मुंबईत शिवसेना क्रमांक एकचा पक्ष ठरला असून, सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर भाजपला यश मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच भाजपच्या विरोधात मतदान करणाऱ्यांना नोटाबंदीचा फटका बसला आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. त्यानंतर शिवसेना भवनमध्येही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई महापालिकेत मिळालेल्या यशाचे श्रेय त्यांनी मुंबईकर आणि शिवसैनिकांना दिले आहे.

मुंबई महापालिकेच्या निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. मुंबईत भाजपला मिळालेल्या यशाचा जल्लोष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार, किरीट सोमय्या यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला. निकालाचे चित्र स्पष्ट होताच भाजपने तातडीने पत्रकार परिषद घेऊन मुंबईसह राज्यातील जनतेचे आभार मानले. राज्यातील जनतेने भाजपच्या विकासकामांना तसेच पारदर्शकतेच्या अजेंड्याला कौल दिला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या नेत्यांनी दिली आहे. तर शिवसेना मुंबईत क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. उद्धव ठाकरे यांनीही मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सर्वप्रथम मुंबईकरांचे आभार मानले. शिवसेनेकडे इतर भाषिक मतदारही वळले आहेत, असे सांगून त्यांनी सर्वांचे आभार मानतो, असे सांगितले. केंद्र सरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका भाजपला बसला आहे. म्हणूनच मतदारांनी भाजपला नाकारले आहे, असेही ते म्हणाले. भाजपने सत्ता आणि संपत्तीचा जोर लावला होता. त्यामुळे त्यांना मिळालेले यश हे यश कसे मानता येईल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईत शिवसेनाच पहिल्या क्रमांकावर असून, महापौर आमचाच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले. नाशिकमध्येही मतदारयाद्यांमध्ये गोंधळ झाला आहे. त्याला कोण दोषी आहे, याची चौकशी झाली पाहिजे. तसेच निवडणूक आयोगाचाही काही दोष असला तरी कारवाई करायलाच हवी, अशी मागणी करून मतदारयाद्यांमधील घोळामागे षडयंत्र तर नाही ना, अशी शंकाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी शिवसेना भवनमध्येही पत्रकार परिषद घेतली. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या. सुरुवातीला त्यांनी शिवसैनिकांचे आभार मानले. विजय खेचून आणणाऱ्या शिवसैनिकांना मानाचा मुजरा कमी पडेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. सलग पाचव्यांदा मुंबईकरांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे मुंबईत शिवसेना क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. मुंबईकरांनी शिवसेनेलाच पसंती दिली आहे. आम्हाला पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे मुंबईकर आणि शिवसैनिकांना लाख लाख धन्यवाद देतो, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.