वांद्रे प्रभाग क्रमांक ८९ साठी अन्य पक्षांतील स्वच्छ प्रतिमेच्या उच्चशिक्षित व्यक्तीचा शोध

मुंबई महापालिका निवडणुकीतील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नसली तरी शिवसेनेने अनेकांना आपापल्या प्रभागांमध्ये कामाला लागण्याचे संकेत दिले आहेत. पण शिवसेनेला ‘मातोश्री’च्या अंगणात अद्याप उमेदवार मिळू शकलेला नाही. उच्चशिक्षित, पालिकेच्या कारभाराचे ज्ञान असलेला, स्वच्छ प्रतिमा असलेला, स्वबळावर निवडून येण्याची क्षमता असलेला आणि महत्त्वाचे म्हणजे ‘मातोश्री’च्या आदेशांचे प्रामाणिकपणे नित्यनियमाने पालन करणाऱ्या उमेदवाराचा शोध शिवसेनेने सुरू केला आहे. अन्य पक्षांतील काही चेहरे हेरून ते शिवसेनेत येतात का याची चाचपणी नेते मंडळींनी सुरू केली आहे.

शिवसैनिकांचे श्रद्धास्थान आणि राजकारणातील अनेक घटनांचे साक्षीदार असलेले वांद्रे पूर्व येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निवासस्थान ‘मातोश्री’ पालिकेच्या प्रभाग क्रमांक ८९ मध्ये आहे. पालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेने ‘मातोश्री’च्या अंगणात (प्रभाग क्रमांक ८९) निवृत्त प्राध्यापक अनिक त्रिंबककर यांनी रिंगणात उतरविले होते. महाविद्यालयातून निवृत्त झालेले प्राध्यापक अनिल त्रिंबककर यांची प्रतिमा लोकाभिमुख ठरल्यामुळे निवडणुकीत भरघोस मतांनी ते विजयी झाले होते. वांद्रे पूर्व परिसरात अनिल त्रिंबककर यांना मानणारा मोठा विद्यार्थी वर्ग असल्याने त्यांचा विजय सुकर झाला होता.

प्रभाग फेररचनेत प्रभाग क्रमांक ८९चे विभाजन झाले असून या प्रभागाचा निम्मा निम्मा भाग प्रभाग क्रमांक ९२ व ९३ मध्ये समाविष्ट झाला आहे. ‘मातोश्री’ प्रभाग क्रमांक ९३ मध्ये असून या प्रभागावर अनुसूचित जाती (महिला) असे आरक्षण आले आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर पेच निर्माण झाला आहे. प्रभाग क्रमांक ९३ मधून निवडणूक लढविण्यासाठी तीन-चार जण इच्छुक आहेत. परंतु ‘मातोश्री’च्या निकषांना पात्र ठरत नसल्यामुळे या नावांचा विचार मागे पडला आहे. काही दिवसांपूर्वी महापौर स्नेहल आंबेकर यांचे नाव काही शिवसेना नेत्यांनी सुचविले होते. मात्र महापौरपदाच्या कारकीर्दीत केलेल्या अनेक चुका लक्षात घेत प्रभाग क्रमांक ९३ मधून उमेदवारी देण्याबाबत त्यांच्या नावावर फुल्ली मारण्यात आल्याचे समजते.

‘मातोश्री’च्या अंगणातून निवडणूक लढविण्यासाठी अनुसूचित जातीमधील उच्चशिक्षित महिलेचा शोध शिवसेनेकडून सुरू झाला आहे. मात्र शिवसेनेत तसा एकही चेहरा सापडू शकलेला नाही. त्यामुळे मागील निवडणुकीत आसपासच्या अथवा अनुसूचित जातींचे आरक्षण असलेल्या प्रभागांतून विजयी झालेल्या नगरसेवकांच्या नावाची चाचपणी सुरू झाली आहे. इतर पक्षांमधील काही चेहरे शिवसेनेने हेरले असून ते शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत का याची चाचपणी सुरू झाली आहे. त्याचबरोबर अन्य पक्षातून आयात केलेल्या उमेदवारामुळे शिवसेनेत किती नाराजी निर्माण होऊ शकेल याचाही अंदाज शिवसेनेचे नेते घेत आहेत.