इसाया बर्लिन आणि आयझॅक डॉयशर. एक संकल्पनांचा इतिहासकार, तर दुसरा रशिया आदी देशांतील नवराजवटींचा वेध घेणारा. दोघांमध्ये साम्यस्थळं बरीच, पण फरकही भरपूर. बर्लिन हा पूर्ण स्वातंत्र्यवादी, उदारमतवादी; तर डॉयशर डाव्यांकडे आपुलकीनं पाहू शकणारा. बर्लिनचा असा समज होता की डॉयशर स्टालिनसमर्थक आहे. या समजामुळे डॉयशरला त्यानं नोकरी मिळू दिली नाही! पुढे वाद वाढलाच, पण त्यानं विकोपाचं टोक आधीच गाठलं होतं..

ते अयोग्य होतं, हे नंतर सिद्ध झालंच.  पण त्या वेळी अनेकजण इसाया बर्लिनच्या बाजूचे होते. या वादाचा आढावा कुठलीही बाजू न घेता, कुणालाही झुकतं माप न देता घेणं, हे कठीणच. ते काम ज्या पुस्तकानं केलं, त्याची ही ओळख..

विसावे शतक जाणून घेण्यासाठी दोन इतिहासकारांचे लेखन वाचणे आवश्यक आहे. यातील एक इतिहासकार आहेत- इसाया बर्लिन, जे प्रामुख्याने घटनांपेक्षा संकल्पनांचे इतिहासकार होते; तर दुसरे इतिहासकार आहेत आयझ्क डॉयशर. या दोघांचे वैशिष्टय़ म्हणजे दोघेही ज्यू होते. इसाया बर्लिन रशियातून परागंदा झालेले ज्यू, तर आयझ्क डॉयशर पोलंडमधून. दोघांचेही बलस्थान हे की, दोघांनाही रशियन भाषा उत्तम अवगत होती. बर्लिन तर रशियनच होता. या कसबामुळे अनेक मूळ कागदपत्रांचा अभ्यास करणे त्यांना शक्य झाले, जे इतरांना शक्य नव्हते. इसाया बर्लिनने ‘टू एसेज ऑन फ्रीडम’सारखे महत्त्वाचे निबंध लिहिले. स्वातंत्र्याच्या ‘कशाचे स्वातंत्र्य’ आणि ‘कशापासून स्वातंत्र्य’ या दोन वेगळ्या कल्पनांबद्दल ऊहापोह केला, कार्ल मार्क्‍सचे चरित्र, तसेच अनेक रशियन विचारवंतांवर लिहिले. बर्लिन यांचे मोठे वैशिष्टय़ म्हणजे ते स्कॉलर आणि बुद्धिमान होतेच, पण वैचारिक मैफलीचा बादशहा म्हणून त्यांचे खूपच नाव झाले. इतके की केवळ त्यांच्या गप्पांतून झालेले पुस्तकदेखील बरेच काही देणारे आहे. अगदी नेहरूंनी ब्रिटिशांचा इतका पगडा असतानाही रशियाचा समाजवाद का स्वीकारला याचे उत्तर त्या पुस्तकात मिळते. या गप्पांमध्ये साहित्य, संस्कृती, राज्यशास्त्र, विसावे शतक अशा अनेक बाबींविषयी चर्चा आहेत. इसाया बर्लिनची पत्रे, त्याचे अप्रकाशित निबंध हे सारे आता प्रसिद्ध होत आहे. एक तीव्र बुद्धिमत्तेचा अफाट ज्ञान असलेला माणूस त्यातून समोर येतो. मायकेल इग्नेशियाफने त्याचे सुंदर चरित्र लिहिले आहे.

