेटली. परंतु डॉ. लिकींनी प्रथम तिला नकार दिला. त्या वेळी आफ्रिकेतून परतताना एक स्पष्ट निश्चय तिने केला होता, तो म्हणजे, ‘‘आपण पुन्हा नेहमीसाठी इथे येणार आहोत ते माऊंटन गोरिलांचा अभ्यास करण्यासाठीच!’’ ती त्या दृष्टीने सतत प्रयत्न करत राहिली. एक दिवस डॉ. लिकी तिला स्वत:हून अमेरिकेत भेटले. त्यांनी तिला एक विचित्र अट घातली, ‘‘तुला जर आफ्रिकेत राहून गोरिलांचा अभ्यास करण्याची खरोखरच इच्छा असेल तर तुला तुझे अपेंडिक्स काढून टाकावे लागेल. त्यामुळे मला कळेल, की ही तुझी इच्छा वरवरची नसून आतून आलेली आहे.’’ यावर काहीही न बोलता ही युवती इस्पितळात भरती झाली आणि सहा आठवडय़ांनी इस्पितळातून सर्जरी करून आली. तिने डॉ. लिकींना कळवले, ‘‘मी अपेंडिक्स काढले आहे.’’ ही युवती म्हणजेच माऊंटन गोरिलांची अभ्यासक म्हणून पुढे जगप्रसिद्ध झालेली डियान फॉसी. त्यानंतर वर्षभरातच ती गोरिलांचा अभ्यास करण्यासाठी आफ्रिकेत कायमची राहण्यासाठी निघाली. ‘गोरिलाज् इन द मिस्ट’ या डियान फॉसीने लिहिलेल्या पुस्तकातील सुरुवातीच्या प्रकरणातील हा प्रसंग वाचतानाच आपण पुस्तकात आणि फॉसीच्या मनस्वी व्यक्तिमत्त्वातही ओढल्यासारखे गुंतत जातो.

सर्वप्रथम ती आफ्रिकेतील कबारा येथे गेली. तिने आपला अभ्यास सुरू केला. परंतु राजकीय अस्थिरतेमुळे तिला तिथून निघावे लागले. तिथून ती रवांडा या देशातील कॅरिसोकी येथे आली. त्या ठिकाणी तिने दहा हजार फूट उंचावर आपला छोटासा तळ बनवला. माकडांमधील आकाराने सर्वात मोठा म्हणजे गोरिलाच. काळ्या रंगाचा, केसाळ शरीराचा, वजनाने जवळजवळ १८० किलोचा गोरिला म्हणजे अगडबंब धूडच. डियानने अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा संपूर्ण जगात फक्त २८८ माऊंटन गोरिला उरले होते. गोरिलांवरील पाठय़पुस्तकातून लिहिलेले होते,‘‘गोरिलांचा अभ्यास करण्यासाठी जंगलात कुठेतरी एका ठिकाणी बसून त्यांचे निरीक्षण करावे.’’ परंतु डियानला काही हे पटले नाही. केवळ बसून राहून एकटक बघत राहणाऱ्या व्यक्तीवर गोरिला कधीही विश्वास ठेवणार नाहीत हे तिच्या लक्षात आले. त्यानंतर ती गोरिलांसारखी चार पायांवर रांगायला लागली. त्यांच्यासारखेच मध्ये मध्ये अंग खाजवणे, आजूबाजूच्या वनस्पतींची पाने तोडून तोंडात टाकणे, एवढेच नव्हे, तर त्यांच्यासारखे आवाज काढायलाही ती शिकली. गोरिला तिला आपल्यातीलच समजायला लागले.

परंतु हे काही लगेच झाले नाही. दहा महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर हे तिला साध्य झाले. गोरिलांच्या नाकावरच्या सुरकुत्यांवरून एकेका गोरिलाला डियान वेगवेगळी ओळखू लागली. त्यांना तिने नावे दिली. आता गोरिलांचे नैसर्गिक वागणे तिच्यासमोर उलगडू लागले. तोपर्यंत गोरिला हे क्रूर असतात. माणसांवर हल्ले करून त्यांना मारून टाकतात असाच समज होता. परंतु लेखिकेने कुटुंबवत्सल, प्रेमळ गोरिलांचे हळवे रूप जगासमोर आणले.

