बालमैफलच्या माझ्या छोटय़ा वाचकांनो, काही पुस्तकांशी आपली दोस्ती आपल्याला काही, अगदी काही म्हणजे काही वाचता येत नसतानाच होते. एका पुस्तकाशी माझी दोस्ती केव्हा झाली ते मला आठवत नाही, मात्र ही दोस्ती आजही टिकून आहे. लवकरात लवकरचं आठवतं म्हणजे, ते पुस्तक कायम माझ्या बाबासोबत असायचं. बाबाला पक्षी पाहायची, निसर्गात रमायची आवड. हे पुस्तक त्यांचं होतं. फार मोठं नाही, माझ्या चिमुकल्या मांडीवर छान मावायचं.
माझं बालपण मुंबईमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सान्निध्यात गेलं. अगदी आमच्या घरासमोरच्या वडाच्या झाडावर, त्यापलीकडच्या काटेसावरीवर, उजव्या हाताला पसरलेल्या रेन ट्री आणि गुलमोहराच्या शेंडय़ांवर किंवा रस्त्याच्या मधोमध असलेल्या दिमाखदार कदम्बांच्या वृक्षांवर अनेक पक्षी दिसायचे. हिरवेगार पोपट, पांढरेशुभ्र बगळे, काळे कावळे, राखाडी चिमण्या, पिवळेधम्मक आम्रपक्षी, घुमल्यासारखा आवाज करणारे चिमुकले, रंगीबेरंगी तांबट, लांब शेपटीचे ऐटबाज कोतवाल.. हे सारे पक्षी अगदी घरबसल्या दिसत असले तरी माझ्या भिरभिरत्या डोळ्यांत ते मावत नसत.
आमच्याकडच्या दुर्बिणीतून हे पक्षी जवळ, अगदी हाताच्या अंतरावर असल्यासारखे दिसायचे खरे, पण त्या दुर्बिणीतून पाहण्याइतका धीर माझ्याजवळ नसायचा, आणि मी निरखेपर्यंत एका जागी स्वस्थ बसायचा वेळ त्या पक्ष्यांकडे नसायचा. अशा वेळी बाबा पुस्तकातून मला या पक्ष्यांची चित्र दाखवायचा. एकेका पानावर अनेक प्रकारचे पोपट, चिमण्या, कावळे, कोतवाल एका फटक्यात दिसायचे. कुणाच्या मानेवर रंगाची पट्टी, कुणाच्या पंखांवर रंगांची झळाळी, कुणाचे डोळे मण्यांसारखे तर कुणाची शेपटी ही लांबलचक. मला त्या चित्रांची मजा वाटायची. एक खेळ म्हणून हे पुस्तक पहायला मला आवडायचं!
पुढे मग बाबा या पुस्तकातून मला त्या त्या पक्ष्यांचं वर्णन वाचून दाखवायचा. इंग्रजीतून मराठीत भाषांतर करून समजावून सांगायचा. त्या गोष्टी तर मला फारच आवडायच्या. छोटय़ाच जागेत, अध्र्या-एक पानात सबंध पक्ष्याची गोष्टच असायची जणू.. पक्षी दिसतो कसा, त्याचं कुटुंब कसं, पिल्लं कशी, त्यांच्या घरटय़ांचे प्रकार, रचना, खाद्य, अगदी अंडय़ांच्या प्रकारांपासून त्यांच्या स्वभावापर्यंत सारीच माहिती असायची. एक छोटं उदाहरण देतो. बया वीणकर किंवा सुगरण पक्ष्यांच्या घरटय़ांविषयीची निरीक्षणं नोंदवताना त्यात अजब, मात्र तंतोतंत खरे बारकावे नोंदले आहेत. सगळ्यात गमतीचा प्रकार म्हणजे हे घरटं बाहेरून कसं दिसतं, त्याच्या रचनेमुळे सापांसारख्या शिकाऱ्यांपासून अंडी आणि पिलांचं कसं संरक्षण होतं हे सांगताना या पुस्तकात हे घरटं आतून कसं असतं हे सांगितलेलं आहे. मला त्यावेळी प्रश्न पडायचा की, हे लेखक आत कसे बरं गेले असतील? बाकी घरटी उघडी असतात. काही बिळांसारखी असतात. मात्र सापालाही शिरकाव करता येऊ नये अशा बांधलेल्या घरटय़ाचं इतकं बारकाईने वर्णन कसं काय केलं असेल हे कोडं मला खूप वर्ष सतावत होतं. कावळा कसा धूर्त आणि हुशार आहे, याचं या पुस्तकातलं वर्णन वाचून मला ठाम खात्री झाली होती की या पुस्तकाच्या लेखकाला पक्ष्यांच्या मनातलं कळत असावं, किमान त्यांची भाषा तरी अवगत असावीच!