आयझ्ॉक डॉयशर हे दुसरे बुद्धिमान इतिहासकार. त्यांचेही वाचन अर्थात प्रगाढ होते. हे दोघेही इंग्लंडमध्ये राहिले. डॉयशरने प्रामुख्याने रशियन हुकूमशहा स्टॅलिन, कम्युनिस्ट नेता लीऑन ट्रॉट्स्की यांची चरित्रे लिहिली; ट्रॉट्स्कीचे चरित्र तीन खंडांचे आहे. ऑक्सफर्डने १९५०च्या दशकात प्रसिद्ध केलेल्या या चरित्र आणि पुस्तकांमुळे डॉयशरचे नाव जगभरातील इतिहासाभ्यासकांना माहीत झाले. डॉयशरचे कुटुंब पहिल्या महायुद्धाच्या सुमारास ऑस्ट्रो-हंगेरियन सत्तेमध्ये राहत होते, जिला ‘थ्री एम्पर्स कॉर्नर’ असे म्हटले जात असे. तीन महासत्ता इथे मिळत होत्या- ऑस्ट्रो-हंगेरियन, रशियन आणि जर्मन. या महासत्ता कोसळल्या आणि डॉयशर कुटुंबाला तीन क्रांत्या अनुभवाव्या लागल्या. डॉयशर यांचा जन्म १९०७ चा. मध्यमवर्गीय शहरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे काका पोलंडच्या अप्पर हाऊसमध्ये (म्हणजे आपल्या भाषेत लोकसभेचे किंवा विधानसभेचे) ज्युईश क्लेरिकल पार्टीचे अगुदाह इथले प्रतिनिधी होते. डॉयशरही काही काळ कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते. पोलंड सोडून ते युद्धकाळात इंग्लंडमध्ये आले. इथेच त्यांचा तमारा या पत्रकार आणि भावी पत्नीशी परिचय झाला. ते मुक्त पत्रकार म्हणून वर्तमानपत्रासाठी रशियाविषयक आणि युद्धविषयक वार्तापत्रे देण्याचे काम करू लागले. त्यांचा पहिलाच लेख १३ जून १९४२ साली ‘अंडर ग्राऊंड युरोप’ या नावाने प्रसिद्ध झाला. नंतरच्या युद्धोत्तर काळात आणि युद्ध चालू असताना त्याने अनेक लेख लिहिले. १९४९ पर्यंत त्याने युरोपमधील घडामोडींवरची वार्तापत्रे लिहिली. जर्मनी आणि ऑस्ट्रियात काय चालले आहे याबद्दलचे लेखन केले. पूर्व युरोपमध्ये जे सारे वर-खाली होत होते त्याविषयी लेखन केले.

बीबीसीसारख्या संस्थेला रशियाविषयक माहिती देण्याचे कामही ते करत. ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना स्टालिनचे चरित्र लिहायला एक हजार पौंड देऊन कमिशन्ड केले (२०० पौंड वरखर्चासाठी दिले). त्यातून तयार झालेले चरित्र गाजले. पण बर्लिनसारखे विचारवंत डॉयशर यांचा कायम दुस्वास करत राहिले. संधी मिळेल तेव्हा दोघेही नामवंत नियतकालिकांतून एकमेकांवर अडून तर कधी सरळ प्रहार करत राहिले. मात्र ई. एच. कारसारखा इतिहासकार डॉयशरच्या बाजूने उभा राहिला.

बर्लिन ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकवत असे, याउलट डॉयशरला कायम वर्तमानपत्रांतील लेखन आणि पुस्तकाची रॉयल्टी यावर संसार चालवावा लागत असे. १९६३ साली डॉयशरला विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नोकरी मिळेल अशी संधी निर्माण झाली होती. ससेक्स विद्यापीठात आधुनिक इतिहास किंवा अर्थशास्त्राची लेक्चररशिप त्याला मिळू शकली असती. आपण रशियाचा इतिहास, तसेच युरोपमधील आर्थिक कल्पनांचा इतिहासही शिकवू शकतो, असे डॉयशरने अर्जात लिहिले आणि पुढे अर्थातच स्वत: लिहिलेले ग्रंथ, लेख आणि भाषणे यांची यादी दिली. त्या काळात सीनियर लेक्चररला वार्षिक दीड लाख पौंडांपर्यंत पगार मिळत असे. हे शिक्षण टय़ुटोरियल पद्धतीने देण्यात येत असे. प्राध्यापकाला दर आठवडय़ाला बारा तास शिकवावे लागत असे. प्रत्येक विद्यार्थ्यांला दर आठवडय़ाला एक निबंध लिहायला सांगायचा आणि त्याच्यासोबत बसून निबंधाची चर्चा करायची अशी पद्धत होती. एकंदरीत उच्चपदस्थांचे मत डॉयशरला प्राध्यापक नेमावे असे होते, पण इसाया बर्लिन ससेक्स विद्यापीठाच्या बोर्डावर अभ्यागत सल्लागार म्हणून काम करत होता. विद्यापीठाचे चान्सेलर फुल्टन यांनी डॉयशरला प्राध्यापक नेमण्याबद्दल सल्ला मागणारे पत्र इसाया बर्लिनला लिहिले. डॉयशरचे नाव न घेता उत्तरात त्याने लिहिले की , ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलता आहात तिला  मी ज्या शैक्षणिक वातावरणात  वावरतो तिथे नेमणे मला नैतिकदृष्टय़ा  कठीण होईल.

