डिसेंबर महिन्यात महाविद्यालयीन वर्तुळात सुरू झालेल्या महोत्सवांची रेलचेल नवीन वर्षांतल्या जानेवारी महिन्यापर्यंत असते. अशाच अवघ्या महाविद्यालयीन विश्वाला ओढ लावणाऱ्या एच.आर. महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळाचा ‘नांदी’ हा महोत्सव नुकताच जल्लोषात पार पडला.

मुंबईतील महाविद्यालयांना मराठी वाङ्मय मंडळांची वर्षांनुवर्षांची परंपरा लाभली आहे. चर्चगेट येथील एच. आर. महाविद्यालयाचे मराठी वाङ्मय मंडळ गेली १७ वर्षे कार्यरत आहे. पण १७ वर्षांच्या इतिहासात यंदा प्रथमच एच. आर. महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाने ‘नांदी’ या महोत्सवाचे आयोजन केले होते. आंतरमहाविद्यालयीन स्तरावर ४ ते ६ जानेवारी दरम्यान ‘नांदी’ महोत्सव साजरा झाला. नववर्षी सुरुवातीलाच महोत्सव पार पडत असल्याने त्याचे नाव ‘नांदी’ ठेवण्यात आले होते. यंदा मराठी वाङ्मय मंडळ प्रथमच महोत्सव साजरा करत असल्याने ‘ट्विस्ट’ या आकर्षक संकल्पनेअंतर्गत महोत्सव रंगला होता. ‘ट्विस्ट’ संकल्पनेनुसार नेहमीच्या स्पर्धामध्येच गमतीदार बदल करून, त्यांची नावे वेगळ्या पद्धतीने ठेवून स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेत फक्त सहा शब्दांचा वापर करून कथेचा सार लिहायचा होता. त्यासाठी स्पध्रेचे नाव ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ असे स्पध्रेच्या नियमानुरूप ठेवण्यात आले होते.

याशिवाय एका स्पध्रेत विद्यार्थ्यांनी कोणत्याही साहित्याचा उपयोग न करता केवळ छापांचा वापर करून चित्रे काढली तर मुलींना मेहंदी नेहमीप्रमाणे हातावर न काढता नाजूकपणे नखांवर काढायची होती म्हणून या स्पध्रेला ‘जरा जपून’ असे नाव देण्यात आले होते. महोत्सवामधली सर्वात निराळी असणारी स्पर्धा म्हणजे ‘नवरस’. यात एका कथेला मिळालेल्या ‘रसा’च्या अनुषंगाने नाटय़ स्वरूपात सादर करून दाखवायचे असल्याने त्याला ‘एक होता विदूषक’ असं नाव देण्यात आले होते.

त्याचबरोबर पारंपरिक नृत्य, ‘फॅशन शो’, ‘टी-शर्ट पेंटिंग’, छायाचित्र स्पर्धा, कथालेखन स्पर्धा अशा सृजनशील स्पर्धाही महोत्सवात पार पडल्या. चित्रपट-मालिका श्रेत्रातील प्रशांत जोशी, मंदार जोग, पंकज चव्हाण, उत्तरा मोने, योगू खातू, अभिषेक साटम, प्रियदर्शन जाधव, जिवेंद्र गुजराथी, स्वप्निल मांडवकर, मेघा घाडगे, रवी चव्हाण, धारा सिंग इत्यादी नावाजलेल्या कलाकारांनी या गमतीदार स्पर्धाचे परीक्षण केले.

‘नांदी’ महोत्सवाला इतर महाविद्यालयातील विद्यार्थीवर्गाने मोठय़ा संख्येने उपस्थित राहून चांगला प्रतिसाद दिल्याने महोत्सव उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडल्याचे मत महाविद्यालयाचे प्राध्यापक पराग ठक्कर यांनी व्यक्त केले.

