यवतमाळ जिल्हा परिषद निवडणुकीत आजवर भाजप किंवा सेनेने सत्ताप्राप्तीचे स्वप्नही पाहिलेले नव्हते. हा तो आपला प्रांत नव्हे, याच भावनेने केवळ औपचारिकता म्हणून लढत असलेल्या सेना-भाजप दोन्ही पक्षांना नगरपलिका निवडणुकीतील यशाने हत्तीचे बळ प्राप्त झाले आहे. त्यामुळे सध्या सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीसमोर सत्ता टिकवण्याचे प्रचंड आव्हान उभे झाले आहे.  दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्रीपद काढून घेतल्याने राज्यमंत्री संजय राठोड संतापले असून, भाजपवर वचपा काढण्याचा निर्धारच त्यांनी व्यक्त केला आहे.

शांताबाई ताजने या शेतकरी विधवेने कर्जापायी विहिरीत उडी घेऊन केलेल्या आत्महत्येला इष्टापत्ती मानत काँग्रेसने आंदोलन केले होते. तत्कालीन पालकमंत्री संजय राठोड यांच्या निवासस्थानासमोर इच्छामरण आंदोलन करून सत्तारूढ युतीला आव्हान दिले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सरकारी मदतीपासून वंचित झालेल्या ११६८ गावांतील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या देवानंद पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून न्याय मिळवला होता. त्यानंतर नोटाबंदीच्या विरोधात जनाक्रोश व घंटानाद आंदोलन केले. या सर्व आंदोलनाचा जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ता कायम ठेवण्यासाठी कितपत उपयोग होतो, हे नजीकचा काळच ठरवणार आहे. कारण, नोटाबंदीचे जनतेने समर्थन केल्याचा दावा भाजप नेते करीत असून नगर पालिकेतील यश ही त्याची पावती आहे, असेही ते सांगतात. मात्र, शहरी भाग असलेल्या नगर पालिकेत आणि ग्रामीण भाग असलेल्या जिल्हा परिषदेतील मतदारांच्या मानसिकतेत कमालीचे अंतर आहे. त्याला कसे तोंड द्यावे, हे एक आव्हान भाजपसमोर आहे.

युतीत बिघाडी

राज्यात सेना-भाजप युती असली तरी जिल्हा परिषदेत ही युती राहणार नाही. उलट, भाजपला या निवडणुकीत आडवे करण्याचे आवाहन सेना नेते महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. कारण, पालकमंत्रीपद काढून घेतल्याचा बदला त्यांना जि.प. निवडणुकीत घ्यायचा आहे. राठोड यांचे पालकमंत्रीपद काढून घेण्यात आल्याचा संताप शिवसेनेने आधीच व्यक्त केला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी हा विषय उपस्थित केला होता. त्यावरून शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बाहेरही पडले होते. यवतमाळचे पालकमंत्रीपद काढून घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय शिवसेनेला फारच जिव्हारी लागला आहे. शिवसेना संधीच्या शोधात असून, भाजपला इंगा दाखविण्याची शिवसेनेची योजना आहे.

राष्ट्रवादीपुढे चिंता

जि.प.च्या ६२ सदस्यांपकी सेनेचे १४ सदस्य होते. त्यातील दोघे बंडखोर निघाले. आता १२ वरून किमान ४२ पर्यंत पोहोचण्याचे सेनेसमोर, तर भाजपला ४ वरून ४४ पर्यंत पोहोचण्याचे आव्हान आहे. विधान परिषद सदस्य उस्मानाबादचे तानाजी सावंत हे आपला लक्ष्मीदर्शनाचा किती वाटा उचलतात, हाही सेनेसाठी महत्त्वाचा विषय आहे. पालकमंत्री भाजप नेते मदन येरावार यांनी दिवसरात्र एक करून सत्ता मिळवाच, असे आवाहन केले आहे. राष्ट्रवादीची धुरा कालपर्यंत आमदार राहिलेल्या संदीप बाजोरियांकडे होती. आता ती मनोहर नाईक आणि ख्वाजा बेग या दोन आमदारांकडे आलेली असताना भाजपमध्ये धाव घेणारे अनेक नेते कसे आवरावे, हेही आव्हान दोन्ही आमदार कसे पेलतात, यावर राष्ट्रवादीची मदार आहे. काँग्रेसमध्येसुद्धा गटबाजी असून ती चव्हाटय़ावर आली आहे. शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे, प्रा. वसंत पुरके, संजय देशमुख, वामनराव कासावार आदी ज्येष्ठ नेते परस्परांना पाण्यात पाहण्याचा उद्योग करीत आहेत. पक्षश्रेष्ठींसाठी या डोकेदुखीवर अद्याप रामबाण उपाय सापडलेला नाही.

आज स्वतंत्र; पण उद्या युती-आघाडी

जिल्हा परिषदेत गेल्या वेळी सेना-भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली होती. काँग्रेसची संख्या एकने जास्त असूनही पहिल्यावेळी  राष्ट्रवादीच्या प्रवीण देशमुखांना आणि दुसऱ्या वेळी राष्ट्रवादीच्याच डॉ. आरती फुफाटे यांना अध्यक्षपद देण्यात आल्याने यावेळी आघाडीत अध्यक्षपदासाठी काँग्रेसचा दावा राहणार आहे. सध्या भाजप-सेना परस्पर विरोधात लढत असले तरी स्पष्ट बहुमताची आशा या युतीलाही नसल्याने सत्तेसाठी बहुमताचे गणित जुळवायची दोघांची तयारी राहील. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महत्त्वाची भूमिका पार पाडतील.

आघाडीचे प्रयत्न

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता संदीप बाजोरियांनी व्यक्त केली आहे. मात्र, उमेदवारांच्या मुलाखती दोन्ही पक्षांनी स्वतंत्ररीत्या घेतल्या आहेत. जिल्ह्य़ात फक्त उमरखेडमध्ये एम.आय.एम.ने मुसंडी मारली असली तरी जिल्हा परिषदेत या पक्षाचे आव्हान नसल्याचेच अन्य पक्षांना वाटत आहे. नोटाबंदी, शेतमालाला नसलेला भाव, बेरोजगारी, आíथक मदतीपासून वंचित शेतकरी, कमी होत नसलेल्या शेतकरी आत्महत्या हे मुद्दे गाजणार आहेत, तर भाजपचा विकास आराखडय़ावर भर आहे. सेनेत महसूल राज्यमंत्री संजय राठोड, भाजपात पालकमंत्री मदन येरावार, काँग्रेसमध्ये माणिकराव ठाकरे, प्रा. वसंत पुरके, शिवाजीराव मोघे या माजी मंत्र्यांची आणि राष्ट्रवादीत मनोहर नाईक आणि ख्वाजा बेग या दोन आमदारांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. काँग्रेस नेते माजी मंत्री संजय देशमुख तळ्यात-मळ्यात असून कोणाची वाट लावतात, हेही पाहण्यासारखे आहे. कारण, त्यांची वाटचाल भाजपच्या दिशेने आहे. बसप आणि अपक्षांना फार अपेक्षा नाहीत.

untitled-8