उद्धव ठाकरे यांचा विश्वास

मुंबईत महापौर शिवसेनेचाच होणार, असा ठाम विश्वास व्यक्त करीत पक्षावरच्या निष्ठा ढळू देऊ नका, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना केले.

शिवसेनेच्या महापालिकेतील विजयी उमेदवारांचा मेळावा शिवसेना भवनमध्ये शनिवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी नवीन नगरसेवकांना मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी महापौरपद शिवसेनेकडेच राहील व ते कोणालाही हिसकावून घेता येणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. कोणत्याही आमिषांना बळी पडू नका आणि विश्वास व ध्येयनिष्ठा ढळू देऊ नका, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. त्याच जोरावर शिवसेनेने या निवडणुकीत विजय मिळविला, असे ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

युतीसाठी प्रयत्न -आठवले

मुंबईकरांनी शिवसेना व भाजपा दिलेला कौल लक्षात घेता दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याची गरज असून त्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. शिवसेनेने प्रस्ताव दिल्यास नक्की विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असून आपण लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.