मूळ इंग्रजीतून असलेलं हे पुस्तक मी आठवी-नववीपासून वाचायला लागलो. मात्र तोपर्यंत ते पुस्तक मला तोंडपाठ झालं होतं. कुठल्या पानावर कोणता पक्षी, कोणत्या पानावर कोणत्या प्रकारच्या पक्ष्यांची चित्र आहेत हे सारं माहीत झालं होतं. मी स्वत: स्वतंत्रपणे निसर्गसहलींना जायला लागलो तेव्हा बाबांनी मला या पुस्तकाची माझी प्रत घेऊन दिली. आता माझ्या पुस्तकाच्या प्रतीच्या समासांमध्ये माझी निरीक्षणं नोंदवलेली आहेत.
द बुक ऑफ इंडियन बर्डस् हे डॉ. सालिम अलींनी लिहिलेलं पुस्तक अशी मला माझ्या चिमुकल्या वयापासून साथसोबत करतं आहे. हे पुस्तक खास आहे. एक काटेकोरपणे लिहिलेलं वैज्ञानिक पुस्तक असलं तरी डॉ अलींची भाषा अतिशय रसाळ, रंजक, तरीही तोलूनमापून लिहिलेली आहे. या पुस्तकातलं कावळ्याचं वर्णन, सुगरण पक्ष्याच्या घरटय़ाचं निरीक्षण, बगळे आणि करकोच्यांच्या वसाहतीचं निरीक्षण हे अचूक आहेच, मात्र गोष्ट सांगितल्यासारखं रंजक लिहिलेलं आहे. निसर्गाविषयी लिखाणाचा वस्तुपाठ म्हणून या पुस्तकाचा, यातल्या लेखनाचा आवर्जून उल्लेख करतात.
या पुस्तकामुळेच मी निसर्गवाचनाकडे आकृष्ट झालो. निसर्गातल्या अवघड, अनघड बाबी या पुस्तकाने एका गोष्टींच्या खजिन्यासारख्या माझ्यासमोर उलगडल्या. एकीकडे या पुस्तकामुळे पक्ष्यांविषयीचं आकर्षण वाढीला लागलं, तर दुसरीकडे डॉ सालिम अलींविषयीचं कुतूहल गप्प बसू देईना. त्यांनी ज्या संस्थेत काम केलं तिथे सभासद झालो, शिकलो, काही र्वष तिथे कामही केलं. डॉ अलींची जवळून ओळख करून घेण्याकरता या अवलिया माणसाचं आत्मचरित्र वाचलं. त्या पुस्तकाविषयी पुढे केव्हातरी..
आत्ता तर थंडीचा मौसम आहे. स्थलांतरित पक्षी जंगलांतून, गावा-शहरानजीकच्या माळरानांतून, पाणथळींतून दिसताहेत. तेव्हा घरच्या मोठय़ांकडे हट्ट करून हे चिऊकाऊचं पुस्तक मिळवा आणि पक्ष्यांच्या रंगीबेरंगी दुनियेशी दोस्ती करा.
हे पुस्तक कुणासाठी? – निसर्गाविषयी कुतूहल असणाऱ्या मुलांसाठी!
‘द बुक ऑप इंडियन बर्डस्’
– डॉ. सलिम अली
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस
श्रीपाद – ideas@ascharya.co.in