एक होती चिमणी. इवलीशी, गोजिरवाणी. तिनं एका झाडावर सुरेखसा खोपा बांधला होता. त्यात ती आपल्या चिमण्यासोबत पिल्लांना घेऊन राहायची. रोज सकाळी चिमणा-चिमणी पिल्लांसाठी खाऊ आणायला घरटय़ाबाहेर पडायचे. दाणे दिसले किंवा खाण्याजोगं काही दिसलं, की पटापट चोचीनं टिपून ती दोघं घरटय़ाकडे झेप घ्यायचे. आपल्या इवल्याशा चोचीनं पिल्लांना भरवायचे. ‘चीऽ चीऽ’ आवाज करत पिल्लं पटापटा खाऊ संपवायची. मग ती दोघं पुन्हा खाण्याच्या शोधात निघायचे.
अशीच एक दिवस चिमणी गव्हाचा दाणा चोचीत धरून एका झाडाच्या फांदीवर क्षणभर विसावली. थकलेल्या चिऊताईच्या चोचीतून गव्हाचा दाणा गळून खाली पडला. झाडाखाली मोठमोठे लाकडाचे ओंडके ठेवले होते. जवळच काही सुतार आपलं काम करत होते. चिऊताईचा दाणा त्या ओंडक्यांमधे खाली जमिनीवर पडला. चिऊताईनं दाणा शोधायचा खूप प्रयत्न केला, पण काही केल्या तो दाणा सापडेना. ती निराश झाली. मग ती त्या सुतारांकडे गेली अन् त्यांना तिनं विनंती केली, ‘‘माझा दाणा ओंडक्याखाली गेलाय, तो काढून द्या. माझी बाळं भुकेली आहेत.’’ पण सुतारांनी दाणा शोधायला नकार दिला.
सुतारांची तक्रार करायला ती राजाकडे गेली. राजानं तिला मदत केली नाही. राजाची तक्रार घेऊन चिमणी राणीकडे गेली. राणीनंसुद्धा ऐकलं नाही म्हणून राणीचे कपडे कुरतडायला तिनं उंदराला सांगितलं. तोही ऐकेना. मग मांजरीकडे, नंतर कुत्र्याकडे असं करत ती सगळीकडे फिरली; पण कोणीच तिला मदत केली नाही. शेवटी निराश होऊन ती एका झाडाच्या फांदीवर जाऊन बसली. तिला खूप वाईट वाटत होतं. डोळ्यांत आसवं दाटून आली. आता पिल्लं उपाशी राहतील. काय करावं, तिला काही सुचेना.
आभाळात काळे काळे पावसाचे ढग जमायला सुरुवात झाली. थोडय़ाच वेळात आभाळात काळ्या ढगांची फौजच गोळा झाली. चिमणी मनात म्हणाली, ‘आता कुठलं काही मिळायला! एकदा पाऊस सुरू झाला की उडून कुठे जाताही येणार नाही. हे ढग मेले फारच दुष्ट आहेत. नेमकं आत्ताच यांना यायचं होतं?’ तेवढय़ात कुणाचंतरी हसणं तिला ऐकायला आलं. बघितलं तर एक मोठा ढग उतरून बराच खाली आला होता. तोच गडगडाट करून हसत होता. चिऊताईला राग आला. ती म्हणाली, ‘‘किती रे दुष्ट तू ढगा. एक तर माझा दाणा हरवलाय. कोणी तो शोधायला मदत करत नाहीए. माझी बाळं खोप्यात उपाशी बसलीत अन् तुला हसायला येतंय? दाणा शोधायला मदत कर की मला.’’
‘‘चिऊताई, तुला नाही गं मी हसलो. तुझा दाणा हरवल्याचं मला ठाऊकच नव्हतं. तरीपण मी तुला मदत कशी काय करू शकणार? कारण खाली आल्याशिवाय दाणा शोधता येणार नाही. अन् मी खाली येतो ते फक्त पावसाच्या रूपात.  हो, पण एक गंमत मी तुला सांगतो, ज्यामुळे काही दिवसांनी तुला खूप गव्हाचे दाणे मिळतील.’’
‘‘खूप दाणे? ते कसे काय रे?’’
‘‘ते आमचं गुपित आहे. पण आत्ता मात्र तुला नेहमीसारखेच दाणे मिळवावे लागतील. भरपूर दाणे मिळायला तुला वाट पाहावी लागेल. नंतर मात्र तुला ते साठवून ठेवता येतील.’’
चिमणीला वाटलं, ऐकू तर खरं हा काय सांगतो ते! नाही तरी कोणीच मदत करत नाहीए. हा मदत करतोय म्हणतोय तर ऐकूया याचं.
‘‘सांग बाबा, मला काय करावं लागेल ते.’’
‘‘हे बघ चिऊताई, तुझा दाणा ओंडक्याखाली जमिनीवर पडलाय ना? आता मी जमिनीवर मस्त पाऊस पाडेन. जमीन भिजून चिंब होईल. मग गव्हाचा दाणा जमिनीत छान रूजेल. त्याला अंकुर फुटेल. हळूहळू तो वाढत ओंडक्याच्या वर डोकं काढेल. पण ते कोवळं रोपटं तू खाऊन टाकू नकोस हो! अन् कोणाला खाऊपण देऊ नकोस. त्याची नीट राखण कर. मग ते अजून थोडं मोठं झालं की त्याला गव्हाच्या ओंब्या लागतील. त्यात भरपूर गव्हाचे दाणे असतील. ते चांगले मोठे होऊ दे. मग तुझ्याजवळ खूप खूप दाणे असतील. दाण्यासाठी तुला इकडेतिकडे भटकावं लागणार नाही. पटतंय का माझं बोलणं? नसेल पटत, तर मी नाही बरसणार इथे. तो बघ वारा टपूनच बसलाय मला उडवून दूर न्यायला. लवकर विचार करून सांग.’’
चिमणीला ढगाचं म्हणणं पटलं होतं. थोडे दिवस वाट पाहून जर भरपूर दाणे मिळणार असतील तर पाहू या वाट! थोडा धीर धरला तर त्याचं चांगलंच फळ मिळेल. चिमणी आभाळाला म्हणाली, ‘‘हो रे आभाळदादा, तू म्हणतोस तसंच करीन मी. एका दाण्यातून जर भरपूर दाणे मिळणार असतील तर वाट बघायची तयारी आहे माझी.’’
मग ढग पावसाच्या रूपात खाली बरसला. चिमणीला आनंद झाला. रोज चिमणा अन् चिमणी त्या ओंडक्याजवळ येऊन बघायचे. एक दिवस त्यांना ओंडक्यांमधून जरासं रोपटं वर आलेलं दिसलं. मग रोज ती दोघं आळीपाळीनं त्याची राखण करायचे. हळूहळू ते रोपटं मोठं झालं. त्याला ओंब्या लागल्या. त्या मोठय़ा झाल्या. मग झाडं वाळायला लागली. चिमणा-चिमणीनं झाडावर एक वेगळा खोपा तयार केला. एक एक करत त्यांनी गव्हाचे दाणे त्या खोप्यात साठवून ठेवले.
इतके मोठे गव्हाचे दाणे बघून त्यांना फार आनंद झाला. मनोमन चिमणीने ढगाचे आभार मानले. आता दाणे टिपण्यासाठी त्यांना वणवण भटकावे लागत नव्हते, की हरवलेला दाणा शोधण्यासाठी कुणाची याचना करावी लागत नव्हती. त्यानंतर चिमणा-चिमणी आपल्या पिल्लांसह आपल्या खोप्यात सुखानं राहायला लागली.