पुढे पत्रात त्याने आपण इतरांशी याबाबत बोलू, असेही म्हटले आहे. या पत्राने फुल्टन आणि इतर मंडळी अस्वस्थ झाली. याचा परिणाम डॉयशर यांना लेक्चररशिप न मिळण्यात झाला. नंतर तीन वर्षांनी डॉयशर यांचे निधन झाले.

ऑक्सफर्डमध्येच शिकलेले डेविड कॉट यांनी यानिमित्ताने या दोन इतिहासकारांचा समांतर प्रवास  शोधायचे ठरवले. त्यातून ‘आयझ्ॉक आणि इसाया’ हे पुस्तक लिहिले गेले, ते बरेच खोदकाम करून आणि अनेक समकालीनांशी बोलून. शीतयुद्धकाळातील अनेक घडामोडी त्यातून समोर येतात.

लेखक सांगतो की, आयझ्ॉक डॉयशरला इतिहासकार म्हणून केवळ स्टॅलिनच्या एकखंडीय राजकीय चरित्राने प्रस्थापित केले. मात्र या चरित्रावर अनेक तथ्ये आपल्याला हवी तशी वळवून घेतल्याचा, अनेक तपशील आपल्या विचाराला अनुकूल पद्धतीने वापरल्याचा आरोप होता. स्टॅलिनने आपल्याविरुद्ध कट करणाऱ्या किरोव आणि तुखाचेवस्की यांना मारून टाकले. त्याचे पुस्तकातील वर्णन चुकीचे आहे, असे आरोप वोल्टर लॅकुअर या बर्लिनच्या मित्राने केले होते. डॉयशर स्टॅलिनला हिरो मानत असून त्याचे चित्रण आदर्श असल्यागत केले आहे, असाही आरोप त्याने केला. १९३२ साली कम्युनिस्ट पक्षातून डॉयशर यांना काढून टाकण्यात आले.

इंग्लंडमध्ये स्थलांतरित पत्रकार म्हणून काम करत असताना डॉयशरला १९२९ साली स्टॅलिनने एकमुखी सत्ता हाती घेतल्यानंतरची सारी धोरणे- मग ती रशियातील असोत की परराष्ट्र धोरणातील- कौतुकास्पद वाटत होती. स्टॅलिनच्या वेगवान औद्योगिकीकरणाच्या धोरणामुळे छोटय़ा शेतकऱ्यांना त्यांची थोडीफार जमीन सामुदायिक शेतीला द्यावी लागली. कोटय़वधी अशिक्षितांना शाळेत पाठवण्यात आले. १९५३ साली लिहिलेल्या ‘रशिया आफ्टर स्टालिन’ या १९४३ च्या दुसऱ्या पुस्तकात डॉयशर म्हणतो, ‘स्टॅलिनच्या उपलब्धीचा गाभा हा आहे की, त्याने लाकडी नांगराने काम करणारा रशिया ताब्यात घेतला आणि त्याला अण्वस्त्रांची सुबत्ता असलेला रशिया बनवून सोडले.’ स्टॅलिनच्या चुकांबद्दलही डॉयशरने लिहिले होते; पण सूर एकूण कौतुकाचाच होता. जेव्हा सामुदायिक शेतीसाठी लक्षावधी गावांमध्ये जमिनीचा ताबा घेणे सुरू झाले तेव्हा त्याला अक्षरश: यादवी युद्धाचे स्वरूप आले. गावा-गावांबाहेर मशीनगन्स उभ्या ठाकल्या. कुलक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जमीनदारांची जमीन हिसकावून घेण्यात आली, कारण स्टॅलिनला हा वर्ग नष्ट करायचा होता. यात जवळपास साडेतीन कोटी घोडे नष्ट करण्यात आले. गाय-बैलांसारखे पशुधन केवळ ४५% उरले. गाव- शहरांत दुष्काळ घोंगावू लागला. जबरदस्तीने कामाला लावलेल्या कामगारांनी हिंसाचार सुरू केला. या दुसऱ्या क्रांतीला गुलामसदृश मजुरीचा काळा डाग लागला होता, असे वर्णन डॉयशर यांनी केले आहे; पण यातूनच स्टॅलिन हा क्रांतीचा पालक आणि विश्वस्त बनला आणि त्याने समाजवादाची बांधणी केली. स्टॅलिनचे विरोधकही हे मान्य करतील, की त्याने केलेल्या आर्थिक सुधारणा समाजवादासाठी आवश्यक होत्या. स्टॅलिन हा लेनिनचा कायदेशीर वारस ठरतो आणि त्याने केलेली क्रांती सोळाशे कोटी लोकांच्या आयुष्यात बदल घडवणारी असल्यामुळे ती अधिक व्यापक आणि अधिक बंडखोर आहे, असा डॉयशरचा निर्वाळा होता.

