अलीकडेच अफगाणिस्तानातील शांतताप्रक्रियेबाबत मसलत करण्यासाठी अमेरिका, पाकिस्तान आणि चीन यांच्यात इस्लामाबादेत बठक झाली. या बठकीला खरं तर भारतालाही आमंत्रित केले जाणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. आपल्याला खडय़ासारखे बाजूला काढण्यात आले या प्रक्रियेतून. चीन आणि पाकिस्तान यांच्यातील अभद्र युतीमुळेच हे असे झाले, असे म्हणायला वाव आहे. चीन-पाकिस्तान मत्रीमुळे आपल्याला झाला तर त्रासच होणार आहे. तो कसा, हेच ‘द चायना पाकिस्तान अ‍ॅक्सिस : एशियाज न्यू जिओपॉलिटिक्स’ या पुस्तकाच्या माध्यमातून समजण्यास मदत होते.
पाकिस्तानबाबत भारत जोपर्यंत आकस बाळगून राहील तोपर्यंत आम्ही पाकिस्तानला पािठबा देत राहू. काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानचीच आम्ही पाठराखण करत राहू.. १९६५ मध्ये चीनने अधिकृतरीत्या हे भारताला सांगितले होते, कोणतीही आडकाठी न ठेवता.
या गोष्टीला आता ५० वष्रे पूर्ण झाली. पाच दशकांच्या या कालावधीत परिस्थितीत बराच बदल झाला आहे. अफगाणिस्तानातून रशियन फौजांनी माघार घेतली, रशियन साम्यवाद लयाला गेला, लाल चीननेही साम्यवाद सांभाळत भांडवलशाहीची कास धरली, अमेरिकेशी स्पर्धा करू शकेल एवढी प्रचंड आíथक ताकद कमावली. आणि त्याच बळावर आपले परराष्ट्र धोरण अधिक हेकेखोर व आक्रमक ठेवले. भारताची आíथक ताकद माहीत असल्याने चीनने भारताला सतत अस्वस्थ ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटावर पाकिस्ताननामक प्याद्याचा आपल्या मर्जीप्रमाणे वापर केला आहे आणि अजूनही तो सुरूच आहे.. ५० वष्रे लोटली तरीही..
१९६५ मध्ये चीनने पाकिस्तानची तळी उचलून धरली होती. त्यामुळे १९७१च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामात चिनी लष्कर हाकेला ओ देईल, दक्षिणेकडील बंगालच्या उपसागरातून अमेरिकेचे सातवे आरमार आणि उत्तरेकडून चिनी लष्कर, भारतीय सन्याची कोंडी करतील आणि भारताला नाक मुठीत धरायला लावतील, हा पाकिस्तानचा होरा अगदीच काही अनाठायी नव्हता. पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी तसे प्रयत्न केलेही. मात्र, चीनने ताकास तूर लागूच दिला नाही.
याच चीनने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी स्थान देण्याला कायमस्वरूपी विरोध दर्शवला आहे. का, तर पाकिस्तानला वाईट वाटू नये म्हणून. भारताला हा मान मिळणार असेल तर पाकिस्तानलाही तो मिळावा, हा त्याचा हट्टाग्रह. पाकिस्तानने केवळ अमेरिकेचेच िमधे राहू नये म्हणून सतत त्याला गोंजारणे, वाट्टेल तेवढय़ा पशांची गुंतवणूक पाकिस्तानात करणे, पाकिस्तानी सन्याला खुलेआम मदत करणे.. हा चीनचा दुतोंडीपणा आजतागायत कायम आहे.
मग, १९६५ मधला चीन खरा की १९७१ मधला खरा की आत्ताचा या घडीचा चीन खरा.. हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. खरं तर खरेखोटेपणा वगरे सर्व चीनच्या बाबतीत झूठच आहे. जागतिक समुदायाला काय वाटेल, आंतरराष्ट्रीय स्तरावर काय प्रतिक्रिया उमटतील याच्याशी कोणतेही सोयरसुतक नसलेला हा देश एकाचवेळी अनेक कसरती करत असतो. दहशतवादाविरोधातील लढाईसाठी भारतीय लष्कराबरोबर संयुक्त कवायती करायच्या आणि त्याचवेळी पाकिस्तानशी सलगी साधायची, भारताबरोबर द्विपक्षीय संबंध सुधारण्याचा तोंडदेखलेपणा करतानाच पाकिस्तानशी लष्करी सहकार्याचे करार करायचे, हा असला दुतोंडीपणा केवळ चीनच करू शकतो.. पाकिस्तान आणि चीनची ही अभद्र युती भारताला कायमस्वरूपी डोकेदुखी ठरलेली आहे, आणि हाच तपशील आपल्याला वाचायला मिळतो अँड्रय़ू स्मॉल यांच्या ‘द चायना पाकिस्तान अ‍ॅक्सिस : एशियाज न्यू जिओपॉलिटिक्स’ या पुस्तकातून.
