पालिका निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी उतावीळ झालेल्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांबद्दल शिवसेनेच्या ज्येष्ठ पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर ‘मातोश्री’ने आपले वजन ज्येष्ठांच्या पारडय़ात टाकले आहे. निवडणुकीच्या तोंडावर युवासेनेमुळे पक्षातील बंडखोरीला उधाण येऊ नये, याची खबरदारी घेत शिवसेना पक्षप्रमुखांनी युवासेनेच्या कार्यकर्त्यांना दोन पावले मागे जाण्यास भाग पाडले आहे. यामुळे शिवसेनेच्या गोटात समाधान व्यक्त होत असले तरी, सेनेच्या ‘युवराजां’च्या कंपूत मात्र नाराजीचा सूर उमटत आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजण्यापूर्वीच युवासेनेतील अनेक कार्यकर्ते उमेदवारी मिळविण्यासाठी हालचाल करू लागले होते. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या कायम संपर्कात असलेल्या काही युवासैनिकांचा त्यात समावेश होता. आपल्याला हमखास उमेदवारी मिळणार अशा समजुतीने ही मंडळी निवडणुकीच्या कामाला लागली होती. प्रभादेवी, शिवडी, परळ, चुनाभट्टी, वडाळा, कांदिवली, गोरेगाव, मुलुंड आदी परिसारातील युवासैनिकांनी प्रभागातील आरक्षण आणि बदललेल्या सीमांचा अभ्यासही केला होता. तसेच प्रभागातील मतदार, बडय़ा व्यक्तींशी संपर्क साधण्याचा युवासैनिकांनी सपाटा लावला होता. त्यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक असलेले तेथील शिवसैनिक बिथरले होते. परिणामी, शिवसैनिक आणि युवासैनिकांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली होती. ‘लोकसत्ता, मुंबई’च्या ११ जानेवारीच्या अंकात याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर शिवसेनेत गोंधळ उडाला होता.

शिवसेनेतील नेते, उपनेते, विभागप्रमुख, आमदार, नगरसेवक आदींनी आपल्या मुलांना युवासेनेतील पदे मिळवून दिली आहेत. आपल्याला वरचे पद मिळाल्यानंतर युवासेनेत सक्रिय असलेल्या मुलाला पालिका निवडणुकीची उमेदवारी मिळावी यासाठी या नेत्यांनी आपली शक्ती पणाला लावली होती. गेली अनेक वर्षे शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावरून मिरवत, शाखेमध्ये पडेल ते काम करणारे शिवसैनिक या प्रकारामुळे प्रचंड खवळले होते. आम्ही कायम हरकाम्या बनून कायम नेते मंडळींच्या पाठीमागून खांद्यावरून झेंडे वाहात फिरायचे का, अशी प्रतिक्रिया तळागाळातील शिवसैनिक व्यक्त करू लागले होते. शिवसैनिकांच्या या भावना ‘मातोश्री’वर पोहोचल्यामुळे काही निवडक नेत्यांसोबत चिंतन करण्यात आले.  भाजपबरोबर दोन हात करताना शिवसेनेत अतर्गत वाद होऊ नये म्हणून युवासैनिकांना उमेदवारी देण्यावर फुल्ली मारण्यात आली आहे. युवासेनेत विविध पदावर कार्यरत असलेल्या आपल्या मुलांना उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करणारे नेते, उपनेते, विभागप्रमुख, आमदार, नगरसेवक आदींना ‘मातोश्री’च्या या निर्णयामुळे माघार घ्यावी लागली आहे. यामुळे युवासैनिक नाराज झाले असले तरी शिवसैनिकांमध्ये या निर्णयाचे स्वागत होऊ लागले आहे.

युवानेते

युवा सेनेतील पदाधिकारी समाधान सरवणकर, अमेय घोले, सूरज चव्हाण (पत्नीसाठी), सिद्धेश कदम, राज कुलकर्णी यांच्यासह युवा सेनेत शाखा संघटक पदावर कार्यरत असलेले अनेक जण पालिका निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक होते.

विद्यार्थीते युवा

पूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी सेनेतील कार्यकर्ते शिवसेनेतील मुख्य प्रवाहाआड येत नव्हते. विद्यार्थी सेनेचे काम इमाने इतबारे करीत होते. युवासेनेत मात्र असे चित्र दिसत नाही. या संघटनेतील बहुतांश पदाधिकारी सेनेच्या नेत्यांची मुले असल्याने यातील अनेकांना आतापासूनच ‘लोकप्रतिनिधी’ बनण्याचे स्वप्न पडू लागले आहे. नेमक्या याच गोष्टीला शिवसेनेत वर्षांनुवर्षे काम करणाऱ्या ज्येष्ठांचा आक्षेप आहे. ही बाब विचारात घेऊन शिवसेनेच्या मुख्य प्रवाहापासून अलिप्त असलेल्या युवासैनिकांना पालिका निवडणुकीची उमेदवारी द्यायची नाही, असा ठाम निर्णय ‘मातोश्री’वर झालेल्या एका बैठकीत घेण्यात आला.