पण स्टॅलिनच्या छळछावण्यांचे काय? याबद्दल मात्र डॉयशर मौन बाळगतो. जवळपास अडीच लाख कैदी बाल्टिक-व्हाइट सीसारख्या कालव्यावर काम करत होते. त्याबद्दलही डॉयशर काही बोलत नाही. अ‍ॅना अ‍ॅक्मतवा, बोरीस पास्तरनाक यांच्यासारखे लेखक, शोस्ता कोवीतसारखा संगीतरचनाकार, आयझेस्टाइन यांचा छळ झाला. आयझ्ॉक बॅबेल मेअर होर्ड यासारख्यांना ठार करण्यात आले. याबद्दलही डॉयशर बोलत नाही. या साऱ्यातून लेखक डॉयशर यांच्या डावेपणाची डावी-उजवी बाजू मांडतो. ई. एच. कारसारख्या इतिहासकारापासून बीबीसीसारख्या संस्थेपर्यंत साऱ्यांनीच डॉयशरला मान्यता दिली होती. ‘अँटी-स्टॅलिन स्टॅलिनिस्ट’ असे त्याचे वर्णन बुद्धिवंतांमध्ये होत असे.

१९४५ साली बर्लिन यांनी रशियाचा दौरा केला. सर्जी आयझेनस्टाइनसारखा दिग्दर्शक, अ‍ॅना अ‍ॅक्मातोवासारखी कवयित्री आणि अनेक लेखक-कलावंतांना बर्लिन भेटले. अ‍ॅक्मातोवा तेव्हा इतकी लोकप्रिय कवयित्री होती की, लहानपणीच इसायाने तिचा अख्खा संग्रह लोकांना तोंडपाठ म्हणून दाखवला होता. तिचा पहिला नवरा निकोलाय गोमिलेव्ह याला गोळ्या मारून ठार मारण्यात आले. त्यापासून तिला मुलगाही झाला होता. या मुलाला आणि तिच्या तिसऱ्या नवऱ्याला दोघांनाही अटक करून छावणीमध्ये पाठवण्यात आले. ३ जानेवारी १९४६ साली परत तो तिला भेटला. या भेटीनंतर  तिने ‘पोएम  विदाऊट  हीरो’चे पुढचे कडवे लिहिले आणि त्यात बर्लिनचा उल्लेख ‘भविष्यातून आलेला मुलगा’ असा केला होता. यानंतर स्वातंत्र्याच्या कल्पनेवर बर्लिन यांनी बरेच चिंतन केले आणि ‘टू कन्सेप्ट्स ऑफ लिबर्टी’मधून सकारात्मक स्वातंत्र्याची मांडणी केली. फारसे लेखन न केलेल्या बर्लिन यांना या दोन निबंधांनी तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात अढळपद दिले.

एकूण शीतयुद्धाचा काळ आणि इंग्लंडमधील वैचारिक वातावरण याबरोबरच पुस्तक बरेच काही देते. मग त्यात इ. एच. कार, अ‍ॅना अ‍ॅक्मातोवा यांसारख्यांची अल्पचरित्रे असतील किंवा स्वातंत्र्याच्या संकल्पनेतील त्रुटींची चर्चा असेल, गॉसिप आणि बौद्धिक मेजवानी दोहोंचा संगम यात आहे. हे पुस्तक आहे २०१३ सालचे. भारतात अमेझॉन, किंडलवर ते मिळते. ते पुन्हा वाचायचे अशासाठी की, शीतयुद्धात विद्वानांनीही ज्या चुका केल्या, त्या टाळणेच इष्ट हे कळावे.

 

  • आयझक अ‍ॅण्ड इसाया- द कोव्हर्ट पनिशमेंट ऑफ अ कोल्ड वॉर हेरेटिक
  • लेखक : डेव्हिड कॉट
  • प्रकाशक : येल युनिव्हर्सिटी प्रेस
  • पृष्ठे : ३३५, किंमत :  १०३० रु.

 

शशिकांत सावंत

shashibooks@gmail.com