एक आटपाट, संपन्न राज्य होतं. राज्याच्या राजधानीत राहायचा एक विचारवंत शिक्षक. तो चौकाचौकांत उभं राहून नगरातल्या लोकांशी, विशेषत: युवकांशी चर्चा करायचा. त्यांना राजकारण, समाजकारण, आजूबाजूच्या घडामोडी, तत्त्वज्ञान यांविषयी प्रश्न करायचा. त्यांचे विचार जाणून घ्यायचा. प्रश्नोत्तरांच्या या संवादातून त्यांच्या पोटात शिरून त्यांना विचार करायला लावायचा. एकास दुसरा या न्यायाने शहरातले युवक त्याच्याकडे आकर्षित होऊ लागले. सामान्य घरातल्या युवकांपासून ते सामंतांच्या घरातल्या युवकांच्या विचारांतही या विचारवंताच्या शिकवणीचा प्रभाव दिसू लागला. विचार करणाऱ्या, चर्चेची मागणी करणाऱ्या आणि प्रसंगी सत्तेच्या ध्येयधोरणांवर टीका करणाऱ्या या नव्या युवकांनी समाजात परिवर्तनाची मागणी करायला सुरुवात केली आणि संघर्षांची सुरुवात झाली. ही गोष्ट आहे अदमासे ख्रिस्तपूर्व ४००-४५० वर्षांपूर्वीची. ग्रीक साम्राज्याची राजधानी अथेन्स शहरातली. गोष्टीतला विचारवंत म्हणजे पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा प्रणेता मानला जाणारा सॉक्रेटिस.
अकरावीत असताना संध्या मॅडमनी अश्या गोष्टींतूनच तत्त्वज्ञान शिकवायला सुरुवात केली. ही गोष्ट ऐकून मी झपाटल्यासारखा तत्त्वज्ञानावरची आणि खासकरून सॉक्रेटिसविषयीची पुस्तकं वाचायला लागलो. एकेका पुस्तकातून सॉक्रेटिसच्या विचारांची, शिकवण्याच्या अनोख्या पद्धतीची आणि त्याने युवकांवर घातलेल्या मोहिनीची ओळख पटत गेली. हे सारं होत असतानाच मला एक जाणीव तीव्रतेने अस्वस्थ करत राहिली की माझ्या आयुष्यातही एक सॉक्रेटिस होता.
सहावी-सातवीत असेन. आमच्या घरात देव, व्रत-वैकल्यं आणि पुरोगामी विचार यांचं एक अनोखं मिश्रण होतं. आई अतिशय देवभोळी. वडिलांकडूनच्या कुटुंबात, गावाकडे आमचं स्वत:चं देऊळ आहे. आजोबा स्वत: त्या देवळाचे पुजारी. आजोळकडून समाजवादी विचारांचा वारसा. आजीची देवादिकांवर श्रद्धा, मात्र कर्मकांडाशी तिचं फारसं जमलं नाही. इतर मामे-मावस आजी आजोबा, मामा-मावश्या स्वत:चे विचार जपणाऱ्या साहजिकच आमच्या घरात मला स्वातंत्र्य होतं. एकीकडे आईकडून संस्कार म्हणून देवाचरणी लीन होण्याचा आग्रह असायचा, तर मला चिकित्सक वृत्ती स्वस्थ बसू द्यायची नाही. यातच एकदा आमच्या घरातल्या बंडखोर म्हणून नावाजलेल्या माझ्या थोरल्या आतेबहिणीसोबत मी तिच्या चळवळीच्या कार्यक्रमाला गेलो.
तिथे कुणी एक माणूस नागपंचमीच्या निमित्ताने श्रद्धा, अंधश्रद्धा या विषयांवर बोलत होता. प्रश्न विचारत होता. माझ्या ताईसकट समोर बसलेले सारे त्याच्या प्रश्नांना उत्तरं देत होते. एक सर्पतज्ज्ञ सापांविषयी माहिती देत होता. एकूणच निसर्गाविषयी उत्तम माहिती असल्याने मला ते सारंच कळत होतं, आवडतही होतं. पुढे मग काही र्वष मी ताईसोबत तिच्या या कार्यक्रमांना अनेकदा जाऊ लागलो. अंगात देवी येणे, भानामती इथपासून सत्यनारायणाची पूजा, पिंडदान ते पार सण साजरे करण्याच्या पद्धती या सगळ्याच गोष्टींवरच्या चर्चा कानावर पडल्या. गमतीची गोष्ट म्हणजे मी शाळेत पाहिलेले, स्वत: केलेले प्रयोग मला बुवाबाबांचे चमत्कार म्हणून इथे पाहायला मिळाले आणि मी या चळवळीकडे ओढला गेलो.
त्या वयात या विचारांचं आकर्षण वाटत होतं, मात्र स्पर्धा-परीक्षांना जाताना घरातल्या देव्हाऱ्यासमोर हात जोडल्याने धीर येतो हेदेखील नाकारता येत नव्हतं. मन-विचारांतलं द्वंद्व थेट देवाशीच भांडण मांडून बसलं. तोपर्यंत भाषण करणाऱ्या गृहस्थांशी ओळख झाली होतीच, मी त्यांच्याशी थेट बोलायचंच ठरवलं. एका कार्यक्रमानंतर गाठलं आणि थेट प्रश्न केला- ‘‘मी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करतो, मात्र देव्हाऱ्यासमोर हातही जोडतो. कसं वागायचं मी?’’ ते हसले, अगदी मोकळेपणे. मग म्हणाले, ‘‘अहो चिंता कसली करता? तुम्ही माझ्यासारखे कसे वागाल. तुमच्यासारखेच वागा, पण तुमच्या विचारांना पटतं म्हणून, मी सांगतो म्हणून नव्हे. माझं म्हणणं फक्त इतकंच, विचार करा!’’ आपण वागतो त्यात फार काही चूक नाही हा दिलासा मला आधार देऊन गेला. देवाशी माझं भांडण मिटलं.
