‘अ रे व्वा! किती सुंदर चित्र काढलंयस! कुणाचं आहे?’ मयूने काढलेल्या चित्राचं कौतुक करत आईनं विचारलं.
‘बालगणेश.’ चित्रातून डोकं वर न काढता मयू म्हणाली.
मयू खरंच खूप छान छान चित्रं काढायची. तिच्या घरातले, शाळेतले शिक्षक, मित्र-मैत्रिणी सगळेच तिच्या चित्रकलेचं खूप कौतुक करायचे.
‘आई, तुला एक विचारू?’ मयू हळूच आईला म्हणाली.
‘हो, विचार की!’
‘मला नं, खूप सारी चित्रं काढायची आहेत. म्हणजे फुलांची, फळांची, झाडांची, स्नो-व्हाइट-सिंड्रेलाची, मिकी-डोनाल्डची, टॉम आणि जेरीची, छोटा भीमची.’
‘मग?’
‘त्यासाठी मला खूप वेगवेगळ्या प्रकारचे रंग लागतील नं! क्रेयॉन्स, स्केचपेन्स, वॉटर कलर्स वगैरे. आत्ता माझ्याकडे जे क्रेयॉन्स आहेत नं, ते संपत आलेत. आणि मला बाकीचेही रंग हवे आहेत. ते सगळे मला एक्काच कलरिंग बॉक्समध्ये एकत्र मिळाले तर कित्ती मज्जा येईल! बॉक्स उघडला की रंगच रंग!’
मयू एकदम शहाणी मुलगी होती. कधी काही मागणं नाही किंवा कसला हट्ट नाही. पण तिचं रंगांचं प्रेम आईला चांगलंच माहीत होतं. त्यामुळे मयूला रंगांचा बॉक्स हवाय हे आईच्या लक्षात आलं.

‘आई, सांताक्लॉज म्हणजे कोण गं?’ घरात शिरताच मयूनं आईला प्रश्न विचारला.
‘मला आत्ता खेळताना ओवी सांगत होती की, सांताक्लॉजने तिला मागच्या वर्षी काहीतरी गिफ्ट दिलं होतं. आणि या वर्षीपण देणार आहे ख्रिसमसला.’
मयू तशी लहान होती. तिने सांताक्लॉजला चित्रात वगैरे बघितलं होतं, पण तिला त्याच्याबद्दल फारसं काही माहीत नव्हतं.
‘अगं, सांताक्लॉज म्हणजे नं एक आजोबा असतो. त्याला पांढरी मोठ्ठाल्ली दाढी आणि मिशी असते. त्यानं लाल-लाल कपडे घातलेले असतात. आणि त्याच्या डोक्यावर एक गोंडय़ांची लाल टोपीही असते. तो सगळ्या शहाण्या मुलांना दरवर्षी ख्रिसमसला गिफ्ट्स वाटायला येतो..’ आईनं समजावलं.
‘पण मी कध्धीच कसं नाही बघितलं त्याला?’
‘अगं, तो गुपचूप रात्री येतो नं! तू झोपलेली असतेस तेव्हा!’
‘पण त्यानं मला कुठे काही गिफ्ट दिलंय?’
आईला काय उत्तर द्यावं ते समजेना. तितक्यात मयूनेच पुढे विचारलं, ‘आई, तो राहतो कुठे?’
‘अगं, तो दूर-दूर बर्फाच्या देशात राहतो.’
‘म्हणजे आकाशात?’
‘हो. अगं, तिथे त्याची खेळणी बनवायची एक मोठ्ठी फॅक्टरी आहे. खूप सारी बुटकी- म्हणजे छोटी छोटी माणसं त्याला ती खेळणी वगैरे बनवायला मदत करतात. आणि त्याची बायकोसुद्धा सगळ्या मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे केक्स, बिस्किट्स, चॉकलेट्स बनवायला त्याला मदत करते. ज्या मुलांनी वर्षभरात त्याच्याकडे खाऊ  किंवा खेळणी मागून ठेवलेली असतात नं, त्यांना तो ख्रिसमसला- म्हणजे २५ डिसेंबरला ती गिफ्ट्स वाटण्यासाठी येतो.’
‘तो इतका लांब राहतो तर येतो कसा?’
‘त्याच्याकडे एक उडणारा रथ आहे.’
‘उडणारा रथ?’
‘त्याच्या रथाला पुढे घोडय़ांच्या ऐवजी आठ उडणारे रेनडियर बांधलेले असतात. हा रथ फक्त ख्रिसमसच्या दिवशीच उडतो बरं का, एरवी नाही हं!’
‘आई, रेनडियर म्हणजे काय गं?’
‘असं समज- बर्फातलं हरीण. आठवतं, आपण राणीच्या बागेत पाहिलं होतं हरीण? थोडंसं तसं. पण या रेनडियरला मोठ्ठाली शिंगं असतात. हे रेनडियर म्हणजे बर्फातलं वाहन.’
आई पुढे म्हणाली, ‘सांताच्या पाठीवर एक मोठ्ठी लाल रंगाची झोळी असते- ज्यामध्ये तो केक्स, बिस्किट्स, चॉकलेट्स, खेळणी असं सगळं भरून आणतो. ख्रिसमसच्या आदल्या रात्री तो खिडकीतून येतो आणि ती खेळणी आणि खाऊ ज्यांनी कुणी मागितला असेल त्यांच्या घरी गुपचूप ठेवून निघून जातो.’
‘आहा.. काय मज्जा! मी काही मागितलं तर मलाही तो देईल?’
‘हो, देईल की!’
‘आणि मी रात्री जागी राहिले तर तो दिसेल मला?’
‘अगं, दिसला तर गंमत काय त्यात? ख्रिसमसच्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याचं सरप्राइझ गिफ्ट मिळायला हवं नं आपल्याला?’
‘आई, पण सांता मला ओळखेल कसा? त्याने तर मला कधीच नाही बघितलं! आणि मला काय हवंय ते त्याला कळणार कसं? मी तर त्याला काहीच नाही सांगितलं!’
‘कळतं त्याला बरोब्बर! चला आता जेवायला. भूक नाही का लागली?’ मयूचे पुढचे प्रश्न टाळत आई म्हणाली. मयूच्या मनात मात्र आता बरेच विचार घोळू लागले होते.

