‘डिड यू नो?’मुळे आश्चर्य

एकेकाळी ‘मराठी’चा आग्रह धरत प्रखर आंदोलन करणाऱ्या आणि दुकानांवरील इंग्रजी भाषेतील पाटय़ांना काळे फासणाऱ्या शिवसेनेने पालिकेच्या आगामी निवडणुकीतील प्रचारासाठी ‘डिड यू नो?’ विचारत इंग्रजीची कास धरली आहे. शिवसेना ही मराठीच्या अस्मितेसाठी लढणारी संघटना म्हणून स्थापित झाली होती. परंतु निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेल्या शिवसेनेच्या या फलकबाजीमुळे शिवसेनेची ही मूळ ओळख माहीत आहे ना, असे विचारण्याची वेळ मराठी भाषक मुंबईकरांवर आली आहे. मराठी अस्मिता जपण्यासाठी, तसेच मराठी भाषकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेने अनेक आंदोलने केली. मराठी भाषक तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी स्थानीय लोकाधिकार महासंघातर्फे जोरदार मोहीम राबविण्यात आली. एकेकाळी स्थानीय लोकाधिकार महासंघाच्या माध्यमातून शिवसेनेच्या शाखांमध्ये नियमितपणे येणाऱ्या शिवसैनिकांना सरकारी, निमसरकारी, तसेच खासगी क्षेत्रातील पंचतारांकित हॉटेल्स, बडय़ा कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवून दिल्या होत्या. शिवसेनेच्या आंदोलनामुळे नोकरीला लागलेले अनेक जण आता निवृत्तीकडे झुकले आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये शिवसेनेचा स्थानीय लोकाधिकार महासंघ थंडावला आहे. मराठी तरुणांना रोजगार देण्याची मोहीमही मंदावली आहे.

मुंबईमध्ये दुकानांवरील पाटय़ा मराठी भाषेत असाव्यात असा आग्रह शिवसेनेने धरला होता. दुकानांवरील अन्य भाषेतील पाटय़ांना शिवसैनिकांनी काळे फासून आंदोलनही केले होते. शिवसेनेच्या या आंदोलनाला घाबरून अनेकांनी रातोरात दुकानांवरील पाटय़ा मराठी भाषेत रंगवून घेतल्या होत्या.

मुंबई महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेने पालिकेतील कारभार १०० टक्के मराठी असावा असा आग्रह धरला होता. सत्ताधाऱ्यांची ही मागणी शिरसावंद्य मानत प्रशासनाने पालिकेचा कारभार १०० टक्के मराठीमध्ये सुरू केला होता. अमराठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना मराठी भाषेचे धडे घ्यायला लावले होते तेही शिवसेनेच्या धाकामुळेच.सातत्याने मराठी भाषेसाठी झटणाऱ्या शिवसेनेने पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या प्रचारात मात्र मराठीची कास सोडल्याची चर्चा मुंबईकरांमध्ये सुरू झाली आहे.