चीनविषयीचे तज्ज्ञ म्हणून स्मॉल यांची ओळख फार पूर्वीची. चीन, पाकिस्तान, अमेरिका आणि भारतातील या विषयांमधील तज्ज्ञ, बुद्धिजीवी, सरकारी अधिकारी, राजकारणी यांच्याशी तपशीलवार चर्चा करून त्यांनी या पुस्तकाची मांडणी केली आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकेने काढता पाय घेण्याचे सूतोवाच करताच चीनने आपले लक्ष या प्रदेशात वळवले आहे. त्यासाठी पाकिस्तानला त्याने पुढे केले आहे. तालिबान्यांशी संवाद साधणे, प्रसंगी त्यांना पाठिंबा दर्शवणे, पाकिस्तानला त्यासाठी भरघोस मदत करणे या सर्वाच्या मुळाशी आहे, तो अफगाणिस्तानात आपला तळ ठोकण्याचा चीनचा उद्देश. त्यामुळेच भारताला अफगाणिस्तानात फारशी लुडबूड करू न देण्याचा चीनचा मानस आहे. त्यासाठी तो अर्थातच पाकिस्तानचे प्यादे पुढे करतो. यातूनच अलीकडेच झालेल्या अफगाणिस्तानबाबतच्या बठकीत भारताला आमंत्रित करण्यात आले नव्हते.
काश्मिरातील लढाईसाठी चीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करतो, असा उल्लेख या पुस्तकात असतानाच त्या मोबदल्यात चीन त्याच्या मुस्लीमबहुल उघीर प्रांतातील वाढत्या दहशतवादाला पाकिस्तानी दहशतवादी संघटना पािठबा देणार नाहीत, याची हमी मागतो. पाकिस्तानातील लाल मस्जिद प्रकरण असो वा त्या देशातील लष्करी सत्तेचा लोकनियुक्त सरकारच्या दैनंदिन कारभारातील हस्तक्षेप असो, चीन त्याकडे हेतुत दुर्लक्ष करतो.
पाकिस्तानला अण्वस्त्रसज्ज करण्यातही चीनचा मोठा हातभार आहे. भारतावर अंकुश ठेवण्यासाठी चीनला पाकिस्तान अण्वस्त्रसज्ज हवा आहे. त्यासाठी चीनने गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानला अणुबॉम्ब तयार करण्यासाठी हरतऱ्हेची मदत दिली आहे. स्मॉल यांनी याचा ऊहापोह त्यांच्या या पुस्तकात केला आहेच, शिवाय येत्या काळात पाकिस्तान आणि चीन यांच्या अभद्र युतीतून भारतीय उपखंडात निर्माण होणाऱ्या अशांततेबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. चीनच्या मदतीमुळे पाकिस्तान त्याच्या ताटाखालचे मांजर बनले आहे, हे काही कोणी सांगायला नकोच. त्यामुळेच चीनला ग्वादार बंदर आंदण देण्याचा ‘उदात्त’पणा पाकिस्तान दाखवतो. या ग्वादार बंदराचा उपयोग भारतीय नौदलावर नजर ठेवण्यासाठीच चीन करतो.
चीन आणि पाकिस्तान यांच्यातील या अभद्र युतीकडे आपण कसे पाहतो, यालाही महत्त्व आहे. दुर्दैवाने चीनच्या बाबतीतले आपले धोरण अजूनही धरसोडीचे आहे. एकीकडे चीन आपली कोंडी करण्याचा प्रयत्न करत असताना त्याकडे आतापर्यंत दुर्लक्ष झाले होते. अलीकडच्या काळात मात्र या धोरणात काहीसा बदल होऊ लागला आहे. एकंदरच चीन-पाकिस्तान युती आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करणे आपल्याला परवडणारे नाही, हेच या पुस्तकातून समजण्यास मदत होते.
‘द चायना पाकिस्तान अ‍ॅक्सिस :
एशियाज न्यू जिओपॉलिटिक्स’
लेखक- अँड्रय़ू स्मॉल
प्रकाशन – रँडम हाऊस इंडिया
पृष्ठे- ३४७, किंमत : ३९९ रु.

विनय उपासनी
vinay.upasani@expressindia.com