मतदान केंद्रांवर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, खाण्याची पाकिटे, कागदाचा कचरा; शिपायांच्या निवडणूक व्यग्रतेमुळे विद्यार्थ्यांच्या हाती झाडू

लोकशाहीचा सोहळा मंगळवारी साजरा झाल्यानंतर अनेक मतदान केंद्रांवर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, खाण्याची पाकिटे, कागद आदी कचरा दुसऱ्या दिवशीही तसाच पडून होता. या सर्वाधिक मनस्ताप मतदान केंद्र असलेल्या शाळा-महाविद्यालयांना बुधवारी सहन करावा लागला. सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळेचे अस्ताव्यस्त रूप दिसले. काही ठिकाणी तर शाळेचे शिपाई मध्यरात्रीपर्यंत निवडणुकीच्या कामात होते. अशा ठिकाणी विद्यार्थी-शिक्षकांनाच हातात केरसुणी घेऊन ‘स्वच्छता अभियान’ राबवावे लागले.

मुंबईत अनेक ठिकाणी शाळा-महाविद्यालयांमध्येही मतदानाची सोय करण्यात आली होती. मतदानाच्या दिवशी शाळेला सुट्टी होती. मात्र बुधवारी विद्यार्थी-शिक्षक शाळेत आले तेव्हा शाळेत ठिकठिकाणी पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, कागद, खाण्याचे रिकामे डबे असा कचरा अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला. काही ठिकाणी तर मतदानाकरिता आदल्या दिवशीच्या रात्री शाळेतच थांबलेल्या पोलीस, निवडणूक अधिकारी यांच्यासाठी आणलेल्या गाद्या-गिरद्याही तशाच पडून होत्या. वर्गातील बसण्याचे बाक, खुच्र्या, टेबल मतदानाच्या सोयीकरिता इतरत्र हलविण्यात आली होती. त्यामुळे, कचरा साफ करण्याबरोबरच वर्गातील बाक, खुच्र्या आदी सामान लावण्याचे कामही शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या मदतीने करावी लागली. शाळेच्या भिंतींही विविध सूचना देणाऱ्या कागदी फलकांनी विद्रूप झाल्या होत्या. हे फलक काढण्यापासून बाक लावणे, गाद्यागिरद्या हलविणे, कचरा साफ करणे अशी कामे शाळेला करावी लागली. ही कामे झाल्यानंतरच मग आम्हाला अध्ययन-अध्यापनाला सुरूवात करावी लागली, असे मालाडच्या शाळेतील शिक्षक राजेश पंडय़ा यांनी सांगितले.विक्रोळीच्या एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेच्या शिपायांनी हा कचरा साफ केल्याचे सांगितले. मात्र, मालाडच्या फातिमादेवी शाळेतील शिपाईही रात्रभर निवडणुकीच्या कामात व्यग्र राहिल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत येऊ शकले नाही. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या मदतीने कचरा उचलावा लागला. आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहेत. परंतु, ही कामे केल्यानंतरच या परीक्षा सुरू करता आल्या असे पंडय़ा यांनी सांगितले.

कंत्राटदारांचे काम

मतदान केंद्रांवर विविध सुविधा पुरविण्याचे काम कंत्राटदारांना देण्यात येते. परंतु, अनेक कंत्राटदारांनी त्यांचे सामानही केंद्रांवरून नेले नव्हते. याचा सर्वाधिक त्रास सकाळी भरलेल्या शाळांना झाला. केंद्रावर होणारा कचरा साफ करण्याकरिताही  कंत्राटदाराची नेमणूक करायला हवी. पण ती होत नाही. दुसऱ्या दिवशी शाळांनाच हा कचरा साफ करावा लागतो. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे हे मान्य आहे. परंतु, विद्येच्या मंदिराचा मानही निवडणूक अधिकाऱ्यांनी राखायला हवा, अशी प्रतिक्रिया राजेश पंडय़ा यांनी व्यक्त केली.