सतत अडीच-पावणेतीन वर्षे गोरिलांच्या सोबत राहिल्यावर एक दिवस एक अविस्मरणीय प्रसंग घडला. डियान नेहमीप्रमाणे गोरिलांच्या एका कुटुंबाच्या जवळपास होती. नेहमीप्रमाणे चार पायांवर रांगत होती. आजूबाजूच्या रानटी झाडांची पानं तोडून तोंडात टाकत होती. गोरिलांच्या कुटुंबातील एक ‘पीनटस’ नावाचा तरुण गोरिला तिच्या जवळ आला. आपल्या तपकिरी डोळ्यांनी तिच्याकडे पाहू लागला. त्याच्याकडे बघून डियानने डोके खाजवले. ताबडतोब त्यानेही तसेच केले. तो पूर्णपणे निवांत वाटत होता. डियान आता जमिनीवर आडवी झाली. तिने आपला हात हळूच पुढे केला. पीनटसनेही आपला हात पुढे केला आणि काही क्षणांसाठी आपल्या बोटांनी डियानच्या हाताला त्याने स्पर्श केला. आपण काही तरी खूप वेगळे केले याचा पीनटसला खूप आनंद झाला. त्याने तोंडातून आनंददर्शक आवाज काढले आणि आपली छाती आनंदाने बडवली. तो लगेचच आपल्या कळपाकडे निघून गेला. डियान त्या स्पर्शाने भारावल्यासारखी झाली. गोरिला आणि मानव यांच्यातील लाखो वर्षांचे अंतर त्या एका स्पर्शाने क्षणात जणू नाहीसे झाले होते.

गोरिलांच्या सहवासातील अठरा वर्षे डियानने अतिशय प्रत्ययकारकरीतीने या पुस्तकात नोंदवलेली आहेत. जर्मनीच्या एका प्राणिसंग्रहालयाला गोरिलांची पिल्लं हवी होती. आफ्रिकन वनखात्याच्या कन्झव्‍‌र्हेटरला त्यानिमित्ताने फुकटात जर्मनीची सहल पदरात पडणार होती. त्या कन्झव्‍‌र्हेटरने शिकाऱ्यांच्या मदतीने गोरिलांच्या एका संपूर्ण कुटुंबाचे हत्याकांड करून त्यांची पिल्लं मिळवली. या गोष्टीला डियानचा तीव्र विरोध होता. परंतु परक्या देशात परक्या सरकारपुढे तिचे काहीच चालले नाही. चार दिवसांतच कन्झव्‍‌र्हेटरने पिंजऱ्यात ठेवलेली पिल्लं मरणपंथाला लागली. तेव्हा त्यांनी ती सांभाळायला डियानला दिली. या पिल्लांना डियानने स्वत:च्या केबिनमध्ये ठेवले. त्यांची नावे तिने ‘कोको’ आणि ‘पकर’ अशी ठेवली. डायानच्या प्रेमळ देखभालीखाली त्या पिल्लांची तब्येत हळूहळू सुधारली. त्या पिल्लांना ती स्वत:सोबत जंगलात घेऊन जायला लागली. झाडावर चढायला लागली. एकदा ती पिल्लं उंच झाडावर फांद्यांमध्ये वाढलेली बुरशी मटकावताना तिला दिसली. गोरिलांना बुरशी खूप आवडते, हे तिला त्या दिवशी पहिल्यांदा कळले. पिल्लं चांगली झाल्यावर कन्झव्‍‌र्हेटरने ताब्यात घेतली. त्यांना जर्मनीला पाठवण्याची तयारी डियानने मोठय़ा जड अंत:करणाने करून दिली. एका लाकडी खोक्यातून पिल्लं जर्मनीला निघाली. इकडे डियानला अश्रू अनावर झाले. ती तिच्या केबिनपासून दूरवर जंगलात धावत सुटली. जणू त्या दोघांच्या जीव जाळणाऱ्या विरहापासून तिला दूर पळायचे होते.. पण त्यांची आठवण ती आयुष्यात कधीच विसरू शकली नाही.

