‘यशस्वी जीवनाचा कानमंत्र’, ‘कर्करोगाशी सामना कसा कराल’, ‘मित्र कसे जोडावेत’, ‘आठ दिवसात वजन कसे कमी कराल’ वगैरे प्रकारच्या इंग्रजी ‘स्व-मदत’ पुस्तकांचा खप नेहमीच तडाखेबंद असतो. परंतु आपल्याला या पुस्तकांनी काही फायदा होण्याच्या ऐवजी हानीच होण्याची शक्यता अधिक असते.. असे अगदी साधार संशोधन माँट्रिअल विद्यापीठातील संशोधकांनी वाचकांच्या पाहणीअंती अलीकडेच मांडले आहे.

स्वमदत पुस्तकांमध्येही दोन प्रकार असतात : समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग सांगणारी – ‘समस्याप्रधान’ पुस्तके आणि आत्ता आहात त्यापेक्षा यशस्वी/ प्रसन्न किंवा कौशल्यवान किंवा सुखी कसे व्हाल, यावर भर देणारी ‘व्यक्तिमत्त्वविकास’ पुस्तके.. प्रेरणात्मक संदेश त्यात दिलेला असतो. ‘स्वमदत पुस्तके नुकसानच अधिक करतात का?’ हा प्रश्न संशोधकांनी धसाला लावून पाहिला तेव्हा, दुसऱ्या प्रकारची पुस्तके जरा कमी ‘घातक’ आहेत, असा निष्कर्ष निघाला!
जी स्वमदत पुस्तके समस्या सोडवण्याचे मार्गदर्शन करणारी असतात, त्यामुळे नैराश्य (कमी न होता, ) वाढते असे या संशोधनात दिसून आले आहे. ‘न्यूरल प्लास्टिसिटी’ या शोधपत्रिकेत (जर्नल) प्रसिद्ध झालेल्या या संशोधनानुसार जे लोक अधिक विकासासाठी म्हणजे दुसऱ्या गटातील स्वमदत पुस्तके वाचतात, त्यांच्यातही ताण थोडाफार वाढलेला दिसतो. आता यात कोंबडी आधी की अंडे आधी असा प्रश्नही आहे. ताणतणाव निर्माण होण्याच्या दिशेने वाटचाल करणारे लोक स्वमदत पुस्तके वाचतात; मग कसे यशस्वी नाही, कसे ‘ठीक’ नाही हे आणखीच ठसते आणि आधीच असलेला मानसिक ताण वाढतो.. की याउलट, काहीही लक्षणे नसलेले लोक स्वमदत पुस्तके वाचतात मग त्यांच्यात ताण निर्माण होतो असा प्रश्न आहे. त्याचे सोपे उत्तर म्हणजे : जे लोक अशी पुस्तके वाचत नाहीत त्यांच्यापेक्षा जे लोक अधिक विकासासाठी कथित मार्ग सुचवणारी पुस्तके वाचतात त्यांच्यात ताण जास्त निर्माण होतो, एवढे खरे.
हेच, माँट्रिअल विद्यापीठाच्या पीएचडी विद्यार्थिनी कॅथरिन रेमंड यांनी संशोधनाअंती सांगितले आहे. त्यांच्यामते आधी पुस्तके वाचली जातात मग ताण निर्माण होतो, की आधी ताण निर्माण होतो मग पुस्तके वाचली जातात याचे उत्तर सध्यातरी ठामपणे देता येत नाही. या पुस्तकांमुळे समजा नुकसान झाले नाही, तरीदेखील- भावनिक स्थैर्य, आत्मविश्वास वाढणे, स्वयंशिस्त अंगी येणे असे कुठलेही सकारात्मक परिणाम त्या वाचकांमध्ये दिसत नाहीत.