भारतातील पहिल्या दिव्यांगजनपरिषदेचे आयोजन

अपंगांना माध्यम शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि संज्ञापन विभागाने ‘दिव्यांगजन’ परिषदेचे आयोजन केले आहे. सुगम्य भारत अभियानाचा भाग म्हणून विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विभागाने स्वीडन येथील ‘जोंकोिपग’ विद्यापीठाच्या सहकार्याने ९ ते ११ जानेवारी या कालावधीत, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई विद्यापीठ संशोधन केंद्र, उत्तन (भाईंदर) येथे ‘डिसेबिलिटी कम्युनिकेशन’ क्षेत्रातील विविध भागधारकांसाठी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. शारीरिकदृष्टय़ा सक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माध्यम आणि संवाद श्रेत्राची दारे उघडी असतात मात्र दिव्यांगजनांना माध्यम श्रेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न या परिषदेतून केले जाणार आहेत. मागील पाच वर्षांत सुगम्य भारत अभियानाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून भारत सरकारचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने ‘अली यावर जंग नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ स्पीच अ‍ॅण्ड हिअिरग डिसेबिलिटी’ यांच्या सहकार्याने ‘डिसेबिलिटी कम्युनिकेशन’ या विषयात पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार करण्याचा मानस आहे. त्यानंतरच्या दोन वर्षांच्या पदव्युत्तर उच्च पदवीसाठी नवीन अभ्यासक्रम नियोजनाच्या हेतूने प्रस्तुत परिषदेचे आयोजन योजिले आहे.

परिषदेचा मुख्य उद्देश माध्यम आणि दिव्यांगजन क्षेत्रात काम करणाऱ्या जागतिक भागधारकांना विचारविनिमय करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच माध्यम व ‘डिसेबिलिटी कम्युनिकेशन’ क्षेत्रात मनुष्यबळ विकासासाठी पाऊल उचलण्यासाठी प्रयत्न करणे आहे. या परिषदेला सरकार प्रशासनातील धोरण नियोजक, निमसरकारी श्रेत्रातील अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि उद्योजक यांचा सहभाग अपेक्षित आहे.

आयआयटीत दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा

देशातील अग्रगण्य तंत्रज्ञान संस्था म्हणून ओळख असलेल्या आयआयटी मुंबईत ग्रंथालयात दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे दृष्टीहीन विद्यार्थ्यांनाही आता विविध शैक्षणिक साहित्याचा फायदा घेता येणार आहे. या केंद्रात स्क्रीन रीडिंग सॉफ्टवेअर, पॉकेट डायसी प्लेअर आणि रेकॉर्डर, स्मार्ट ब्रेलर, ब्रेल एम्बोसर, ओपन बुक स्कॅन आणि लिखित मजकुराची फाइल एमपी३ स्वरूपात रूपांतरित करणारे संगीता सॉफ्टवेअर आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. संस्थेत चांगली बुद्धिमत्ता असलेले विद्यार्थी येणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे असून त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्याची संस्थेची तयारी असल्याचे आयआयटीचे संचालक डॉ. देवांग खक्कर यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक दृष्टीहीन विद्यार्थ्यांला सुविधेचा लाभ घेता येईल अशी यंत्रणा तयार करण्याचा मानस असल्याचेही खक्कर म्हणाले.

सर जे. जे. कला महाविद्यालयाचा कलावेधलवकरच भेटीला

भारताताच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडात नावाजलेल्या मुंबईतील सर जे. जे. कला महाविद्यालयाचा ‘कलावेध २०१७’ हा शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला जाणारा महोत्सव लवकरच भेटीला येणार आहे. २८ जानेवारी रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात स्पध्रेला सुरुवात होणार असून पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते नववी अशा तीन गटांत स्पर्धा पार पडतील. समाजाला ‘कला’ आणि त्यात चित्रकला हा पोट भरण्याचा व्यवसाय म्हणून स्वीकारणे अजूनही रुचत नाही.