दुसऱ्या दिवशी आई देवाची पूजा करायला आली तशी तिला देव्हाऱ्यात एक चिठ्ठी ठेवलेली सापडली. उघडून पाहिली तर ती मयूची होती. मयू शाळेतून आल्यावर आईने तिला विचारलं, ‘काय गं मयू, कसली चिठ्ठी ठेवलीस देवापुढे?’
‘अगं, काल ओवी म्हणाली नव्हती का, की तिला सांताकडून गिफ्ट मिळालं!’
‘मग?’
‘मला तो रंगांचा बॉक्स हवा होता नं? मी विचार केला, की तो सांताकडेच मागितला तर? पण त्याला कळणार कसं मला काय हवंय आणि मी कुठे राहते ते? आणि मला तरी त्याचा पत्ता कुठे माहीत आहे? म्हणून मग मी त्या कागदावर रंगांच्या बॉक्सचं, आपल्या बििल्डगचं आणि माझं चित्र काढून काल संध्याकाळीच ‘शुभंकरोति’ म्हणताना गणपतीबाप्पापुढे ठेवलंय. आता गणपतीबाप्पाच माझा निरोप सांताला देईल. मग त्याला आपला पत्ता लगेच मिळेल आणि तो माझं गिफ्ट घेऊन येईल.’
मयूचं बोलणं ऐकून आईला एकदम गंमत वाटली. तिने मयूच्या नकळत तिची चिठ्ठी स्वत:जवळ ठेवून घेतली. देव्हाऱ्यात चिठ्ठी नाही हे दिसल्यावर मयूला वाटलं की गणपतीबाप्पाने तिची चिट्ठी सांताकडे पोहोचवलीसुद्धा!!