याला ग्रांथिक दुजोराही आहे. ‘श्ॉम- हाऊ द सेल्फ हेल्प मुव्हमेंट मेड अमेरिका हेल्पलेस’ हे पुस्तक लिहिणारे स्टीव्ह सालेरनो यांनी असे म्हटले आहे की, स्वमदत पुस्तकात दिलेले सल्ले हे मानसिक संशोधनाचा आधार घेऊन दिलेले नसतात, त्यात समुपदेशन या शास्त्रीय पद्धतीचा वापरही नसतो. स्वमदत पुस्तकांची कल्पना जरी काही प्रशिक्षित मानसरोगतज्ज्ञांनी पूर्वी सुरू केली असली तरी त्यात नंतर इतर व्यावसायिक प्रवृत्तींचा शिरकाव झाला आहे. कुठलाही पुरावा नसलेल्या केवळ आशयाच्या आधारे कुणाचा फायदा होऊ शकत नाही. याचा अर्थ पुस्तके मानवी जीवनात बदल घडवूनच आणू शकत नाहीत असे मात्र नाही. जर तुम्हाला खरोखर काही मानसिक आजार असेल तर अशी पुस्तके वाचून तो बरा होत नाही, त्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य आहे. याउलट, कॅथरीन यांच्या मते काही डॉक्टर, संशोधक अशा प्रकारची चांगली पुस्तके लिहितात, ती वाचली तर हरकत नाही पण जर चुकीची पुस्तके तुमच्या हाती पडली तर मात्र त्याचे दुष्परिणाम होतात यात शंका नाही.
या नमुना-पाहणीत समाविष्ट व्यक्तींची संख्या ३० होती. त्यातील निम्मे लोक स्वमदत पुस्तके वाचत होते तर निम्मे वाचत नव्हते. त्याचे निष्कर्ष http://www.hindawi.com/journals/np/aa/624059/  या संकेतस्थळावरून वाचता येतात. तेव्हा त्यातील कच्चे दुवेही कळू लागतात. यात जे लोक अशी पुस्तके वाचत नाहीत व जे वाचतात अशा दोन गटांपैकी स्वमदत पुस्तके वाचणाऱ्यांच्या शरीरात (लाळेत) कॉर्टिसॉल या ताण आल्यावर निर्माण होणाऱ्या संप्रेरकाचे प्रमाण वाढलेले दिसले.
हे संशोधन प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचल्यानंतर एका (हफिंग्टन पोस्ट) संकेतस्थळावर व्यक्त झालेल्या दोन प्रतिक्रिया बोलक्या आहेत. ‘वयाच्या विशीत मी कॉलेजमध्ये गणिताचा अभ्यास करण्याची स्वप्ने पाहात होतो पण त्याचवेळी डेव्हीड श्वार्टझ यांचे ‘द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग’ हे पुस्तक वाचनात आले, त्यामुळे माझा दृष्टिकोनच बदलून गेला.’ अशी एक प्रतिक्रिया, तर दुसरी प्रतिक्रिया विरोधाची – ‘जेवढी तुम्ही स्वमदत पुस्तके वाचाल तेवढे तुम्ही तुमच्यात वैगुण्य आहे हे मनावर ठसवत जाता, त्यामुळे तुमच्यात काही चांगला बदल घडवण्याऐवजी आत्मविश्वास कमी होत जातो.’
पुस्तकात व्यक्तिपरत्वे सल्ला दिला जात नाही, हे माहीत असूनही लोक ‘मानसिक ताण’ हा आजार म्हणून का मान्य करीत नाहीत? व्यावसायिक उपचारात स्वप्ने दाखवली जात नाहीत, तर तुमच्यातील बदल प्रत्येकवेळी नोंदले जातात. त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती फारशी नसते. पुस्तकांच्या मदतीने यशस्वी उपचार करण्याच्या या पद्धतीला ‘बिब्लिओथेरपी’ म्हणतात. जगातील बहुतेक देशांत स्वमदत पुस्तकांची बाजारपेठ फार मोठी आहे. पण प्रत्येक व्यक्तीची समस्या वेगळी असते. त्यामुळे त्यावर एकच सल्ला कसा असू शकेल हाही प्रश्न उपस्थित होतो.