त्यामुळे शालेय स्तरापासूनच मुलांना योग्य मार्गदर्शन देण्याचे त्यांना योग्य दिशा देण्याचे आणि त्यांचा केलेला लोकांपर्यंत पोहोचण्याचा काम ‘कलावेध’ करीत असते. सध्याच्या धावत्या आणि स्पर्धात्मक जगात शालेय मुलांना अभ्यासाशिवाय सृजनशील करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यात कलेला भविष्यात व्यवसाय म्हणून घेण्याच्या विचार करणारी मुले अपुऱ्या संधीमुळे मागे राहतात

‘कलावेध’ अशाच मुलांसाठी एक रंगमंच उभा करून देण्याचे काम करतो. त्याचप्रमाणे दिग्गज कलाकारांकडून चित्रकलेतले बारकावे आणि त्यांची शैली अभ्यासण्याची संधीही मुलांना मिळते.

शिवाय ‘कलावेध’मध्ये जिंकणाऱ्या २० मुलांना महाविद्यालयातील चित्र-शिल्प विभागात काम करण्याची संधी मिळते.

‘कलावेध’ स्पर्धा प्रवेशाची अंतिम तारीख २० जानेवारी असून अधिक माहितीसाठी नीलम मोरे – ९९८७३०१५८१ आणि सौरभ घोलम – ८८०६२६७०८२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मुंबई विद्यापीठात संशोधनाचा आविष्कार

शिक्षण श्रेत्रात बांधलेल्या क्रमिक अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन नवकल्पनांना चालना देणारी, नावीन्यपूर्ण संकल्पनांना स्पध्रेचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारी मुंबई विद्यापीठ नियोजित ‘संशोधन अधिवेशन’ नुकतेच पार पडले.

विद्यापीठात येणाऱ्या सात विभागानुरूप कला-मानवता, वाणिज्य-न्याय-व्यवस्थापन, शुद्ध विज्ञान, कृषी आणि प्राणी शेती, तंत्रज्ञान-अभियांत्रिकी, वैद्यकीय शास्त्र अशा सहा संकल्पनांच्या विभागात प्रकल्पांची विभागणी करण्यात आली होती. त्यातून ४८ प्रकल्पांची निवड राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या आंतरविद्यापीठीय स्पध्रेसाठी करण्यात आली. यात सहा संकल्पनांवर आधारित विविध विषय विद्यार्थ्यांनी निरनिराळ्या पद्धतीने मांडले. सध्याच्या काळातील सामाजिक विषयांना बोलते करून ते कोणत्या पद्धतीने सोडवता येतील याचा विचार विद्यार्थी करत असल्याचे अधिवेशनादरम्यान प्रकर्षांने जाणवले. पर्यावरण आणि पर्यायाने प्रदूषण समस्येतील प्रश्नांबाबत विचार करून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचे पुनर्नियोजन, विविध पद्धतीने करण्यात येणारी खतनिर्मिती प्रक्रिया अशा विषयांवर संशोधन प्रकल्पनांचे सादरीकरण झाले, तसेच अंडय़ांचा वापर करून निर्माण करण्यात येणारे नसíगक रंग या कृषी क्षेत्रातील तर नदीजोड प्रकल्प अशा सामाजिक विषयावर अभ्यास करणाऱ्या प्रकल्पांची मांडणी विद्यार्थ्यांनी अधिवेशनात केली होती.

त्याचप्रमाणे मराठी भाषेचा अ‍ॅप आणि मुलं नापास का होतात? यांसारख्या विषयांवरही विद्यार्थ्यांनी संकल्पना मांडल्या. या सगळ्या संकल्पनांचा अभ्यास करत असताना निरीक्षण, सर्वेक्षण या संशोधनातील पायऱ्यांचा आधार घेत विद्यार्थ्यांनी प्रकल्प पूर्ण केला. त्याचे उत्तमरीत्या सादरीकरण केले.

‘ही केवळ स्पर्धा नसून आमच्यासाठी अनुभवरूपी खजिना असणारा प्रवास ठरला’ असे विद्यार्थ्यांचे मत आहे.

संकलन : अक्षय मांडवकर, प्रियंका मयेकर, सायली चाळके, पराग गोगटे