मुंबई महानगरपालिका निवडणूक निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले असून शिवसेना ८४ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी भाजपच्या पदरात ८१ जागांचे अभूतपूर्व यश मिळाले आहे. भाजपला मिळालेल्या या यशाचे सेलिब्रेशन शहरात मोठ्या जल्लोषात सुरू आहे. मुंबईत मिळालेल्या यशाचे वर्णन करताना मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. मुंबईत भाजपच्या जागांमध्ये तब्बल दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असला तरी काहींची वाढ फूटपट्टीमध्ये, तर भाजपची वाढ पटींमध्ये झाली, अशा शेलक्या शब्दांत आशिष शेलार यांनी सेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

 

मुंबई महापालिका निवडणुकीत मागील वेळेस भाजपला ३२ जागांवर यश मिळाले होते. यात तब्बल पन्नास जागांची वाढ होऊन हा आकडा यावेळी ८१ वर पोहोचला आहे. तर शिवसेनेकडे मागील निवडणूकीत ७५ जागा होत्या. त्यात फक्त ९ जागांची वाढ होऊन सेनेला ८४ जागा मिळाल्या आहेत. शेलार म्हणाले की, शिवसेनेकडे ८४ जागा असल्या तरी भाजपची वाढ लक्षणीय आहे. भाजपची वाढ दुपटीहून अधिक झाली आहे. त्यामुळे इतर महानगरपालिकांसोबतच मुंबईत देखील भाजपने खरी बाजी मारली आहे. मी हा विजय मुंबईकरांना समर्पित करतो. जनतेने परिवर्तनावर विश्वास दाखवून भाजपला मतदान केले. शिवसेनेने काँग्रेसशी छुपी हातमिळवणी करूनही भाजपने अभूतपूर्व यश प्राप्त केले आहे.
भाजपकडे सध्या ८१ जागा असल्या तरी आमची अपक्ष उमेदवारांशी बोलणी झाली असून चार अपक्ष नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा आहे. त्यामुळे आमचा आकडा ८५ पर्यंत पोहोचून आम्ही मुंबईतही १ नंबरचा पक्ष आहोत, असा दावा शेलार यांनी केला.