लोकसभा, विधानसभा, नगरपालिका निवडणुकांपाठोपाठ जिल्हा परिषदांमध्येही राष्ट्रवादीच्या पराभवाची मालिका कायम राहिली आहे. शहरी भागात चांगलीच पीछेहाट झाली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांमधील सत्ता गमवावी लागली. पिंपरी-चिंचवडची निवडणूक अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली होती. पण पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने एकहाती यश मिळवीत राष्ट्रवादीला धक्का दिला. मुंबईतही पक्षाची ताकद वाढू शकली नाही. ठाणे शहरात जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे पक्षाला दुसरे स्थान कायम राखता आले. शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात पक्ष तगला आहे. विदर्भात शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये पार धुव्वा उडाला.  राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातही अपेक्षित यश मिळू शकलेले नाही. सहकार क्षेत्र हे राष्ट्रवादीचे बलस्थान. पण सहकार क्षेत्रातही भाजपने हातपाय पसरले आहेत. नगरपालिकेप्रमाणेच मराठवाडय़ात या तुलनेत बऱ्यापैकी चांगल्या जागा मिळाल्या. पुणे जिल्ह्य़ात एकहाती सत्ता मिळाल्याने पक्षाचे बलस्थान कायम राहिले. नाशिक या एकेकाळी चांगली ताकद असलेल्या जिल्ह्य़ात राष्ट्रवादीचे अस्तित्वच धोक्यात आले. कोकणात रायगडमध्ये शेकापच्या सहाय्याने सत्ता मिळणार असली तरी गतवेळच्या तुलनेत जागा कमी झाल्या आहेत. कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती तर कधी काँग्रेसबरोबर आघाडी असा संभ्रम राष्ट्रवादीबाबत निर्माण झाल्याने पक्षाच्या विश्वासर्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतो. याचाही काही प्रमाणात पक्षाला फटका बसला आहे.

भाजप आणि शिवसेनेच्या वादात विरोधकांची जागा भरून काढण्यात काँग्रेस किंवा राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना यश मिळालेले नाही. सत्तेत भागीदार असूनही शिवसेना विरोधकांची भूमिका बजाविते. या तुलनेत काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला हे जमलेले नाही. भ्रष्टाचार, घोटाळे यातून राष्ट्रवादीचा प्रतिमेला धक्का बसला होता. ही प्रतिमा सुधारण्यात अजूनही राष्ट्रवादीला यश आलेले नाही. ही प्रतिमा पुसण्यासाठीच सध्या तुरुंगात असलेल्या छगन भुजबळ यांचा नामोल्लेख होणार नाही याची खबरदारी राष्ट्रवादीने घेतली होती. पण पक्षाची प्रतिमा सुधारण्यास त्याचा फार फायदा झालेला दिसत नाही. मधल्या काळात मराठा समाजाचे मोर्चे आणि आंदोलन झाले. त्याच्या मागे राष्ट्रवादी असल्याचे चित्र निर्माण झाल्याने इतर वर्ग पक्षापासून दूर गेले. मुंबई, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर या भागांमध्ये राष्ट्रवादीला त्याचा फटका बसल्याचे पक्षाच्या स्थानिक नेत्यांचे निरीक्षण आहे.

राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळालेले नाही हे पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मान्य केले. राष्ट्रवादीचे स्थानिक पातळीवरील काही नेते पक्षाला रामराम करून भाजपात दाखल झाले.

भाजपच्या विजयात त्यांचाही हातभार लागला आहे. १५ वर्षे सत्तेत राहिल्यावर दोन वर्षांपूर्वीच आमचा पराभव झाला. लगेचच परिस्थिती बदलेल असे नाही. अजून काही काळ जावा लागेल, असे सूचक वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले आहे. एकूणच राष्ट्रवादीसाठी भविष्यकाळ सोपा नाही.