मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शिवसेनेसाठी फारच महत्त्वाची आहे. गेली २० वर्षे कायम सत्तेत असलेल्या शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत सत्ता कायम राखायची आहे. यंदा सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसणाऱ्या भाजपचे कडवे आव्हान आहे. २०१४च्या मोदी लाटेत भाजपने शिवसेनेलाही नमविले होते. परिणामी भाजपच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर भाजपचा आत्मविश्वास बळावला आहे. म्हणूनच शिवसेनेनाही सावध झाली आहे. मुंबईकरांना खुश करण्याकरिता शिवसेनेने सवलतींच्या खैरांतींचे आश्वासन देण्यास सुरुवात केली. ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्ताधारकांना मालमत्ता करात सवलत देण्याचे आश्वासन देण्यात आले. याशिवाय नागरी सुविधांची विविध आश्वासने देण्यात आली आहेत. ‘जे बोलतो, ते करून दाखवतो’ हे घोषवाक्य घेऊन शिवसेनेने वचनमाना जाहीर केला. आधीच्या निवडणुकीत करून दाखविले हे घोषवाक्य होते. गेल्या पाच वर्षांत काय काय झाले हे वेगळे सांगण्याची गरज नाही. नालेसफाई, रस्तेघोटाळा उघडकीस आले. महापालिकेचे अभियंते आणि ठेकेदारांना तुरुंगवास सहन करावा लागला. महापालिकेच्या वतीने गटारे, पायवाटा ही कामे प्रामुख्याने झाली. शहरातील रस्ते किंवा अन्य पायाभूत सुविधांची कामे ही मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या माध्यमातून झाली. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सागरी रस्ता बांधण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले, पण अद्यापही त्याला मुहुर्त काही मिळालेला नाही. मित्र पक्ष भाजपनेच शिवसेनेला संशयाच्या भोवऱ्यात उभे केले. महापालिकेतील घोटाळ्याशी शिवसेनेचे नाव जोडले गेले. यामुळे शिवसेनेला मधल्या काळात सारवासारव करण्याची वेळ आली. शिवसेनेच्या वतीने कितीही आश्वासन देण्यात येत असली तरी गेल्या पाच वर्षांचा अनुभव तेवढा काही चांगला नाही. शिवसेनेच्या कारभाराचा उल्लेख भाजपचे खासदार किरीट सोमय्या हे तर माफियाराज असाच करतात. कितीही बोलले तरी तसे कृतीत येत नाही हे राजकीय पक्षांबाबत नेहमीच अनुभवास येते. शिवसेनेही त्याला अपवाद नाही. ‘सुंदर मुंबई, मराठी मुंबई’ पासून सुरू झालेल्या शिवसेनेच्या घोषणांमध्ये आणखी एक भर एवढेच.