सतत अठरा वर्षे जंगलात गोरिलांच्या सहवासात राहिल्याने त्यांच्यातील कुटुंबसंस्थेचे व नातेसंबंधांचे भान डियानला आले होते. प्रत्येक गोरिलाला स्वत:चे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व व स्वभाव असतो हे तिने सिद्ध केले. तिचा लाडका ‘डिजिट’ नावाचा गोरिला, तो जेव्हा लहान होता तेव्हापासून डियानची डिजिटशी मैत्री होती. परंतु हळूहळू डिजिट मोठा झाला. त्याच्या पाठीवर रुपेरी केस आले. रुपेरी पाठीचा नर गोरिलांच्या कळपाचा प्रमुख होतो. त्याप्रमाणे डिजिट त्याच्या कळपाचा प्रमुख झाला. त्यामुळे त्याचा डियानशी असलेला संबंध कमी कमी झाला. परंतु एकदा थंड पावसाळी दिवस होता. डियान डिजिटच्या कळपापासून दूर राहून त्यांचे निरीक्षण करत होती. अचानक तिच्या गळ्यात एका गोरिलाचा हात आला. पंजाच्या तुटलेल्या बोटावरून तिने ओळखले हा डिजिटचाच हात आहे. ती त्याच्या तपकिरी डोळ्यांत पाहू लागली. तो तिच्या बाजूला बसला. डियानने हळूच आपले डोके त्याच्या मांडीवर टेकवले. तिथून तिला त्याच्या नाकाला काही दिवसांपूर्वी झालेली जखम स्पष्ट दिसत होती..

या डिजिटची शिकाऱ्यांनी अतिशय निर्घृणपणे हत्या केली. त्याच्या कळपातील इतरही गोरिलांची हत्या करण्यात आली. संपूर्ण कळपच देशोधडीला लागला. डियानला हे सगळेच खूप दु:खदायक होते. ती या शिकाऱ्यांविरुद्ध पेटून उठली. ज्याप्रमाणे त्यांनी गोरिलांना मारले त्याचप्रमाणे त्यांना मारण्यात यावे, अशी जोरदार मागणी तिने केली. गोरिलांच्या संवर्धनाच्या चळवळीतील डियान एक पेटती मशाल झाली.

तिने कित्येक वर्षांपूर्वी आफ्रिकेत एक संशोधक म्हणून प्रवेश केला होता. परंतु आता तिचे रूपांतर गोरिलांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी झटणाऱ्या कार्यकर्तीमध्ये झाले होते. जगभरात तिने माऊंटन गोरिलांच्या संवर्धनाचा संदेश पोहोचवला. जर अशा तऱ्हेने गोरिलांची हत्या होत राहिली तर विसाव्या शतकाच्या अखेरीस माऊंटन गोरिला नष्ट होतील, असा इशाराही तिने दिला.

गोरिलांच्या संरक्षणासाठी डियानने हाताळलेल्या मार्गावर खूप टिकाही झाली. ती भुताचा मुखवटा घालून आफ्रिकन शिकाऱ्यांना व जंगलात गुरे चारायला येणाऱ्या गुराख्यांना घाबरवत राहिली. त्यांच्या मुलांनाही ओलीस ठेवण्यास तिने मागेपुढे पाहिले नाही. भलेबुरे सगळे मार्ग अवलंबत ती गोरिलांच्या संरक्षणासाठी खंबीरपणे उभी राहिली. शिकाऱ्यांनी गोरिलांसाठी लावलेले कित्येक सापळे तिने नष्ट केले. साऱ्या जगाचे लक्ष माऊंटन गोरिलांच्या संवर्धनाकडे लागले. आज आफ्रिकेतील माऊंटन गोरिलांची संख्या ५०० च्या वर पोहोचलेली आहे. जर डियान फॉसी  नसती तर हे कधीच शक्य झाले नसते.

गोरिलांच्या सहवासातील प्रेमाच्या, विरहाच्या, आनंदाच्या आणि अतीव दु:खाच्या क्षणांना दिलेले शब्दरूप म्हणजेच हे पुस्तक. एखाद्या प्राण्याचा अभ्यास आणि संवर्धन यासाठी एकटी व्यक्ती काय करू शकते याचा प्रत्यय जागोजागी या पुस्तकात येत राहतो. ते जाणून घेण्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचावे.

‘गोरिलाज् इन द मिस्ट’

लेखिका : डियान फॉसी

प्रकाशक : ओरियन

पृष्ठे : ३३६, किंमत : ३७५ रुपये

गोरिलांच्या सहवासात डियान फॉसी.

डॉ. विनया जंगले vetvinaya@gmail.com