मतदान चालू असताना केंद्रावर येऊन आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपावरून भाजपचे जिल्ह्य़ातील नेते आणि पाणीपुरवठा तथा स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्याविरुद्ध मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पाटोदा गावातील मतदान केंद्राध्यक्षांनी या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली होती.

जिल्हा परिषदेच्या पाटोदा गटात भाजपच्या रोहिणी पंजाब बोराडे आणि राष्ट्रवादीच्या कौसाबाई बोराडे यांच्यात लढत आहे. आचारसंहिता भंग प्रकरणी पंजाब बोराडे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस पंकज बोराडे यांनी परस्परांच्या विरोधात तक्रारी दिलेल्या आहेत. मतदान चालू असताना मंत्री लोणीकर लाल दिवा झाकलेला नसलेल्या गाडीतून सायरन वाजवीत आले आणि त्यांनी भाजप उमेदवाराच्या पतीसह मतदान केंद्रात प्रवेश केल्याची तक्रार राष्ट्रवादीचे पंकज बोराडे यांनी केली आहे.

भाजपचे पंजाब बोराडे यांनी आपल्याविरुद्ध मतदान केंद्र ताब्यात घेतल्याची तक्रार निखालस खोटी असल्याचे पंकज बोराडे यांनी सांगितले. लोणीकर यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी त्यांनी मंठा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनही केले.