‘तुम्ही अभ्यास कधी करता?’ हा प्रश्न जर का तुम्हाला विचारला, तर यावरचं अनेकांचं उत्तर जवळजवळ सारखंच असेल. वाईट वाटून घेऊ नका, पण या प्रश्नाचं उत्तर अनेकदा क्रेझ म्हणून दिलं जातं. कोणीतरी सांगितलेलं असतं, कुणीतरी म्हणालेलं असतं म्हणून तुम्ही अमूक एक वेळ अभ्यासासाठी निवडता. पण एक गंमत सांगू का? प्रत्येकाची अभ्यासाची वेळ- म्हणजे अभ्यासाचा प्राइम टाइम वेगवेगळा असतो. आणि आपला प्राइम टाइम शोधणं ही आपलीच निकड असते. प्राइम टाइम म्हणजे काय? ज्यावेळी कोणतंही काम करायला आपल्याला उत्साह वाटतो, जेव्हा केलेल्या कामात मन एकाग्र होतं, ज्यावेळी लिहिलेलं, वाचलेलं अगर पाहिलेलं सुंदररीतीने लक्षात राहू शकतं. आता अशी वेळ शोधून काढण्यासाठी वेगवेगळ्या वेळी अभ्यास करून पाहायचीच गरज आहे असं नाही. तुम्ही सिनेमाच्या कोणत्या शोला उत्साहाने जाऊ इच्छिता? या प्रश्नाच्या उत्तरातही तुमचा प्राइम टाइम दडलेला आहे. फक्त तो तुमचा तुम्ही शोधला पाहिजे आणि न बिचकता मान्य केला पाहिजे!
मित्रांनो, सध्या कमी श्रमात जास्त पैसा मिळवण्याबद्दल तर सगळे बोलतच असतात. मग हाच फंडा अभ्यासासाठी वापरण्यात काय वावगं आहे! त्यासाठीच तर प्राइम टाइम शोधा आणि त्या वेळेत अभ्यास करून कमी श्रमात जास्त गोष्टी लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आता शाळेला कुठे सुरुवात झाली आहे. मग सुरुवातीलाच तुम्ही तुमचा प्राइम टाइम शोधायचा प्रयत्न करा आणि पुढच्या वर्षीचा अभ्यास सोप्पा करा. ऑल दि बेस्ट!
मेघना जोशी – joshimeghana.23@gmail.com