संध्याकाळी मयूने खेळायला जाण्यासाठी घराचं दार उघडलं तर तिला दारात एक लाल रंगाचं पाकीट पडलेलं मिळालं.
‘आई, हे बघ काय!’ मयूने आईला हाक मारली.
‘बघू’, असं म्हणत आईने ते पाकीट उघडलं.
‘अगं मयू, सांताचं पत्र आलंय तुला! तू गणपतीबाप्पाला सांगितलं होतंस नं? त्याने तुझं पत्र पोहोचवलं सांतापर्यंत!’
‘आहा! आई वाच नं पत्र..’ मयू उडय़ा मारत म्हणाली. तिला आता ते ऐकल्यावाचून राहवत नव्हतं.
‘बरं, बरं, ऐक.’
‘डिअर मयू,
गणपतीबाप्पाकडून तुझं पत्र मिळालं. तुला रंगांचा बॉक्स हवा आहे नं? मी माझ्याकडल्या एका बुटक्याकडून बनवून घेतला आहे बरं का तो. अगदी तुझ्या चित्रात आहे तसा! मी ख्रिसमसला येईन नं, तेव्हा देईन तुला. तुझ्या घराचं आणि तुझं चित्रपण मिळालं. आता मी तुला नक्की ओळखेन. त्यामुळे काळजी करू नकोस. तुझं गिफ्ट तुला ख्रिसमसला नक्की मिळेल. हो हो हो! मेरी ख्रिसमस!’
– तुझा सांताक्लॉज’
मयू एकदमच खूश झाली. कारण तिला आलेलं हे पहिलंच पत्र होतं.. आणि तेही सांताक्लॉजचं- इतक्या लांबून! तो तिचं गिफ्ट घेऊन येणार होता! मस्स्स्तच! आता कधी एकदा ख्रिसमस येतोय असं तिला झालं होतं..

ख्रिसमसच्या आदल्या दिवशी सांता येणार म्हणून मयूने रात्री उशिरापर्यंत जागं राहण्याचा खूप प्रयत्न केला; पण तिला कधी झोप लागली ते कळलंच नाही. मध्यरात्री काहीतरी खुडखुड आवाज झाला तेव्हा तिला थोडी जाग आली खरी; पण तिच्या डोळ्यांवर इतकी झोप होती की तिला उठवलंच नाही.
सकाळी उठल्यावर पाहते तर तिच्या उशीजवळ सोनेरी चकचकीत कागदामध्ये बांधलेलं एक गिफ्ट होतं. तिने ते लग्गेच उघडून बघितलं, तर त्यात तिला हवा तसा रंगांचा बॉक्स होता. तिने पलंगावरून जोरात उडी मारली आणि आईला बोलावलं.
‘आई, काल रात्री सांता आला होता नं? त्याने माझं गिफ्ट आणलंय, बघ.’    
‘अरे व्वा!’
‘पण आई, मी उठेपर्यंत तू थांबवलं का नाहीस त्याला? मला भेटायचं होतं नं!’
‘अगं, तो गुपचूप येतो, त्यामुळे कुणालाच तो दिसत नाही. तो खूप घाईत असतो. तुझ्यासारख्या कित्तीतरी मुलांनी त्याच्याकडे गिफ्ट्स मागून ठेवलेली असतात नं! त्यांना सगळ्यांना ती गिफ्ट्स वाटायला जायचं असतं त्याला! म्हणून तो लग्गेच गेला असणार. आणि हे पाहिलंस का? त्याने तुझ्याकरता चॉकलेट्स आणि केकही पाठवला आहे.’ ते बघून तर मयूचा चेहरा अजूनच खुलला.
‘आता तो मला कधी भेटणार?’
‘पुढच्या वर्षी- ख्रिसमसला! तू जर रात्री जागी राहिलीस तर भेटेलही कदाचित.’
मयू खूपच आनंदात होती. सांताक्लॉजचं चित्र काढून नव्या रंगांनी कधी ते रंगवतेय, असं तिला आता झालं होतं..

जिंगल बेल
जिंगल बेल, जिंगल बेल
बसून रेनडियरांच्या गाडीत
आला सांता नाचत- गात

लाल डगला, टोपी तांबडी झुबकेदार
सफेद मिशा, दाढी शुभ्र भपकेबाज
मोठ्ठं पोट, गाठोडं पाठीशी वजनदार

गाडीला त्याच्या रेनडियर नऊ
वाटतो सर्वाना खेळणी आणि खाऊ
हसून म्हणतो, ‘मी तुमचाच भाऊ’

आपणही गावं गाणं जिंगल बेल
गाता गाता देत रहावं
देता देता सांताक्लॉज बनावं!

स्टॅन्ली गोन्सालविस