लक्ष्मी, कौस्तुभ, ऐरावत, चंद्र अशी एकामागून एक अमूल्य रत्ने समुद्रातून बाहेर पडत होती. देव आणि दानव शर्थीचे प्रयत्न करून समुद्रमंथन करीत होते. त्यातून अकरावे रत्न बाहेर आले, ते म्हणजे पारिजातकाचे झाड. अशी पारिजातकाच्या जन्माची कथा सांगितली जाते. हाच पारिजातक इंद्राने नेऊन स्वर्गात लावला नि सत्यभामेच्या हट्टावरून कृष्णाने तो इंद्राशी युद्ध करून पृथ्वीवर आणला.

पारिजातक हा  साधारण मध्यम उंचीचा किंवा लहान भारतीय वृक्ष. Nyctanthes arbor – tristis  (न्याक्टॉन्थस अरबोर- ट्रिस्टिस) असं त्याचं शास्त्रीय नाव. कोणत्याही प्रकारच्या मातीत आणि कमी पाण्यातदेखील वाढणारे हे सदाहरित झाड. प्राजक्त, हरसिंगार या नावानेदेखील त्याला ओळखले जाते. पारिजातकाची फुले रात्री उमलतात; त्यांचा सुगंध मंत्रमुग्ध करणारा असतो. म्हणून इंग्रजीत त्याला Night Jasmine असे म्हणतात.

A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
Loksatta Lokrang Picture Painting Tourist places the sea
चित्रास कारण की: समुद्रसरडा
puppy rescue
माणुसकीला सलाम! दोन भिंतीच्यामध्ये अडकलं कुत्र्याचं पिल्लू; भिंत फोडून काढले बाहेर, पाहा Viral Video
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

ही फुले पांढरी शुभ्र, तर त्याचा देठ गडद भगव्या रंगाचा असतो. ही रंगसंगती खूप सुंदर दिसते. ही फुले इतकी नाजूक असतात की त्यांना खूप हळुवारपणे हाताळावे लागते. जरासुद्धा धसमुसळेपणा या फुलांना सहन होत नाही. फुले रात्री उमलतात नि पहाटे सूर्योदयापूर्वी देठासकट गळून पडतात. झाडावर पारिजातकाचे फूल पाहायचे असेल तर रात्रीच त्याला भेटावे लागेल. सकाळी फुलांचा जमिनीवर  सडा पडलेला असतो. देवाला वाहण्यासाठी ही फुले वापरली जातात. याच्या गडद भगव्या देठापासून रंग तयार करतात;  हा रंग रेशीम तसेच कपडय़ांना रंगविण्यासाठी नैसर्गिक रंग म्हणून वापरला जातो, तसेच लिपस्टिकमध्येदेखील हा रंग वापरतात. दिवसा फुलांचा रंग फिकट तर रात्री गडद  दिसतो. पारिजातकाची फुले औषधात वापरली जातात.

पारिजातकाची पाने खरखरीत तसेच काहीशा कातरलेल्या कडा असलेली असतात. (काही वेळेला पानाच्या कडा कातरलेल्या नसतात किंबहुना कधी कधी एकाच झाडावर दोन्ही प्रकारची पाने पाहायला मिळतात). या पानांचे आयुर्वेदात प्रचंड उपयोग नमूद केलेले आहेत. कोणत्याही प्रकारच्या तापावर या पानांचा काढा हा अत्यंत गुणकारी मानला जातो. मलेरियात विशेष करून पारिजातकाच्या  पानांचा काढा दिला जातो. तसेच संधिवात आणि आतडय़ातील जंतावरदेखील हा काढा गुणकारी आहे. पारिजातकाच्या पानांचा रस हा कफावर गुणकारी आहे. रोजच्या चहात पारिजातकाचे एक/ अर्धे पान टाकून प्यायल्यास अनेक विकारांपासून सहज मुक्ती मिळू शकते.

पारिजातकाची साल पावडर करून सांधेदुखीत वापरली जाते, तसेच ती तापातदेखील गुणकारी आहे.

पारिजातकाचे झाड हे शोभेचे झाड म्हणून बगीचा तसेच घराच्या आवारात लावले जाते. पारिजातकाचे फूल हे पश्चिम बंगाल या राज्याचे राज्यफूल आहे.

सकाळी सकाळी पारिजातकाच्या फुलांचा पडलेला सडा पाहून मन प्रसन्न होते. हे झाड हलवले की ही फुले टप टप खाली पडतात. वर्षभर फुले येत असली तरी पावसाळ्यात याला विशेष बहर येतो. लहानपणी पारिजातकाची फुले गोळा करून गणपती बाप्पाला त्याचा हार, कंठी, बाजुबंद बनविणे हा माझा गणपतीमधील आवडता उद्योग होता.

पारिजातकाच्या बिया चपटय़ा; आधी हिरव्या नंतर पक्व झाल्यावर त्या चॉकलेटी  रंगाच्या होतात. बियांपासून नवीन रोपांची निर्मिती होते, तसेच फांद्यांपासूनदेखील नवीन रोपे तयार करता येतात.

पारिजातकाच्या प्रत्येक भागाचा आयुर्वेदात उपयोग सांगितला आहे. म्हणून त्याला कल्पवृक्ष असेदेखील म्हणतात. चौदा रत्नांपैकी असे हे एक दुर्मिळ नि अत्यंत सुवासिक, नाजूक फुले देणारे, औषधी स्वर्गीय रत्न आपल्या घराच्या आवारात असायलाच हवे..

गोडांबे bharatgodambe@gmail.com