नववी-दहावीपर्यंत माझ्या मिसरुडाआधीच मला मतं फुटायला लागली होती. त्याच तोऱ्यात मी एका कार्यक्रमानंतर त्यांना गाठलं. पुन्हा प्रश्न, ‘‘तुम्ही बुवाबाजी, मंत्र-तंत्राविषयी बोलता. खेडय़ापाडय़ातला लोकांना तोच एक आधार असतो. तुम्ही डॉक्टरकी सोडून असे सल्ले देत फिरलात तर त्यांना कोणाचा आधार? तुम्ही साफ चुकताय.’’ आजूबाजूच्या कार्यकर्त्यांत एकच खसखस पिकली. तेदेखील मिस्किलपणे हसले. मग त्यांच्या नेहमीच्या, जवळजवळ वकिली शैलीतच त्यांनी प्रश्न केला, ‘‘तुम्हाला काय वाटतं की मी काय करावं?’’
‘‘पुन्हा डॉक्टरकी सुरू करा, फावल्या वेळात हे काम करा.’’ मी थेट उत्तर दिलं.
‘‘अहो, मी खूप डॉक्टरकी केली. तेव्हाच तर मला कळलं की हे काम फावल्या वेळात करण्याचं नव्हे. म्हणून तर या कामात उतरलो. आता गावोगाव फिरतो, लोकांशी बोलतो, समजावतो. श्रद्धेआडून होणाऱ्या शोषणाची, फसवणुकीची त्यांना जाणीव करून देतो. हे काम कुणीच करत नाही हो, डॉक्टर बरेच आहेत! पटतंय का?’’ त्यांच्या प्रश्नाने मी पुन्हा विचारात पडलो.
ते माझ्यापेक्षा सर्वार्थाने मोठे- वयाने, मानाने आणि कर्तृत्वाने. मात्र त्यांनी कधीही कोणाला हटकल्याचं, प्रश्न विचारला म्हणून रागावल्याचं स्मरत नाही. तसे ते कठोर, प्रसंगी भीतीदायकही वाटायचे. मुद्देसूद, ठामपणे आणि ठासून बोलायचे. मात्र तितकेच गोड हसायचे. पाठीवरून हात फिरवत समजून घ्यायचे आणि मनापासून समजून सांगायचे. श्रद्धा-अंधश्रद्धा याविषयी त्यांचं सोपं सूत्र होतं. मनापासून येते ती श्रद्धा, आणि भीतीपोटी येते ती अंधश्रद्धा. श्रद्धेमध्ये प्रेम आहे, अंधश्रद्धेमध्ये व्यवहार, शोषण आहे. त्यांचं ‘विचार तर कराल?’ हे पुस्तक मला शाळेत असताना वाचल्याचं आठवतंय. या पुस्तकापासूनच त्यांची पुस्तकं वाचायला सुरुवात झाली. विवेकाने वागायचं, विचार करायचा म्हणजे काय याची तोंडओळख इथे झाली. नुकतंच ‘विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी’ हेदेखील वाचलं.
आजही मला गणपती आवडतो. बुद्ध जवळचा वाटतो. घरभर त्यांच्या मूर्ती, तैलचित्रं आहेत. बागेतली फुलं त्यांना वाहतो. मनोभावे हातही जोडतो. मात्र गणपतीला सोन्याचा मुकूट करण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मदत करायला आवडतं. आजी-आजोबांचं श्राद्ध करण्याऐवजी त्या दिवशी गरजू विद्यार्थ्यांना अन्नदान करण्याचा आईबाबांचा वारसा मला मोलाचा वाटतो. लिंबू-मिर्ची बांधण्यापेक्षा मी आनंदी वातावरण जोपासतो. दृष्ट लागण्याची चिंता नाही, तर योग्य दृष्टिकोण घडवण्याकरता झटतो. सत्यनारायणाची पूजा कधीच घातली नाही, मात्र सत्याची कास धरतो. दिवाळीत फटाके फोडायचे बालपणीच बंद केले, आता इतरांनाही फटाके न फोडण्याचं आवाहन करतो. मी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा कार्यकर्ता नाही, कधीच नव्हतो. मात्र माझ्या सॉक्रेटिसने लावलेली विचार करण्याची, विवेकाने वागण्याची सवय आजही अंगात विचारांत भिनलेली आहे. माझा सॉक्रेटिस, अर्थात डॉ. नरेंद्र दाभोलकर आज हयात नाहीत. मात्र त्यांनी लिहिलेली ही दोन पुस्तकं त्यांना तुमच्या आयुष्यातला सॉक्रेटिस करतील, तुम्हाला विचार करायला उद्युक्त करतील याची खात्री वाटते. ही पुस्तकं जरूर वाचा आणि आपल्या श्रद्धा-अंधश्रद्धांविषयी थोडा विचार तर करा!
हे पुस्तक कुणासाठी? विचार करणाऱ्या, न करणाऱ्या प्रत्येक बालमित्र आणि त्यांच्या पालकांसाठी.
पुस्तक : ‘विचार तर कराल?’, ‘विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी’
लेखक : डॉ. नरेंद्र दाभोलकर
प्रकाशक : अनुक्रमे राजहंस प्रकाशन आणि दिलीपराज प्रकाशन
श्रीपाद ideas@ascharya.co.in