ज्यांना माझ्या नेतृत्त्वावर विश्वास नसेल, त्यांनी बेधडक दुसरी वाट पकडावी. मी निष्ठावंतांना घेऊन पुढे जाईन, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते सोमवारी माटुंग्याच्या षणमुखानंद सभागृहात पार पडलेल्या ‘शिवसेना ५० वर्षाची घौडदौड’ या ऑडिओ बुकच्या अनावरण सोहळ्यात होते. यावेळी उद्धव यांनी मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना आणि भाजप यांच्यातील युतीसंदर्भात येत्या २६ तारखेला भूमिका स्पष्ट करणार असल्याचे संकेत दिले. आपण सध्या कुंपणावर आहोत. त्यामुळे जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत शांत राहिलेलं बरं, असे सांगत उद्धव यांनी शिवसैनिकांना तुर्तास संयम बाळगण्याचा सल्ला दिला. सध्या आपण इतरजण आपल्यासोबत वागताना काय काय नाटकं करत आहेत, हे बघून घेऊ. आपण एका निर्णायक टप्प्यावर उभे आहोत. या टप्प्यावर मराठी माणसाने एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. एकजुटीने लढलो नाही तर आपले तुकडे केले जातील.  आता पुढे कसे जायचे, हा प्रश्न निश्चितच आहे. मात्र, तुम्ही माझ्यासोबत असाल तर मला कोणताही चिंता नाही, असे उद्धव यांनी सांगितले.

यावेळी उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. शिवसेनेकडून प्रकाशित करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात मुंबईकरांसाठी अनेक चांगल्या योजनांचा समावेश आहे. मात्र, काहीजण या योजना पूर्ण करण्यासाठी पालिकेकडे पैसे आहेत का, असा खोचक प्रश्न विचारत आहेत. मात्र, या योजना राबविण्यासाठी पंतप्रधानांच्या जाहिरातींपेक्षा निश्चितच कमी खर्च येईल, असे सांगत उद्धव यांनी भाजपला टोला लगावला. याशिवाय, सध्याचे वातावरण जादू केल्याप्रमाणे आहे. तुमच्यासमोर कोणीतरी जादूगार येतो, तो जादू करतो, त्यामुळे आपल्याला खरं काय आणि आभासी काय हे समजू शकत नाही, असे सांगत उद्धव यांनी मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. राजकारणावर येत्या २६ तारखेला शिवसैनिकांच्या मेळाव्यात माझी भूमिका स्पष्ट करेन. तोपर्यंत शांत राहिलेलं बरं. निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे ज्यांना माझ्यावर विश्वास नाही त्यांनी आताच पक्ष सोडून जावे. माझा निष्ठावंत शिवसैनिकांवर विश्वास आहे, असे उद्धव यांनी म्हटले.