राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर, उल्हासनगर, सोलापूर, अकोला, अमरावती या दहा महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जवळपास जाहीर झाले आहेत. मुंबई आणि ठाणे महापालिका वगळता उर्वरित आठ महापालिकांमध्ये भाजपची लाट दिसून येत आहे. भाजपने या आठ महापालिकांमध्ये जोरदार मुसंड़ी मारली आहे. तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून पडद्याआड गेलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पिछेहाट झाली आहे, असे मानले जात आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकांकडे ‘मिनी विधानसभा’ म्हणून पाहिले जाते. त्यामुळे निवडणुका जाहीर होताच भाजपने शतप्रतिशत विजयाचा नारा दिला होता. अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. तर शिवसेनेने वर्चस्वासाठी सर्वस्व पणाला लावले होते. मुंबईत भाजप आणि शिवसेनेनेही स्पष्ट बहुमताचा विश्वास व्यक्त केला होता. तर शिवसेनेनेही विजयाची ‘डरकाळी’ फोडली होती. त्यानुसार मुंबईत शिवसेना क्रमांक एकचा पक्ष ठरला असला तरी, भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. मागील निवडणुकीत भाजपचे केवळ ३१ उमेदवार होते. यावेळी मात्र, भाजपने तब्बल ८१ जागांवर विजय संपादन केला आहे. हे भाजपसाठी मोठे यश मानले जात आहे. तर शिवसेनेच्या जागा काही प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे येथे सत्तास्थापनासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळणार आहे. दोन्हीही पक्षांनी अपक्ष आणि इतर पक्षांच्या उमेदवारांशी बोलणी सुरू केली आहे.

पुण्यात भाजपने धक्कादायक मुसंडी मारली आहे. भाजपच्या लाटेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरता पिछाडीवर गेला आहे. मागील निवडणुकीत अवघे २६ जागा जिंकलेल्या भाजपने स्पष्ट बहुमत मिळवून आपणच पुण्यातील ‘दादा’ असल्याचे सिद्ध केले आहे. भाजपने तब्बल ७७ जागांवर विजयी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेवर कमळ फुलले असून राष्ट्रवादीच्या घड्याळाची ‘टिकटिक’ बंद झाली आहे. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेतही भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला दणका दिला आहे. गेल्या निवडणुकीत अवघ्या तीन जागा जिंकलेल्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत ४९ जागांवर आघाडी मिळवली आहे.

 

नाशिक महापालिकेत राज ठाकरे यांच्या मनसेकडून भाजपने सत्ता हिसकावून आणली आहे. गेल्या निवडणुकीत मनसेचे ४० तर भाजपचे अवघे १४ नगरसेवक निवडून आले होते. पण यंदाच्या निवडणुकीत भाजपने ५० हून अधिक जागांवर विजयी आघाडी मिळवली आहे. मनसेचे इंजिन घसरले असून, भाजपची एक्स्प्रेस सुसाट धावल्याचे चित्र आहे. मनसेला केवळ तीनच जागांवर विजयी आघाडी मिळाली आहे. ओमी कलानी गटाशी भाजपने जुळवून घेतल्याने चर्चेत आलेल्या उल्हासनगरमध्ये भाजपला चांगले यश मिळाले आहे. भाजप-कलानी गटाच्या आघाडीला तब्बल ३३ जागांवर विजयी आघाडी मिळाली आहे. मात्र या ठिकाणी त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर महापालिकेतही भाजपने काँग्रेसचा पराभव केला आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि पालकमंत्री सुभाष देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण या निवडणुकीत भाजपने ४७ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर काँग्रेसचे केवळ १४ उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे येथील सत्ता काँग्रेसच्या हातून निसटल्याचे दिसते आहे. विदर्भातही भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. नागपूर महापालिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. नागपुरकरांनीही भाजपवर पुन्हा विश्वास दाखवला आहे. त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. गेल्या निवडणुकीत ६२ जागांवर विजय मिळवलेल्या भाजपने यंदा ८२ जागांवर विजयी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे या ठिकाणीही भाजपने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. अमरावती महापालिकेवरही भाजपची बहुमताकडे वाटचाल सुरु आहे. भाजपने ४० जागांवर विजयी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे येथेही सत्तास्थापनेच्या दिशेने पाऊल टाकले आहे. एकंदरीतच भाजपने राज्यात जोरदार मुसंडी मारली असून ही ‘देवेंद्र’ लाट असल्याचे स्पष्ट झाले आहे.